भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे सहावं स्थान. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.
भीमाशंकराची आख्यायिका
एक आख्यायिका अशी सांगतात, की सह्याद्रीच्या या परिसरात एक दुष्ट राक्षस राहत होता. त्रिपुरासुर किंवा भीम असे त्याचे नाव. त्याच्या मातेचे नाव करकती. भीम आपल्या जीवनातील काही रहस्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता. आपला पिता कोण आणि त्याने आपल्याला वाऱ्यावर का सोडून दिले, असा प्रश्न त्याने आपल्या मातेला केला. तेव्हा त्याला समजले की तो कुंभकर्णाचा पुत्र आहे.
भगवान विष्णूचा अवतार असलेल्या प्रभू रामाने त्याचा वध केला होता. हे रहस्य समजल्यानंतर भीमाने विष्णूचा सूड उगविण्याचा निर्धार केला. त्याने ब्रह्मदेवाच्या प्राप्तीसाठी याच परिसरात तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्याला एका वराद्वारे अमर्याद सामर्थ्य प्रदान केले. मात्र, त्याचा दुष्टपणा एवढा वाढला, की त्याने देवांचा राजा इंद्राचाही पराभव केला. महादेवाचा उपासक कामरूपेश्वराचाही त्यानं पराभव करून त्याला पाताळात धाडून दिले. भीमाचा दुष्टपणा वाढत चालल्यामुळे ब्रह्मदेव भगवान शंकराला शरण गेले आणि त्या दुष्टाचा नायनाट करण्याची विनंती केली.

भीमाने कामरूपेश्वराला शंकराची (Lord Shiva) भक्ती सोडून आपले गुणगान करण्याचा आदेश दिला; परंतु कामरूपेश्वराने त्याला तसे करण्यास नकार दिला; त्यामुळे भीमाने शिवलिंग भग्न करण्याच्या उद्देशाने तलवार उपसली. त्याच वेळी भगवान शंकर तेथे प्रकट झाले. त्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. या युद्धामुळे तिन्ही लोक भयभीत झाले. ते पाहून नारदाने युद्ध थांबविण्याची दोघांना विनंती केली. त्यानंतर भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून भीमाची राख केली. त्यानंतर भगवान शंकर त्याच स्वयंभू लिंगात विलीन झाले आणि हे क्षेत्र ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले.
मंदिराची भौगोलिक रचना
हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही. मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही.

ऐतिहासिक पार्श्वभूमी
भीमाशंकराचे मंदिर नगारा शैलीत अठराव्या शतकात बांधण्यात आले आहे. त्याच्या बांधकामावर आर्य शैलीचा प्रभाव दिसून येतो. येथे महादेवाचे स्वयंभू लिंग आहे. पेशव्यांचे कारभारी नाना फडणीस यांनी मंदिराचे शिखर बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही या मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी मदत दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. मंदिराच्या कोरीव दगडी खांबांवर पौराणिक देखावे खोदण्यात आले आहेत. मंदिराच्या आवारात शनिमंदिरही आहे. या क्षेत्राचा पुराणातही उल्लेख सापडतो.
कसे पोहोचणार
दोन दिवसांच्या सहलीचे नियोजन करून भीमाशंकरला जाता येते. कोकणातून कल्याणमार्गे आणि पुण्याहून मंचरमार्गे येथे पोचता येते. पुण्याहून भीमाशंकर 110 किलोमीटर आहे. बस किंवा मोटारीने येथे येणे सोपे आहे. पुण्याच्या शिवाजीनगर बस स्थानकातून नियमितपणे एसटीच्या बस सुटतात. नारायणगाव किंवा मंचरपर्यंत येऊनही तेथे दुसरी बस मिळू शकते. पुणे हा जवळचा विमानतळ आहे. मुंबईहूनही तेथे जाता येते. मुंबईहून बस किंवा लोकलने कर्जतपर्यंत यावे व तेथून खांडसची (सुमारे 40 किलोमीटर) बस पकडावी. सुमारे चार ते साडेचार तासांच्या प्रवासानंतर भीमाशंकरला पोचता येते.
शब्दांकन – शामल भंडारे.
=====
हे देखील वाचा: बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग – वैजनाथ
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.