अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झालेली आहे. २८ जुलै रोजी मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची सुरुवात झाली. अगदी पहिल्या दिवसापासूनच जान्हवीने तिचे रंग दाखवण्यास सुरुवात केली. ती सतत घरातील सदस्यांशी वाद, भांडणं, अपमान करताना दिसत आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून तिने घरातील सदस्यांचा पाणउतारा देखील केला आहे.
जान्हवीने वर्षा ताईंचा देखील अपमान केला होता. याशिवाय ती तिच्या ग्रुपमधल्या मंडळीना सोडले तर इतर सर्वच सदस्यांशी चुकीच्या पद्धतीने वागते. आता तर तिने कहरच केला आहे. ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कदरम्यान तिने दिग्गज अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांच्या करियरवर भाष्य करताना त्यांचा अपमान केला आहे. हे सर्व पाहून प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी देखील पंढरीनाथ उर्फ पॅडी यांना पाठिंबा देताना जान्हवीला सुनावले आहे. अशातच अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना त्यांच्या मित्राला पाठिंबा देताना जान्हवीबद्दल संतापजनक पोस्ट लिहिली आहे.
विशाखा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “कहेता है जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना…पॅडी More Power To You.
विनोदी कलाकाराला कायमच हलक्यात घेतात बाकीचे लोक…निक्की बाई तुम्ही पॅडी कांबळे यांना “जोकर” म्हणालात…! आता जोकर म्हणजे कोण? तर जो आपले अश्रू लपवून लोकांचं मनोरंजन करतो, त्यांना हसवतो. तो म्हणजे जोकर. हे काम बाप जन्मात तुम्हाला जमणार नाही.
View this post on Instagram
त्यासाठी हिंमत लागते, ती तुमच्याकडे नाही. गेली अनेकं वर्ष हे कामं तो करतोय. उथळ पाण्याला खळखळाट खूप. हे विधान निकी आणि जान्हवीसाठी एकदम परफेक्ट आहे. आणि अगं ए मुली… तुझा जन्म कदाचित २००० तला असावा आणि पॅडी यांनी आपल्या कामाची कारकिर्दीची सुरुवात केली १९९८ मध्ये.
त्यांनी त्यांच्या नाटकाचे केलेले प्रयोग, त्यांच्यासाठी जमणारी गर्दी, छू बंड्या ज्याचे वेड अजून आहे महाराष्ट्राला.. ‘येड्यांची जत्रा’मधला नयन राव, ही आणि अशी अनेक पात्र त्यांनी रंगवलेली आहेत.
जान्हवी तुझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पंढरीनाथ नाहीयेत.. गेली अनेक वर्ष रंगभूमीच्या रंगात न्हाऊन निघालेले पंढरीनाथ आहेत ते..! आणि त्यांच्या विनोदाचा टायमिंग याबद्दल तर तू बोलायचंस नाही. नखाची किंमत नाहीये तुला आणि वर्षाताईंचा तुम्ही खूप अपमान केलाय आतापर्यंत.. Game आहे Game आहे असं म्हणतं मी दोन तीन एपिसोड पाहिले पण, तुम्ही तर थांबतच नाही आहात.
ताईंनी Glamour मिळवून दिलं मराठी सिनेमाला… त्याकाळी सोशल मीडिया नव्हता बाई… त्यांच्या दमावर आणि त्याकाळातल्या कलाकारांवरच्या प्रेक्षक प्रेमामुळे, नाटक सिनेमे हाउसफुल्ल व्हायचे..! त्यांना कमी लेखणं बंद करा…जरा बोलताना भान ठेवा. विनोदामुळे तो माणूस जगलाय, टिकलाय, ५० शी पूर्ण झालीये त्याची तरीही आजही स्लॅपस्टिकचा बाप आहे तो… शांत आहे याचा अर्थ असं नाहीये की त्याला सेल्फ Respect नाहीये..!
आता थोडं पॅडीबद्दल…
पॅडी माऊली… तुझा खेळ तू खूप सभ्यपणे, हुशारीने, संयम बाळगून खेळतोयस मित्रा…! आता तर तू जोरात आला आहेस..! इतकं हिडीस बोलल्यानंतरही तुझ्या तोंडून वाईट शब्द निघत नाहीयेत त्याबद्दल तुला सलाम… खचून जाऊ नकोस…! टास्कमध्ये जोर लावून खेळ मित्रा..! तू वयाने मोठा आहेसच आणि शिवाय माणूस म्हणून मोठा आहेस हे दाखवून दिलस आज. एक उत्तम Reactor असूनही तू रिऍक्ट झाला नाहीस त्याबद्दल तुझे खूप खूप कौतुक…!
======
हे देखील वाचा : जान्हवीला पती किरण किल्लेकरने दिला पाठिंबा
======
बाकी तुझ्या फळांनी मजा आणली. काय Timing भन्नाट.
निक्कीच्या अंगणात तू जाणारच नाहीस हे तू बरं नाही करत… खरंतर जां रोज जां… आणि तिचे वाळत घातलेले पापड असतील नां त्याच्यावर नाच. तिच्या आवाजासारखाच आवाज येईल त्या पापडाचा…!
करिअरवर बोलायचं नाही…!”
मालिकेमध्ये खलनायिका साकारलेली जान्हवी खऱ्या आयुष्यात देखील खलनायिका बनताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवीने गेल्या २४ दिवसांत अनेकांचा अपमान केला. सोशल मीडियावर जान्हवीला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. तर दुसरीकडे रितेश देशमुख यांनी या मुद्द्यावरुन जान्हवीचा क्लास घ्यावा, अशी मागणीही होत आहे.