मराठी बिग बॉसने प्रेक्षकांवर असलेली त्याची पकड अधिकच मजबूत केली आहे. या शोची लोकप्रियता दिवसागणिक अधिकच वाढत आहे. यामुळे टीआरपीच्या गणितात देखील शोने रेकॉर्ड केले आहे. तबबल १६ सदस्यांनी या बिग बॉसच्या पाचव्या पर्वात घरात एन्ट्री केली आहे. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये सूत्रसंचालक असणाऱ्या रितेश देशमुखने आपल्या दमदार सूत्रसंचालनाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. एकीकडे मजामस्ती करणारा रितेश वेळप्रसंगी घरच्यांसोबत कठोर होऊन त्यांना समज देताना देखील दिसत आहे.
अशातच नुकतेच बिग बॉसच्या घरातील तिसऱ्या आठवड्याचे एविक्शन पार पडले. बिग बॉसच्या घरातून पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तमदादा पाटील बाहेर पडले. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात ‘कलर्स मराठी’ वाहिनी नव्या रुपात दाखल झाल्याने या आठवड्यात नॉमिनेशन झाले नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते ते, बिग बॉसच्या तिसऱ्या आठवड्यातील नॉमिनेशनकडे. अशातच भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंची एन्ट्री झाली आणि भाऊंनी घरच्यांना डबल नॉमिनेशनचा धक्का दिला.
या आठवड्यामध्ये घरातून बाहेर जाण्यासाठी निखिल, योगिता, अभिजीत आणि सूरज हे चार सदस्य नॉमिनेट झाले होते. त्यामुळे यापैकीच एक जण बाहेर जाणार हे सगळ्यांना माहित होते. अशातच रितेश देशमुखने निखिल दामलेचे नाव घेतले आणि तो घरातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. मात्र त्यानंतर त्याने निखिल एकटा नाही तर त्याच्यासोबत घरातून अजून एक सदस्य बाहेर जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने योगिताचे नाव घेतले. घरातून एकाच दिवशी दोन सदस्य बाहेर गेल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर पडल्यानंतर ‘रामा राघव’ फेम निखिल दामले म्हणाला, “घरातल्या सदस्यांमुळेच माझे या घरावरचे प्रेम वाढायला वाढायला सुरुवात झाली होती. मला हा खेळ थोडा उशिरा समजला आणि जेव्हा कळला तोपर्यंत आज मी बाहेर पडली. जर हा खेळ मला लवकर कळला असता तर कदाचित आज वेगळे चित्र बघायला मिळाले असते.” यासोबतच निखिलने त्याच्या इन्व्हेस्टमेंट बॉक्समध्ये असलेला 50 पॉईंटचा कॉईन डीपी दादा अर्थात धनंजय पोवार यांना देऊ केला आणि त्यांना नॉमिनी केले आहे.
=======
हे देखील वाचा : अंकिता वालावलकरचा प्रेरणादायी प्रवास
=======
तर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दुसृ सदस्य असलेली योगिता तिच्या या घरातील प्रवासाबद्दल म्हणाली, “बिग बॉसच्या घरामध्ये माझे जे मित्र-मैत्रिणी झाले होते त्यांचे ओले डोळे बघून मला खूप त्रास झाला. आता माझ्या टीमसाठी मला टास्क खेळता येणार नाही याचे दु:ख आहे. ‘बिग बॉस मराठी’चा खेळ मला कळलाच नाही. या घरात राहणे वाटते तितके सोपे अजिबातच नाही, ते खरंच खूप कठीण आहे.” योगिताने तिच्या इन्व्हेस्टमेंट बॉक्समध्ये जमा असलेल्या 50 पॉईंटचा कॉईन आर्याला दिला असून तिने आर्याला नॉमिनी केले आहे.
योगिताने या घरातून बाहेर पडण्याआधी सगळ्यांना एक सल्ला देखील दिला. ती म्हणाली, “मी सगळ्या सदस्यांना सांगेन की, माझ्यासारखे रडू नका, एकमेकांना पाठिंबा देत छान खेळा. ‘कलर्स मराठी’ने मला दिलेल्या संधीबद्दल आभार. मला खूप चांगला अनुभव मला मिळाला आहे”. दरम्यान या आठवड्यात निखिल आणि योगिता यांच्या घरातून बाहेर पडण्यामुळे नेटकरी देखील नाराज झाले. सोशल मीडियावर कमेंट्स करत त्यांनी या दोघांचे कौतुक केले आहे.