राधाराणीची नगरी म्हणून ओळखल्या जाणा-या बरसाणा मधील लाठमार होळी (Lathmar Holi) जगप्रसिद्ध आहे. बरसाणा येथे लाडूंच्या होळीनंतर लाठमार होळी खेळली जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हीच परंपरा नांदगावमध्ये पाळली जाते. ही होळी पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक बरसाणा आणि नांदगाव येथे येतात. आठवडाभर हा सर्व परिसर या भाविकांची गर्दी असते….गेल्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या सावटानंतर यावर्षी ही लाठमार होळी अधिक उत्साहानं साजरी होणार आहे. यामुळेच ही लाठमार होळी (Lathmar Holi) नेमकी कधी आहे, याची उत्सुकता लागली होती. फाल्गुन महिन्यातील शुक्ल नवमी तिथीला लाठमार होळी खेळली जाते. यावर्षी 28 फेब्रुवारी 2023 रोजी लाठमार होळी (Lathmar Holi) खेळली जाणार आहे. यानिमित्त येणा-या पर्यटकांच्या स्वागतासाठी आता या भागात तयारी करण्यात येत आहे.
फाल्गुन महिन्यातील होळी हा सण देश-विदेशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. परंतु रंगांच्या होळीपूर्वी ब्रजवासींची होळी साजरी करण्याची स्वतःची वेगळी वेगळी पद्धत आहे. इथे कुठे फुलांची होळी, कुठे रंग-गुलाल, कुठे लाडू तर कुठे लाठमार होळी (Lathmar Holi) खेळण्याची परंपरा आहे. दरवर्षी जगभरातून हजारो भाविक लाठमार होळी (Lathmar Holi) पाहण्यासाठी बरसाना येथे येतात. ही होळी राधा-कृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक मानली जाते. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला लाठमार होळी (Lathmar Holi) खेळली जाते. तर नांदगावमध्ये दशमी तिथीला ही होळी खेळली जाते. या होळीमध्ये खास रंगांचा वापर केला जातो. हे रंग स्थानिक फुलांपासून बनवले जातात.

ही होळी साजरी करण्यामागे मोठी पौराणिक मान्यता आहे. पौराणिक मान्यतेनुसार द्वापरयुगात नांदगाव मध्ये रहाणारा बाळ कृष्ण आपल्या मित्र गोपाळांसह बरसाना येथे राधा राणी आणि इतर गोपींसोबत होळी खेळायचा. होळी खेळतांना गोपींची मस्करी करणा-या छोट्या कृष्णाला धडा शिकवण्यासाठी राधा कृष्ण आणि त्याच्या गोपाळांमागे काठी घेऊन धावली. शेकडो वर्षापूर्वीपासून मग अशाच पद्धतीनं या भागात होळी खेळली जात आहे. परंपरेला अनुसरून दरवर्षी फाल्गुन महिन्यात बरसाणा येथील महिला आणि नांदगावचे पुरुष लाठमार होळी खेळतात. नांदगावचे पुरुष कृष्णाची ढाल घेऊन कमरेला काठ्या बांधतात तर महिलावर्ग राधेच्या भुमिकेत जातो. मग या राधा झालेल्या महिला पुरुषांना लाठीनं मारतात. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात होणारा हा खेळ बघण्यासाठी खूप गर्दी होते.
होळी खेळतांना नांदगावचे गट रंग, गुलाल घेऊन महिलांसोबत होळी खेळण्यासाठी बरसाणा येथे पोहोचतात. यावेळी गोपी झालेल्या महिला काठ्या आणि गुलालाने त्यांचे स्वागत करतात. मग महिला या गटावर लाठ्या-काठ्यांचा मारा करतात. यापासून वाचण्यासाठी पुरुष ढालीच्या साहाय्याने लाठ्यांपासून सुटण्याचा प्रयत्न करतात. लाठमार होळी गाणी म्हटली जातात. राधा – कृष्ण यांची नावं गुंफलेली ही गाणी सर्वजण म्हणतात. त्यामुळे हा सगळा माहौल उत्सवाचा बनून जातो. दुसऱ्या दिवशी असाच सोहळा नांदगावात होतो. नांदगाव आणि बरसाणा येथील जनतेची श्रद्धा आहे की, या होळीप्रसंगी स्वतः श्रीकृष्ण आसपास असतात. ही परंपरा पाच हजार वर्षांपूर्वी सुरू झाल्याचे सांगितले जाते.
=======
हे देखील वाचा : युक्रेन-रशियानंतर आता ‘या’ दोन देशामध्ये होणार युद्ध?
=======
ब्रजमधील ही होळी साधारण दीड महिना आधीच सुरु होते. होळीच्या काठ्यांनी कुणालाही दुखापत होत नाही, अशी नांदगाव, बरसाणा येथील लोकांची श्रद्धा आहे. दुखापत झाली तरी त्या जखमांवर माती मिसळून पुन्हा ही मंडळी या खेळात रंगून जातात. यात भाग घेणा-या पुरुषांना हुरियारे आणि महिलांना हुर्रियारिन म्हणतात. ही सर्व भाग घेणारी मंडळी स्थानिक भाषेत राधाराणी आणि श्रीकृष्णाची गाणी गात असतात. “कान्हा बरसाने में आयी जयो बुले गई राधा प्यारी”, “फाग खेलन आये है नटवर नंद किशोर” आणि “उडत गुलाल लाल भाये बदरा” अशी गाणी गायली जातात. “सब जग होरी, जा ब्रज होरा” म्हणजे ब्रजची होळी सर्वात अनोखी आहे, असे या गाण्यातून म्हटले जाते. ही अनोखी होळी यावर्षी अधिक उत्साहात साजरी होणार आहे.
सई बने