राजस्थानला (Rajasthan) शौर्य भूमी म्हटलं जातं. लाल दगडाचे भक्कम किल्ले असलेल्या या भूमीत देवीची अनेक मंदिरे आहेत. येथील शाकंभरी मातेचे मंदिर जगविख्यात आहे. देवी शाकंभरीला राजस्थानची दुर्गा असे म्हटले जाते. जयपूर जिल्ह्यातील सांभर शहराजवळील सांभार तलावात हे माता शाकंभरीचे मंदिर आहे. हे मंदिर अतिप्राचीन असून ते राणा पृथ्वीराज चौहान यांच्या काळातील मानले जाते. या मंदिराची गणना शक्तीपीठांमध्ये होत नसली, तरी त्याचे पौराणिक महत्त्व तेवढेच आहे. शिवाय ही शाकंभरी माता अत्यंत जागृत असल्याचेही सांगितले जाते. शाकंभरी देवी ही चौहानांची कुलदैवत असल्याचे सांगितले जाते. मातेचे मुळ मंदिर उत्तरप्रदेशमधील सहारनपूरजवळ शिवालिक पर्वतावर होते. चौहान घराण्याच्या पूर्वजांनी मातेची सांभार येथे स्थापना केली. तेव्हापासून राजस्थानातील (Rajasthan) लोकदेवी म्हणूनही शाकंभरी मातेला मान देण्यात येतो. असे असले तरी ही माता शाकंभरीची मुर्ती ही स्वयंभू असल्याचेही सांगण्यात येते. मातेच्या मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त मोठी जत्रा भरते. तसेच मातेचे भक्त देशविदेशातून आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात. कोरोना काळ वगळता दरवर्षी येथे नवरात्रौत्सव मोठ्या उत्सहानं साजरा होतो. आताही माता शांकभरीच्या या उत्सवासाठी तयारी सुरु झाली असून मोठ्या प्रमाणात येणा-या भक्तांसाठी सुविधा करण्यात येत आहेत.
शाकंभरी माता हा दुर्गेचा अवतार मानला जातो. शाकंभरी मातेची देशभरात तीन शक्तीपीठे आहेत. उत्तरप्रदेशमधील सहारनपूर येथे असलेल्या शक्तीपीठानंतर येथे सर्वात जुने शक्तीपीठ म्हणून जयपूरमधील सांभरमधील माते शाकंभरीचे मंदिर सर्वाधिक लोकप्रिय आहे. जयपूरपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या सांभर शहरात असलेल्या मां शाकंभरी मंदिराची स्थापना आठव्या शतकात झाली असल्याचे सांगण्यात येते. मात्र हे मंदिर 2500 वर्षे जुने असल्याची माहिती देवीचे भक्त देतात. देवीच्या मंदिराबाबत पौराणिक आख्यायिकाही सांगण्यात येतात. त्यानुसार एके काळी दुर्गम नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर दहशत निर्माण केली होती. त्याच्या अत्याचारानं पृथ्वीवर सलग शंभर वर्षे पाऊस पडला नाही. पाण्याअभावी सर्वत्र दुष्काळ पसरला. मनुष्य आणि प्राणीही मरु लागले. सर्वत्र भयाण अवस्था निर्माण झाली. तेव्हा देव आणि ऋषींनी मिळून हिमालयाच्या शिवालिक पर्वतराजीच्या पहिल्या शिखरावर माता भगवतीची पूजा केली. (Rajasthan)
