Home » थंडीच्या दिवसात पेरू खाण्याचे फायदे…

थंडीच्या दिवसात पेरू खाण्याचे फायदे…

by Team Gajawaja
0 comment
Benefits of guava
Share

थंडीचे दिवस सुरु झाल्यावर बाजारात अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे येतात.  या सर्वांत येणारे उत्तम फळ म्हणजे पेरु. सर्वांना परवडणारे पेरु म्हणजे आरोग्य आणि सौदर्यांसाठी रामबाण उपाय आहे. चवीला तुरट, गोड आणि आंबट असणारा पेरु पोषक तत्वांनी युक्त असतो.  त्यामुळेच पेरु खाणे हे सर्वांसाठीच आरोग्यदायी असतात.    

पेरु या फळामध्ये भरपूर पोषक तत्व असतात.पेरु हा आरोग्यासाठी फायदेशीर आहे.  पेरुमुळे शरीरातील अन्नपदार्थांचे पचन योग्यप्रकारे होते.  त्यामुळे पचनसंस्थाही सुधारते.  पेरुच्या सेवनाने शरीराची त्वचाही चांगली होत असल्याचे डॉक्टर सांगतात.  पेरू हे मुख्यतः थंडीच्या मोसमात येणारे फळ आहे.  शरीरात असणारे वात, पित्त आणि कफ या तीन दोषांना संतुलित करण्याचे काम पेरुच्या सेवनानं होतं.  पेरूमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, सी, फॉलिक अॅसिड, खनिजे, पोटॅशियम, तांबे, मॅंगनीज यांचे प्रमाण मुबलक आहे.  याशिवाय पेरूमध्ये कॅरोटीनोइड्स आणि पॉलीफेनॉल ही दोन्ही तत्वे असतात ज्यामुळे त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदा होतो.

फक्त पेरु खाण्यानेच फायदे होतात असे नाही.  तर पेरुची पानेही औषधी आहेत.  पेरूची फळे, पाने आणि साल हे सर्व औषध म्हणून वापरले जाते. आम्लपित्त, पीरियड क्रॅम्प्स, तोंडाचे व्रण, मायग्रेन डोकेदुखी या सर्वांमुळे पेरुच्या सेवनानं फायदा होतोच, शिवाय काहीवेळा पेरुची पानेही खाल्यानं यात फायदा होता.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेरुचे फळ खाल्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल, सांधेदुखी यातही फायदा होतो.  पेरुच्या सेवनानं शरीरातील पौष्टिकतेची कमतरता दूर होते.  ताप असल्यासही पेरुच्या सेवनानं फायदा होतो.  विशेष म्हणजे वजन वाढीची समस्या अनेकांना त्रस्त करते, या समस्येला दूर करायचे असल्यास नियमीत पेरुचे सेवन केल्यास फायदा होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.   

महिलांना होणारा मासिक पाळीतील त्रास कमी कऱण्यासाठीही पेरुची मदत होते.  पेरुच्या पानांमध्येही चांगली ताकद असते.  यामुळे शारीरिक वेदना कमी करण्यास मदत होते.   काहीवेळा पाण्यात पेरुची पानं टाकून उकळली जातात.  हा काढा घेतल्यास शरीराला फायदा होतो.  पेरुची पानं टाकून उकळलेल्या पाण्यानं हिरड्यांमधून रक्त येणे थांबते आणि तोंडाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.  याशिवाय हे पाणी केसांसाठीही आरोग्यदायी ठरते.  या पाण्यामुळे केस धुतल्यानं केस गळणे थांबण्यास मदत होते. यासोबतच केसांच्या निरोगी वाढीला चालना मिळते.  पेरुचे सर्वागिण फायदे आहेत.  या पेरुच्या बिया या टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात.  पेरुच्या बिया खाल्यानं पचन प्रक्रीया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत होते.  

======

हे देखील वाचा : हिवाळ्यात ‘या’ गोष्टींचे करा सेवन, रहाल आजारपणापासून दूर

=====

पेरू हे मुख्यतः थंड फळ आहे.  त्यामुळे पेरु खाल्यावर काहींना कफ किंवा खोकल्याचा त्रास जाणवतो.  पण पेरु खातांना शक्यतो ताजा असल्यास लगेच खावा.  फ्रीजमध्य ठेवलेला पेरु लगेच खाऊ नये.  तसेच पेरु संध्याकाळनंतर खाऊ नये.  दुपारच्या जेवणाच्या एक तास आधी किंवा जेवणानंतर 2 तासांपर्यंत पेरु खाल्ला तर तो जवण पचवण्यासाठी उत्तम ठरतो आणि त्याचा शरीराला त्रासही होत नाही.  पण पेरु रात्री खाल्ला तर शरीराला त्याचा त्रास होतो.  ज्यांना पेरुचा त्रास होतो त्यांनी पेरु खातांना त्याच्यावर काळीमिरीची पावडर वापरावी त्यामुळे त्रास जाणवत नाही.  

पेरु हे मुख्यतः दक्षिण अमेरिकेचे फळ असल्याचे सांगतात.  काही वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. पेरुला जाम किंवा अमरूद असेही म्हणतात. आवळ्याच्या खालोखाल भरपूर क जीवनसत्त्व देणारे पेरु हे फळ आहे.  नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होत नाही. आता पेरुची पोषक तत्ते जाणून पेरू पासून आईसक्रिम आणि गोळ्या बनविल्या जातात.  

पेरुच्या विविध जाती आहेत.  पेरु आतून पांढरा किंवा गुलाबी रंगाचा असतो.  हे दोन्हीही पेरु चवीला गोड आणि रुचकर असतात.  पेरुमध्ये लखनवी पेरु ही जात सर्वाधिक गोड चवीची मानली जाते.  त्यापाठोपाठ बनारसी पेरुला मागणी आहे.  बनारसी ही पेरूची जात अत्यंत गोड असते,  पण थोड्या प्रमाणात आंबट असते. या जातीची झाडे सुद्धा जोमाने वाढतात.  हरिझा या जातीचे पेरुचे मोठ्या आकाराचे असते.  चवीला हे मोठे फळ गोड असते.  त्यामुळे त्यालाही मोठी मागणी आहे.  एकूण कुठल्याही जातीचा पेरु खाल्ला तरी त्याची चव ही गोडच असते.  त्यामुळे या थंडीच्या दिवसात येणारे पेरु हे नक्की खावे.

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.