मराठी बिग बॉसमध्ये प्रत्येक आठवड्याला असे काही घडते की, ज्यामुळे संपूर्ण आठवडा आणि भाऊचा धक्का तुफान गाजतो. हा आठवडा देखील अशाच एका कारणामुळे तुफान गाजत आहे. ते कारण आहे, या आठवड्यात घरामध्ये झालेला कॅप्टन्सी टास्क. ‘जादुई हिरा’ या कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या आणि निक्कीदरम्यान वाद झाला आणि नंतर आर्याने थेट निक्कीच्या कानशिलात लगावली. ही घटना टीव्हीवर जरी दाखवण्यात आली नसली, त्याचे चांगलेच पडसाद घरामध्ये आणि सोशल मीडियावर उमटत आहे.
घराचा कॅप्टन होण्यासाठी ‘जादुई हिरा’ नावाचा एक टास्क घरात घेण्यात आला. हा हिरा निक्कीच्या हातात जाऊ नये या प्रयत्नात सगळे होते. आर्या आणि निक्की या दोघींमध्ये देखील यावरूनच वाद झाला. नंतर झटापट झाली आणि त्यात आर्याने निक्कीला चापट मारली. त्यानंतर निक्कीने घरात आरडा ओरडा करत रडून गोंधळ घातला आणि बिग बॉसकडे कम्प्लेंट केली. बिग बॉसने देखील तिची तक्रार ऐकून घेऊन सर्व पडताळणी केली आणि त्यांना आर्या दोषी दिसली. त्यांनी लगेच तिला जेलमध्ये पाठवले आणि भाऊच्या धक्क्यावर याबाबत निर्णय होईल सांगितले.
नुकत्याच झालेल्या भाऊच्या धक्क्यावर देखील याच घटनेवरून रितेशने आर्याला धारेवर धरले. सोशल मीडियावर देखील याच गोष्टीच्या तुफान चर्चा होत आहे. सामान्य नागरिकांसोबतच कलाकार देखील यावर बोलत आहे. अशातच रितेश आता या घटनेवर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अशातच रितेशने आर्याला घरातून बाहेर पडण्यास सांगितले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. रितेशने आर्याला बाहेर काढण्याआधी सर्व काही डिटेल सांगितले.
रितेश म्हणाला, “आर्या, तुम्ही सतत एक स्टेटमेंट करत होतात की, निक्की असे वागतेय तर मीही असेच वागणार. निक्की धक्काबुक्की करते, मीही करणार, ती खेचाखेची करते मीही करणार. आर्या मी निक्कीच्या वागण्यावरून त्यांना ओरडलोय आणि या सीझनभर त्यांची इम्युनिटी काढून घेतली. त्या सीझनभर कॅप्टन होऊ शकणार नाहीत. त्यामुळे निक्की वागते तसेच मी वागणार हा अॅटिट्यूड मला मान्य नाही. तो निक्कीचा असला तरी किंवा तुमचा असला तरी. याच अॅटिट्यूडनी तुम्ही कॅप्टन्सी टास्क खेळत होता. तुम्ही स्ट्रॅटर्जी केली की निक्की आत येऊ नये म्हणून दरवाजा अडवायचा. ज्यावर वर्षाजींनी तुम्हाला सांगितलं की ही स्ट्रॅटर्जी चुकीची आहे, आपण असे करायला नको.”
View this post on Instagram
त्यानंतर रितेश म्हणाला, “निक्की आल्या, त्या दरवाजाला धक्का मारत होत्या. त्यांनी अरबाजची मदत घेतली. आम्ही हे बघ असताना आम्हाला वाटले की जर अरबाजने जोरात धक्का मारला आणि तो आर्याला लागला तर…? आम्हाला प्रेक्षक म्हणून तुमची चिंता आहे. अरबाजने काळजी घेतली. धक्का मारताना त्याने जोर लावला नाही. नंतर निक्की आत आल्या, मग सुरू झाली तुमची धक्काबुक्की. याची सुरुवात इथे झाली नव्हती, दुसऱ्या रुममध्ये झाली होती.
तिथे सर्वजण हिरा प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करत होते, तिथे निक्की तो घेण्यासाठी आल्या आणि तुम्ही निक्कीचे हात पकडले. आर्या तुम्हाला माहितीये का, निक्की तिथे जे बोलत होत्या, इन्स्टिगेट करत होत्या ते त्या पॅडी आणि अंकितालाही करत होत्या. त्यावर या दोघांनी तिला म्हटले की निक्की आम्हाला फुटेज देऊ नकोस, आम्हाला फुटेज नको. त्या परिस्थितीत कसे डील करायला पाहिजे होते ते अंकिता आणि पॅडी यांनी करून दाखवले. त्यावेळेच निक्कीला वाटलं की आपण इथे काहीच करू शकत नाही, त्या तिथून निघून गेल्या. त्या तुमच्याकडे आल्यावर तुम्ही फिजीकल झालात.”
पुढे रितेश म्हणाला, “जेव्हा बाथरुममध्ये निक्की आल्या, तेव्हा तुम्हाला निक्की यांना आत येऊ द्यायचे नव्हते, तेव्हा तुमच्यात झटापट झाली. यातच तुम्हाला निक्कीचा हात लागला. त्यानंतर तुमचा संयम सुटला आणि तुम्ही त्यांना म्हणालात, “निक्की मी तुला मारेन” आणि तुम्ही निक्कीवर हात उचलला. आर्या तुम्ही स्वतःला काय समजता? म्हणजे तुम्हाला राग आला तर तुम्ही कोणावरही हात उचलणार? स्वतःवर नियंत्रण नाही? हे बिग बॉसचं घर आहे. या घरात खेचाखेची, धक्काबुक्की सगळ्या परिस्थिती येतात आणि आल्या आहेत, पण कोणीही स्वतःवरचा ताबा सोडला नाही. कोणीही कोणावर हात उचलला नाही. तुम्ही जे केले ते जाणीवपूर्वक केले आहे, मी बिग बॉसना सांगतो की त्यांनी आपला निर्णय सांगावा.”
यानंतर बिग बॉसने निर्णय देताना सांगितले, “कॅप्टन्सी टास्कमधील आर्या आणि निक्की यांच्यातील वादाचे फुटेज आम्ही अनेक वेळा पडताळून पाहिले त्यात आम्हाला दिसले की बाथरूम एरियात निक्की आणि आर्या यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यात निक्कीचा धक्का आर्याला लागला आणि आर्याने निक्कीवर हात उचलला. आर्याने केलेले कृत्य घरातील सर्वात महत्त्वाच्या आणि मुलभूत नियमाचे उल्लंघन आहे जे कठोर शिक्षेस पात्र आहे. बिग बॉसच्या घरात अशा निंदनीय कृत्यांना आधी देखील जागा नव्हती आणि आताही नाही आणि पुढे देखील नसेल. त्यामुळे बिग बॉस आर्याला आता या क्षणी बिग बॉसच्या घरातून निष्कासित करत आहेत.”
बिग बॉसच्या या निर्णयानंतर आर्या मुख्य दरवाजाने घरातून बाहेर पडले. बिग बॉसचा हा निर्णय ऐकल्यानंतर आर्याला घरच्यांना निरोप देखील देता आला नाही. इतके पटकन सगळे घडले. की आर्याला आणि इतरांना देखील नीट समजले नाही.