सिरियाचा माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असदच्या अत्याचाराच्या कहाण्या आता बाहेर येऊ लागल्या आहेत. आपला देश अत्यंत हालाखित असतांना राजेशाही थाटात राहणारा हा राष्ट्राध्यक्ष क्रूर होता. त्यांनी लाखो नागरिकांना मारले आहे. त्याचे अनेक तुरुंग असून बशर पळून गेल्यापासून या तुरुंगात डांबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. हे तुरुंग नरक म्हणून ओळखळे जात असत, यात कैद असलेल्या अनेक नागरिकांनी दहा ते बारा वर्षापासून सूर्याची किरणेही पाहिलेली नाही. असे नागरिक जेव्हा तुरुंगातून बाहेर आले, तेव्हा ते चालण्याच्या परिस्थितही नव्हते. सिरियाच्या असद कुटुंबाने आपल्या राजवटीला विरोध करणा-या प्रत्येक विरोधकाला संपवण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना फक्त मारण्यावरच त्यांचा जोर नव्हता, तर यामुळे अन्य नागरिकांवर दहशत बसेल अशा पद्धतीनं विरोधकांना मारण्यात येत असे. त्यात अगदी गळा कापण्यापासून ते केमिकलची इंजक्शने देण्यापर्यंत क्रूर शिक्षा होत्या. (Bashar Al-Assad)
या सर्वात बशर अल-असद याचे नाव जेवढे पुढे येते, तेवढेच नाव पुढे आहे, ते त्याच्या पत्नीचे, अस्मा हिचे. लंडनमध्ये जन्मलेली आणि उच्चविद्याविभुषीत असलेली अस्मा ही कमालीची सुंदर आहे. बशरसोबत तिचे लग्न झाले तेव्हा तिला वाळवंटातील गुलाब ही पदवी देण्यात आली. अस्मा ही मुस्लिम कुटुंबातील असली तरी ती आधुनिक विचारसरणीची होती. तिनं कधीही हिजाब घातला नाही. अगदी सिरियाची सून झाल्यावरही. त्यामुळेच मिडलइस्टमधील मुस्लिम महिलांसाठी ती स्वातंत्र्याची देवी ठरली होती. पण नव्याचे नऊ दिवस असतात, असेच अस्माच्या बाबतीत झाले. नंतर याच अस्मानं बशरच्या सर्वच काळ्या कारवायांना भरभरुन पाठिंबा दिला. शिवाय बशरच्या विरोधकांना संपवण्यासाठी अस्माचा जास्त पुढाकार असायचा. त्यामुळेच अस्मा नंतर ‘फर्स्ट लेडी ऑफ हेल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. बशर अल असद आता स्वतःचा जीव वाचवून रशियाला पळून गेला आहे. सिरियामध्ये त्याच्या राजमहालाची नागरिकांनी लूट केली आहे. त्यासोबत बशरचे फोटोही नागरिकांनी फाडून टाकले आहेत. फक्त बशरचे फोटोच नाही तर बशरची पत्नी अस्मा हिच्या वस्तूंवरही डल्ला मारत सिरियाच्या नागरिकांनी त्यांची होळी करत आपला राग व्यक्त केला आहे. 2000 साली बशर आणि अस्मा यांचे लग्न झाले. (International News)
