मराठी बिग बॉसचे पाचवे पर्व सुरु झाले आणि आता या पर्वाचा शेवट देखील जवळ आला आहे. बिग बॉसचे हे पाचवे पर्व आहे. मागील चारही पर्वांपेक्षा जास्त हे पाचवे पर्व गाजले आणि लोकप्रिय देखील झाले. यंदाच्या सीझनमध्ये घरात कलाकारांसोबतच सोशल मीडिया स्टार असलेल्या लोकांना देखील संधी देण्यात आली होती. त्यामुळेच हे पर्व वेगळे ठरले.
आगामी अवघ्या काही दिवसातच या पाचव्या पर्वाचा फिनाले होणार आहे. मात्र त्यापूर्वीच सर्वांचा लाडका पंढरीनाथ कांबळे या घरातून बाहेर पडला. त्याच्या नॉमिनेट होण्याचा धक्का सगळ्यांनाच बसला आहे. सर्वांचीच इच्छा होती की पॅडी दा फिनालेपर्यंत पोहचावा आणि त्याने हा शो जिंकावा. मात्र सर्वांचीच ही इच्छा अपूर्ण राहिली. पंढरीनाथ कांबळे घराच्या बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर तर अनेकांनी कमेंट्स करत शो वर आपला रोष व्यक्त केला. यांसोबतच कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
यातच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय विनोदी अभिनेता असलेला अंशुमन विचारेच्या पत्नीने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट कमालीची गाजत असून, व्हायरल होत आहे. पल्लवी विचारेने पंढरीनाथ कांबळेसाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने लिहिले आहे की, “बिग बॉस’चा खेळ खरंच आयुष्य शिकवून जातो नाही, म्हणजे बघा ना एका चांगल्या माणसाला सतत त्याच्या चांगुलपणाचा पुरावा द्यावा लागतो आणि आयुष्यभर तो स्वतःला सिद्ध करतच वेळ घालवतो…आणि तरीही लोक त्याच्यावर कधीच विश्वास ठेवत नाहीत. अहो, लोकांचं जाऊदे बऱ्याचदा जन्मदेते आई-बाबा सुद्धा चांगल्या मुलाचीच परीक्षा घेत राहतात कधीच त्याच्या कर्तृत्वावर आणि त्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवत नाहीत.”
पुढे पल्लवीने लिहिलं, “चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते आपण कितीही काही म्हटलं तरी हेच अंतिम सत्य आहे…असंच काहीतरी झालंय पॅडी दादा तुझ्याबरोबर…पण एकच सांगेल तू ट्रॉफी नाही पण सगळ्यांच प्रेम भरभरून जिंकून गेलास…नेहमीप्रमाणेच.”
पल्लवी यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्यांना अगदी योग्य सांगितले आहे. शिवाय पॅडी दादा यांचे कौतुक करणाऱ्या नेटकऱ्यांनी देखील पॅडी दादा आमच्यासाठी नेहमीच विनर असतील असे म्हटले आहे. पल्लवी विचारेच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने लिहिले आहे, “एकदम खरंय, मी माझ्या आयुष्यात हेच अनुभवत आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, खूप चांगला व्यक्ती आहे पॅडी दादा. खूप छान खेळला.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे, “खरंच खूप शांत आणि साधा माणूस…खूप वाईट वाटलं.” अजून एकाने लिहिले, “खरंच खूप साधा आणि सच्चा माणूस आहे खूप वाईट वाटले.”
दरम्यान सामान्यपणे १०० दिवसांचा खेळ असलेला हा शो यंदा ७० दिवसांमध्येच संपत असल्याने सगळ्यांनाच वाईट वाटत आहे. येत्या ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. सध्या घरात असलेल्या अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर आणि वर्षा उसगांवकर या सात सदस्यांपैकी एक सदस्य ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरणार आहे.