Home » भुशी डॅमचे सौदर्य मोहक तेवढेच घातकही

भुशी डॅमचे सौदर्य मोहक तेवढेच घातकही

by Team Gajawaja
0 comment
Bhushi Dam
Share

पावसाची सुरुवात झाली की, ओढ लागते ती पावसाळी पर्यटनाची. पावसाच्या बेफाम वा-यात हिरव्यागार नटलेल्या निसर्गात जाण्यासाठी मग शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं गावाकडे वळतात. नदीकिनारी पर्यटकांची तुफान गर्दी होते. धरणे फुल्ल होतात. अशाच एका धरणावर गेल्याशिवाय अनेकांची पावसाळी सहल पूर्ण होत नाही. हे धरण म्हणजे, पुण्याच्या, लोणावळ्यातील भुशी धरण. पहिला पाऊस झाला, की या भुशी धरणाकडे पर्यटकांची पावले वळू लागतात. त्यातही भुशी धरणाच्या छोट्या-छोट्या पाय-यांहून पाणी वाहू लागले की पर्यटकांची संख्या दुप्पट होते. भुशी धरणाकडे जाणारे सर्व रस्ते पर्यटकांनी फुलून जातात. (Bhushi Dam)

मात्र अशाच गर्दीत वाढणारे अपघातही चिंताजनक आहेत. काहीच दिवसांपूर्वी भुशी धरणाजवळील धबधब्यात एक महिला आणि चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यानं हे कुटुंब अडकले गेले. भुशी धरण हे जेवढे मोहक आहे, तेवढेच ते धोकायदायकही आहे. यासंदर्भात अनेक सूचना पर्यटकांना देण्यात येतात. मात्र पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि प्राण गमवून बसतात.

१८६० च्या दशतात ब्रिटीशांनी बांधलेल्या या छोट्या धरणाची खासियत त्यातील पाय-यांवर आहे. या पाय-यांवर पाणी ओसांडून वाहू लागले, की पर्यटकांची गर्दी येथे होते. मात्र या धरणात तीन नद्यांमधून पाणी येते. त्यामुळे भुशी धरणाच्या धबधब्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशा वाढत्या घटनांमुळे भुशी धरणातील पावसाळी पर्यटनावर अनेक मर्यादा आल्या आहेत. (Bhushi Dam)

पश्चिम  महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भुशी धरण हे महत्त्वाचे धरण आहे. लोणावळ्यात असलेल्या या धरणाच्या आसपासचा निसर्ग हा संपन्न आहे. मोठी वनसंपदा या भागात आहे. त्यामुळे लोणावळा हे पर्यटकांचे आवडते स्थान आहे. त्यात भुशी धरणही याच लोणावळ्यात असल्यामुळे धरणाकाठी फिरण्यासाठी पर्यटकांची बाराही महिने येथे गर्दी असते. लोणावळा हे समुद्रसपाटीपासून ६२५ मीटर उंच आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील हे ठिकाण त्यामुळेच थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. यासर्व पर्यटकांच्या नजरा भुशी धरणावर असतात. (Bhushi Dam)

हे धरण ब्रिटीशांनी एका अनोख्या कारणासाठी बांधले. लोणावळा परिसरात धुंवाधार पाऊस पडतो. येथे नद्याही अनेक आहेत. यातून वाहून जाणारे पाणी साठवण्याच्या उद्देशानं ब्रिटीशांनी धरण बांधेल. याशिवाय ब्रिटीशांनी भारतात रेल्वे चालू केली होती. या सर्व रेल्वेगाड्या या वाफेवर चालणा-या असायच्या. अशा गाड्यांना पाण्याची मोठी आवश्यकता लागते. हिच पाण्याची गरज लक्षात घेऊन ब्रिटीशांनी भुशी धरणाची उभारणी केली. इंद्रायणी नदीवर १८६० च्या दशकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या वाफेच्या इंजिनांना पाणी देण्याच्या उद्देशाने धरण बांधण्यात आले. इंद्रायणी नदीवरील असलेला हा दगडी बांध इंग्रज गेल्यावर प्रसिद्धीला आला. २०१४ मध्ये, भारतीय रेल्वेने खाजगी क्षेत्राच्या सहभागाने भुशी धरणाचा पर्यटन रिसॉर्ट म्हणून विकास करण्याची योजना जाहीर केली आहे. भुशी धरणाच्या जलाशयातून लोणावळा, खंडाळा आणि रेल्वेच्या रिव्हर्सिंग स्टेशनपर्यंत कास्ट-लोखंडी पाईपद्वारे पाणी वाहून नेण्यात येते. या धरणातून काही पाणी हे लोणावळा शहरालाही दिले जाते. याच लोणावळा महापालिकेचा धरण उभारणीत मोठा आर्थिक वाटा असल्याची माहिती आहे.

============================

हे देखील वाचा : रेनकोटच नव्हे या गोष्टीही पावसाळ्यातील प्रवासावेळी ठेवा सोबत

============================

२०११ मध्ये, भारतीय नौदलाने या धरणाच्या परिसरात असलेल्या भारतीय नौदल स्टेशन शिवाजी येथे प्रशिक्षणाच्या आधुनिकीकरणासाठी भुशी धरण आणि भुगाव तलाव ताब्यात घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण यामुळे धरणावर कोणत्याही सामान्य नागरिकाला जाता येणार नाही, म्हणून हा प्रस्ताव रद्द कऱण्यात आला. तसेच २०१२ मध्ये, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ९ किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. हा बोगदा भुशी धरणाच्या खालून जाणार होता. (Bhushi Dam)

भुशी धरण आणि असे विवाद कामय चालू असतात. या धरणात गेल्या काही वर्षात दुर्घटनांची संख्या वाढल्यामुळे लोणावळा पोलीस आणि रेल्वेने धरणाजवळ नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तसेच धरणाच्या आजूबाजूच्या भागात दारू पिण्यास बंदी घातली आहे. पर्यटकांना सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत धरणाला भेट देण्याची परवानगी आहे. निसर्गानं नटलेल्या या भुशी धरणात पावसाळ्यात होणा-या पर्यटकांच्या गर्दीमुळे या परिसरात हॉटेल व्यवसायही मोठा वाढला आहे. पण याच भुशी धरणावर होणा-या अपघातांनी आता पर्यटकांवर अटकाव टाकण्याची मागणी होत आहे. त्यामुळेच येथीस स्थानिक पर्यटकांना आवश्यक सूचनांचे पालक करा असे आवाहन करतात.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.