कडक उन्हाळा सुरु झाला आहे. सूर्य डोक्यावर आला की घराबाहेर पाय ठेवावसाही वाटत नाही. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. या काळात वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची पातळी तमी होते आणि त्यामुळे सतत तहान लागते. अशावेळी आपण बाजारातील कोल्ड ड्रिंक्स किंवा फ्रिजमधील थंड पाणी पितो. पण वारंवार कोल्ड ड्रिंक्स आणि थंड पाणी पिणं शरीरासाठी अपायकारक असतं. (Homemade summer drinks)
कोल्ड ड्रिंकमध्ये असलेलं साखरेचं प्रमाण शरीरातील साखरेची पातळी वाढवून मधुमेहासारखे आजार देऊ शकतं. तर सतत थंड पाणी प्यायल्याने टॉनसिल्स दुखणं, खोकला येणं, सर्दी असे किरकोळ आजार होऊ शकतात. या उन्हाळ्यात अशा आजारांचा सामना करावा लागू नये सोबतच शरीरही थंड राहील याकरता काही खास उपाय पाहणार आहोत.
उन्हाळ्यात अतिथंड पेयांचा वापर करण्याऐवजी आपण घरगुती नैसर्गीत शीतपेयांचा वापर करायला हवा. ही घरगुती नैसर्गीक शीतपेय कोणती ते पाहूया. (Homemade summer drinks)
माठातील पाणी
उन्हाळ्यातील तहान भागवण्यासाठी मातीच्या माठात थंड झालेले पाणी प्यावं. ते मनासाठीही आल्हाददायक असतं. शरीराची हानीही ते योग्य रीतीने भरून काढतं. या माठात मोगऱ्याची फुले किंवा वाळ्याची पुरचुंडी घालून ठेवल्यास ते पाणी सुवासिक होते आणि उन्हाळ्याच्या कंटाळवाण्या वातावरणातही मन उत्साही राहतं.
लिंबूपाणी
उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर लगेचच पाणी प्यायल्यास उन्हाचा फटका बसण्याचा धोका जास्त असतो. अशावेळी थोडं थांबून लिंबूपाणी (पाणी + साखर + चिमूटभर मीठ + लिंबाचा रस) प्यायल्यास ऊन लागत नाही. मात्र लिंबूपाणी तयार केल्यावर लगेचच प्यावे, ते साठवून ठेवू नये. तसेच लिंबूपाणी गाळून घेऊन पिऊ नये. (Homemade summer drinks)
ताक/ मठ्ठा
दह्यापासून बनलेले ताक / मठ्ठा हा आणखी एक रामबाण उपाय. दही घुसळून त्यात थोडं पाणी आणि जिरेपूड घालून बनवलेले ताक आरोग्यासाठी फायदेशिर असते.
शहाळ्याचे पाणी
उन्हात फिरल्याने घाम येत असल्याने शरीरातील जलांश तसेच काही क्षारांसारख्या पदार्थांची कमतरता निर्माण होते. शहाळ्याचे पाणी हे अगदी सलाईनसारखे काम करते. उन्हामुळे उलट्या किंवा जुलाब झाल्यावरही याचा चांगला उपयोग होतो.
=====
हे देखील वाचा: आला उन्हाळा त्वचा सांभाळा – घरच्या घरी बनवा नैसर्गिक फेसपॅक
=====
जिरेपाणी
उन्हापासून बचावाचा आणखी एक मार्ग म्हणजे जिऱ्याचं पाणी. एका भांड्यात जिरे भिजवून ठेवून गरजेनुसार त्यात पाणी घालून प्यायल्यास उन्हाचा त्रास होत नाही. (Homemade summer drinks)
कोकम सरबत
कोकणात होणाऱ्या कोकमपासून बनवण्यात येणारे कोकमचे सरबतही या काळात अत्यंत उपयुक्त ठरते. तेही उत्तम तृप्ततादायक आहे.
या काळात उपलब्ध असणाऱ्या विविध फळांचेही रस पेय म्हणून शरीरासाठी लाभदायक आहेत. मोसंबी यांचेही रस या काळात चांगले उपयोगी ठरतात.
– वेदश्री ताम्हाणे