हिमाचल प्रदेशमध्ये भगवान शंकराचे असे एक मंदिर आहे जिथून प्रत्यक्ष भगवान शंकर आणि माता पार्वतीनं महाभारत युद्ध पाहिले होते. हिमाचल प्रदेशमधील हे मंदिर बहिण भावांच्या प्रेमासाठीही प्रसिद्ध आहे. आता उत्तर भारतात, श्रावण महिना सुरु झाला असून यानिमित्त भक्तांची मोठी गर्दी या मंदिरात होत आहे. हे मंदिर म्हणजे, भुरशिंग किंवा भुरेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील नाहान येथे आहे. या मंदिराचा इतिहास द्वापार काळाशी संबंधित असून आजही या मंदिरामध्ये अनेक चमत्कार होत असल्याचा दावा भक्त करतात. आता या मंदिरात भगवान शंकराची पूजा करण्यासाठी आणि भगवान शंकरावर जल अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. (Bhureshwar Mahadev Temple)
हिमाचल प्रदेशच्या नाहान-सोलन राज्य महामार्गावरील शिखरावर सुंदर मंदिर आहे. भगवान शंकराच्या या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. शिवाय या मंदिराचे स्थानही अद्दभूत आहे, येथील पुजेची पद्धतही वेगळी आहे. त्यामुळे या मंदिरात वर्षाचे बारा महिने भक्ताची गर्दी असते. मात्र आता श्रावण महिन्यानिमित्त भक्तांचा पूर मंदिरात आला आहे. या मंदिराचा संबंध थेट महाभारत काळाबरोबर जोडला गेला आहे. महाभारतात वर्णन केलेले प्रसिद्ध कुरुक्षेत्र युद्ध भगवान शिव आणि माता पार्वतीने हे भुरेश्वर महादेव मंदिर आहे, तिथूनच पाहिल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या भिंतीवर यासंदर्भात कथा लिहिली असून भगवान शंकर आणि माता पार्वतीची चित्रेही काढण्यात आली आहेत. तेव्हापासून या क्वागधर पर्वत रांगेत स्वयंभू शिवलिंग असल्याचे स्थानिक सांगतात.
या भुरेश्वर मंदिराला भावाबहिणीचे मंदिर म्हणूनही ओळखले जाते. त्यासाठी एक आख्यायिका सांगितली जाते. येथे भुर सिंग आण दही देवी ही दोन भावंडे रहात होती. या शिखरापासून जवळच असलेल्या पानवा गावात हे दोघं भाऊ-बहिण रहात होते. त्यांना सावत्र आई होती, आणि ती या भावंडांना नेहमी त्रास देत असे. जंगलात गुरे चरायला नेण्याचे काम ही दोघं भावंडे करीत असत. एके दिवशी या भावंडांचा एक बछडा रानात हरवला. काळोख पडत आल्यामुळे हे दोघंही आपल्या घरी परतले. मात्र बछडा नसल्याचे पाहून सावत्र आई या दोघांवर खूप रागावली. त्यावेळी त्यांचे वडिलही घरात नव्हते. त्यामुळे चिडलेल्या आईनं दोघांनाही रानात जाऊन बछड्याला शोधायला सांगितले. बहिणीला रात्री रानात न्यायला नको म्हणून भूर सिंग एकटाच जंगलात गेला. बछडा मिळणार नाही, तोपर्यंत त्याला घरात यायला सावत्र आईनं बंदी घातली. पुढचे दोन दिवस भूर सिंग घरी आला नाही. त्याचे वडिल घरी आल्यावर त्याचा रानात शोध घेण्यात आला. (Bhureshwar Mahadev Temple)
=================
हे देखील वाचा: रहस्यमयी लखामंडल मंदिर !
==================
तेव्हा भूर सिंग आणि बछडा एका शिवलिंगाच्या जवळ मृतावस्थेत सापडले. पुढे काही दिवसांनी सावत्र आईनं त्याच्या बहिणीचे, दही देवीचे लग्न ठरवले. लग्नाची वरात याच शिवलिंगाच्या मार्गावरुन जात होती. तेव्हा दही देवीनं डोली थांबून एकदा भावला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या इच्छेनुसार लग्नाची वरात थांबवण्यात आली. दही देवी त्या शिवलिंगाच्या जवळ आली. तिथूनच असलेल्या कड्यावरुन तिनं खाली उडी मारली. काही अंतर गेल्यावर तीही दिसेनाशी झाली आणि खाली भाभाडच्या गवतासह पवित्र पाण्याच्या प्रवाहाच्या रूपात दही देवी प्रकट झाली. दही देवीनं ज्या कड्यावरुन उडी मारली होती, त्याच कड्यावर जाऊन आजही मंदिरातील पुजारी पूजा करतात. तेव्हापासून या ठिकाणी मंदिर बांधण्यात आले. भूरेश्वर महादेव मंदिर अशी या मंदिराला ओळख मिळाली. दर राखीपौर्णिमेला आणि भाऊबिजेला या मंदिरात मोठी गर्दी होते.
या मंदिरातील शिवलिंगाबाबतही अनेक आख्यायिका आहेत. स्थानिकांच्या सांगण्यानुसार भुरेश्वर महादेवाचे शिवलिंग ३५ ते ५० फूट खाली जमिनीखाली गाडले गेले आहे. येथे येणा-या भाविकांनी याच भुरेश्वर महादेव मंदिराच्या शिखरावर ५१ फूट उंचीची भगवान शंकराची मूर्ती आहे. आज या मंदिरात अनेक भाविक येतात. भगवान शंकरावर अभिषेक करतात. भुरेश्वर महादेवाचे शिवलिंग हे जमिनीत खोल असून त्यासंदर्भात अनेक गुढकथा प्रचलित आहेत. भुरेश्वर महादेव मंदिरात मनोकामना लगेच पूर्ण होते. त्यामुळेच येथे भक्त श्रावण महिन्यात येतात. (Bhureshwar Mahadev Temple)
सई बने