या पुजेमुळे माता भवानीच्या रूपात अवतरली. मातेच्या कृपेनं पृथ्वीवर पाऊस पडला. शिवाय देवीनं पृथ्वीला फळांनी डवरलेल्या वृक्षांनी भरुन टाकले. त्यामुळे मृतवत झालेल्या पृथ्वीवरील सजीवांना जीवदान मिळाले. हिरवा भाजापाला आणि फळा फुलांची देवी म्हणून देवीला शाकंभरी असे नाव पडले. यानंतर संपूर्ण जग हिरवेगार झाले, आणि सर्वत्र संपन्नता आली असे सांगण्यात येते. शाकंभरी माता ही राजस्थानातील चौहान घराण्याची कुलदेवता असली तरी सर्व जाती-समाजातील लोक तिची पूजा करतात. माता शाकंभरीच्या पराक्रमाचे वर्णन महाभारत, शिवपुराण आणि मार्कंडेय पुराण यांसारख्या धार्मिक ग्रंथांमध्येही आहे. (Rajasthan)
या मंदिरातील माता शाकंभरीच्या मुर्तीबाबतही अनेक आख्यायिका आहेत. देवीचे भक्त सांगतात की, देवीची ही प्रसिद्ध मूर्ती जमिनीतून प्रकट झाली आहे. तसेच काहींच्या मते चौहान घराण्याच्या राजांनी ही मुर्ती बनवून घेतल्याचे सांगितले जाते. चौहान घराण्याचे राजे वासुदेव यांनी सातव्या शतकात शाकंबरी माता मंदिराजवळ सांभर तलाव आणि सांभर शहराची स्थापना केली. पौराणिक कथेनुसार सांभार हा शाकंभरीचा अपभ्रंश मानला जातो.
देवी शाकंभरीची अनेक रुपे आहेत. वैष्णो देवी, चामुंडा, कांगडा वाली, ज्वाला, चिंतापूर्णी, कामाख्या, शिवालिक पर्वत वासिनी, चंडी, बाला सुंदरी, मानसा, नैना आणि शताक्षी देवी या अनेक रूपांमध्ये शाकंभरी देवीची पूजा केली जाते. भारतात देवीची अनेक भव्य मंदिरे असले तरी राजस्थानचे हे देवीचे मंदिर नेहमी भक्तांनी फुललेले असते. या मंदिराचे महत्त्व एवढे आहे की, आचार्य चाणक्य आणि त्यांचा परम शिष्य चंद्रगुप्त यांनीही येथे काही काळ तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. (Rajasthan)
या मंदिरात आठव्या शतकापूर्वीचे एकमुखी शिवलिंग देखील आहे. हे शिवलिंग आदि शंकराचार्यांनी स्थापल्याचे सांगितले जाते. शंकराचार्य काही काळ या मंदिर परिसरात वास्तव्याला होते. त्यांनी एक आश्रम बांधला. त्यांनीच माता शाकंभरीच्या उजव्या बाजूला भीमा आणि भ्रामरी देवीची मूर्ती आणि डाव्या बाजूला शताक्षी देवीची मूर्ती स्थापन केली. माता शाकंभरीचे हे पीठ महाभारत काळात घनदाट जंगलात हरवले. नंतर काही काळानंतर मंदिराचा शोद नैन गुजर नावाच्या अंध व्यक्तीनं लावला. त्याला देवीनं दर्शन दिल्याची कथा आहे. देवीच्या मंदिर परिसरातच एक भव्य तलाव असून त्याला मिठाचे सरोवर म्हणतात. या तलावामुळे लुप्त झालेल्या माता शाकंभरी मंदिराचा पुन्हा एकदा शोध लागला. (Rajasthan)
============
हे देखील वाचा : चामुंडा माता मंदिराच्या यात्रेसाठी तयारी सुरु
============
चौहान घराण्याची कुलदेवी असलेल्या माता शाकंभरी मंदिरात शुभकार्य करण्यापूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होते. तसेच नवरात्रौत्सवात देशविदेशातील देवीचे भक्त देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. या मंदिर परिसरात असलेल्या वनसंपदेमध्ये अनेक आयुर्वेदिक औषध असल्याचीही माहिती आहे. या औषधी वनस्पती शोधण्यासाठीही अनेकांची या परिसरात गर्दी असते.
सई बने.