अनेकदा आपल्या घरातील व्यक्ती म्हणतात अरे रोज रोज या भाज्या खाऊन कंटाळा आला आहे. काहीतरी वेगळे करा. मग अशावेळेस घरातील स्त्री कडधान्य बनवताना दिसते. पोट भरीचे, भाजीला उत्तम पर्याय आणि अतिशय पौष्टिक. प्रत्येक घरात कडधान्य असतात म्हणजे असतात. मुख्य म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कडधान्य आवडते. त्यामुळे गृहिणींचे देखील एक टेन्शन कमी होते.
आता कडधान्य म्हटल्यावर अनेकांना फक्त मटकी हेच माहिती असते. मात्र मटकीसोबतच इतरही अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या कडधान्यांमध्ये येतात. यातलेच एक कडधान्य म्हणजे मूग. आजच्या धकाधकीच्या काळात अनेकदा आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. अशावेळेस अनेकदा आपण स्वतःची काळजी घेण्यासाठी सोपा आणि सोयीस्कर मार्ग शोधतो. त्यातला एक म्हणजे पौष्टिक खाणे. मग यातही करायला सोपे आणि लवकर होईल असे पदार्थ आपण शोधतो.
अशातलाच एक पदार्थ म्हणजे अंकुरित धान्य अर्थात कडधान्य. त्यातही मोड आलेले हिरवे मूग अधिकच चांगले आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते. कडधान्य खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. शरीर तंदुरुस्त राहून निरोगी राहते. कडधान्यांमध्ये मुबलक प्रमाणात खनिजे आणि अनेक पोषक घटक आढळून येतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे.
जर तुमच्याकडे जिममध्ये जाण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी वेळ नसेल तर काळजी करू नका. तुम्ही सकाळी उठून अंकुरलेले मूग खाण्यास सुरुवात करा. हा एक पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्नपदार्थ आहे. याचे सेवन केल्याने तुमचे शरीर तर तंदुरुस्त राहतेच शिवाय तुम्हाला अनेक आजारांपासून आराम मिळतो. चला जाणून घेऊया याच मोड आलेल्या हिरव्या मुगाचे आपल्या शरीरासाठी होणारे फायदे.
हृदयासाठी उत्तम
मोड आलेल्या मुगात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. हे हृदयाला निरोगी ठेवण्यास खूप उपयुक्त असते. दररोज सकाळी हिरव्या मुगाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते सोबतच आपल्या हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळून त्यांना पंपिंग करणे अधिक सोपे होते.
वजन नियंत्रणासाठी भक्कम
अंकुरित मुगामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे ते खाल्ल्याबरोबर लगेचच पचते. मोड आलेले मूग खाल्ल्याने पोटाची चरबी वाढत नाही आणि उंचीनुसार वजन संतुलित राहण्यास मदत होत असते. यामुळेच कलाकारांपासून, खेळाडू ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वच जणं नाश्त्यामध्ये मूग खायला प्राधान्य देताना दिसतात.
फोलेटचा मोठा स्रोत
गरोदर स्त्रियांना त्यांच्या प्रेग्नन्सीच्या काळात फोलेट नावाच्या एका पोषक तत्वाची मोठी गरज असते. यासाठी नेहमीच डॉक्टरांकडून अशा स्त्रियांना फोलेटयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. पोटातील बाळ पूर्णपणे विकसीत होण्यासाठी हे पोषक तत्व अतिशय गरजेचे असते. तेव्हा अशा स्त्रियांनी मोड आलेले मुग खाणे लाभदायक ठरू शकते. मुग हा फोलेटचा उत्तम स्त्रोत मानला जातो. मात्र खाण्याआधी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी
लग्न झालेल्या जोडप्यांनी हिरवे मोड आलेले मुग खाल्ले पाहिजे. या मोड आलेल्या मुगामध्ये प्रजनन क्षमता अधिक उत्तम आणि सक्षम बनवणारे गुणधर्म आणि तत्व असतात. म्हणून प्रजनन क्षमता संतुलित राखण्यासाठी मोड आलेल्या मुगांचे सेवन नक्कीच करावे.
डोळ्यांसाठी चांगले
मोड आलेले मूग हे व्हिटॅमिन ए चा मोठा स्रोत आहे. व्हिटॅमिन ए हे आपल्या चांगल्या दृष्टीसाठी आवश्यक असते. सोबतच यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर असते. हे घटक अँटिऑक्सिडंट्स असून, ते डोळ्यांना नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करतात.
घनदाट लांबसडक केसांसाठी
आजकाल केस गळणे किंवा पांढरे होण्याच्या समस्येने बहुतांश जनता चिंतीत आहे. असे लोक मोड आलेल्या मुगाच्या सेवनाने त्यांच्या समस्येवर मात करू शकतात. यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे डोक्यावरील केसांची मुळे मजबूत राहतात. तसेच केस लवकर सफेद न होण्यासाठीही याचा फायदा मिळतो.
डायबिटीस नियंत्रण
हाय डायबिटीस म्हणजेच मधुमेह असलेल्या लोकांसाठी मोड आलेले मूग खाणे चांगले मानले जाते. यामध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
======
हे देखील वाचा : जान्हवीला पती किरण किल्लेकरने दिला पाठिंबा
======
पोटाचे त्रास कमी
ज्यांना पोटदुखीचा त्रास होत असेल त्यांनी मोड आलेल्या मुगाचे सेवन सुरु केले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, यात फायबरचे प्रमाण चांगले असते, जे शरीरातील पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अतिसारापासूनही आराम मिळतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
आपल्याला निरोगी राहण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवणे आवश्यक आहे. कडधान्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.