लंडनची अस्मा बशरसोबत सिरियाला आल्यावर तिला वाळवंटातील गुलाब म्हणण्यात आले. याला कारण ठरले ते अस्माचे अस्मानी सौदर्य. मात्र याच अस्मानं नंतर दहशतवाद्यांना हाताशी पकडून सिरियामध्ये दडपशाही राबवली. आता बशरच्या पतनासाठी त्याची पत्नीही तेवढीच कारणीभूत असल्याची चर्चा आहे. बशर आणि अस्मा यांचे 2000 साली लग्न झाले आणि तेव्हाच बशरला सिरियाची सत्ता मिळाली. त्यावेळी लंडनमध्ये वाढलेल्या अस्माची ओळख पश्चिम आशियातील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक अशी होती. पण बशरसोबत तिची भुमिका प्रचंड बदलली. अस्मा हिचा जन्म 1975 मध्ये लंडनमध्ये झाला. अस्माचे वडील फवाज अखरस हे डॉक्टर आहेत आणि आई सहार ही सीरियन दूतावासात मुत्सद्दी होती. हे दोघे अजूनही लंडनमध्ये राहतात. पश्चिम लंडनमधील आलिशान घरात वाढलेल्या अस्माने किंग्ज कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे. ती कॉम्प्युटर सायन्स आणि फ्रेंच साहित्यात पदवीधर आहे. यानंतर अस्मानं एमबीएची पदवी घेतली आणि एका प्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट बँकेत कामही केले. 90 च्या दशकात ती सुट्टीसाठी सीरियाला आली आणि तिची बशरसोबत भेट झाली. तेव्हा बशर लंडनमध्ये नेत्र चिकित्सक म्हणून काम करत होता. त्यांचे लग्न झाले, त्याच वर्षी बशर सिरियाचा राष्ट्राध्यक्ष झाला. अस्मा बशर पहिल्यांदा मिडियासमोर बुरखा न घालता आली. (Bashar Al-Assad)
========
हे देखील वाचा : सिरियाचा नवा हुकुमशहा !
========
ही गोष्ट क्रांतीकारी मानली गेली. नंतरच्या काळात बशरसोबत अस्मा हटकून जात असे, त्यामुळे तिचे राजकीय महत्त्व वाढले. 2005 मध्ये, अस्माने सीरियन तरुणांना देशाबद्दल जागरूक करण्यासाठी एक संघटना स्थापन केली. 2010 मध्ये, व्होग मासिकाने अस्माला ‘वाळवंटातील गुलाब’ आणि “तीक्ष्ण मनाची सुंदर स्त्री” असे वर्णन केले. पण पुढच्याच वर्षी बशर अल असदनं सिरियात लष्कराचा वापर सुरु केला आणि त्याला अस्मानं पाठिंबा दिला. त्यानंतर अस्मा ही बशरच्या दडपशाही धोरणांच्या मागची खरी सूत्रधार असल्याची माहिती पुढे आली. बशरनं ड्रग्जच्या व्यापारात जे खो-यानं पैसे कमावले त्यांचे नियोजनही अस्माच्याच हाती होते. सिरियात जो हिंसाचार आणि खुलेआम हत्याकांड घडवले गेले, त्यामागे अस्माच असल्याचा आरोप तेथील जनता करते. त्यामुळेच अस्माला नंतर सिरियाचा नरक म्हणूनही संबोधले जात असे. सिरियात गृहयुद्ध झाल्यापासून अस्मा आपल्या तीन मुलांना घेऊन लंडनला गेल्याची माहिती आहे. अस्माचे आई-वडिल हे दोघंही सिरियन मुत्सदी म्हणून काम पहात आहेत. त्यांच्याच सल्ल्यानं पुढे बशरनं सिरिया सोडल्याची माहिती आहे. बशरनं आपली करोडोची संपत्ती सिरियामध्येच सोडली असली तरी या कुटुंबाकडे 200 टन सोन्याची मालकी असल्याची माहिती आहे. शिवाय अस्मानं आधीच बशर कुटुंबियांची मोठी संपत्ती अन्य देशात सुरक्षित केल्याचीही माहिती आहे. आता ही अस्मा रशियामध्ये असून लंडनमधील तिच्या आई वडिलांच्या संपर्कात आहे. बशर अल-असदच्या कुटुंबियांच्या सिरियामधील परत जायच्या वाटा बंद झाल्या असून त्यामध्ये सर्वात मोठा वाटा याच अस्माचा असल्याची चर्चा आता सुरु आहे. (International News)
सई बने