आज सुद्धा मुलांना भूत-प्रेतांच्या कथा ऐकण्यास मजा येते. परंतु भूत-प्रेतांचे अस्तित्व केवळ कथांपर्यंतच मर्यादित राहिले आहे. आता पर्यंत असे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही ज्यामध्ये खरंच भूत असतात हे वास्तविकरित्या सिद्ध झाले आहे. पण या बद्दलचे दावे वेळोवेळी जरुर केले जातात. काही लोक असा दावा करतात की ते त्यांना पाहू शकतात. या बद्दलच्या विविध सत्य कथा ही सांगितल्या जातात. पण हे खरंच असं असेल का असा प्रश्न नेहमीच मनात निर्माण होतो. परंतु देशातच नव्हे तर जगात सुद्धा अशी काही हॉन्टेड ठिकाणं आजही आहेत जेथे जाण्यास सक्त मनाई केली जाते. अशातच देशात असे एक ठिकाण आहे जेथे भूतांच्या भीतीपोटी तब्बल ४२ वर्ष बंद ठेवले गेले होते. खरंतर हे एक रेल्वे स्थानक आहे. (Begunkodar Railway Station)
पश्चिम बंगाल मधील पुरुलिया जिल्ह्यातील बेगुनकोडोर रेल्वे स्थानक. १९६० मध्ये सुरु झाल्यानंतर सुरुवातीला सर्वकाही ठिक होते. परंतु सहा वर्षानंतर म्हणजेच १९६७ रोजी जेव्हा स्थानक बंद केले. कारण काही रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्थानकात एका महिलेचे भूत पाहिल्याचा दावा केला होता. ही अफवा खुप पसरली गेली.
खरंतर एका महिलेचा मृत्यू रेल्वेने धडक दिल्याने झाला होता. सुरुवातीला लोकांचा या अफवेवर विश्वास बसत नव्हता. पण नंतर स्टेशन मास्तरांनी रात्रीच्या वेळी काळोखात एक सफेद साडीतील महिलेला चालताना पाहिले. हैराण करणारी गोष्ट होती की, काही दिवसानंतर स्टेशन मास्तर आणि त्याच्या संपूर्ण परिवाराचा मृत्यू रेल्वे क्वार्टर्समध्ये झाला. त्यांचे मृतदेह घरात सापडले.
रेल्वे कॉलनीत राहणाऱ्या लोकांनी दावा केला की, स्टेशन मास्तर आणि त्याच्या नातेवाईकांच्या मृत्यूमागे त्या भूताचाच हात होता. या घटनेनंतर लोकांनी संध्याकाळ होताच स्थानकात थांबणे बंद केले होते. या स्थानकाला भुताटकी स्थानक म्हटले जाऊ लागले होते.(Begunkodar Railway Station)
हेही वाचा- १३ वेळा हल्ले केल्यानंतरही मुघल-इंग्रजांना जिंकता आला नाही लोहागढ
या स्थानकाबद्दल खुप चर्चा झाली. असे ही बोलले जाऊ लागले होते की, संध्याकाळ नंतर जेव्हा एखादी ट्रेन स्थानकातून धावल्यानंतर त्या महिलेचे भूत सुद्धा ट्रेनच्या मागे पळत सुटायचे. या व्यतिरिक्त काही लोकांनी भूताला रेल्वच्या रुळांवर नाचताना सुद्धा पाहिल्याचा दावा केला होता. या घटनेनंतर स्थानक तब्बल ४२ वर्षांसाठी बंद केले होते. या दरम्यान एकही ट्रेन तेथे थांबवली जात नव्हती. पण २००९ मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानंतर पुन्हा ते सुरु केले गेले.