देशभरात रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा झाला. काही ठिकाणी तो आज साजरा केला जाईल कारण रक्षाबंधन नक्की कधी? या प्रश्नावर बरेच तर्कवितर्क झाले. असो. आपल्या भावाला उंदड आयुष्य मिळो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि त्याची किर्ती सर्वदूर होवो, हीच इच्छा प्रत्येक बहिणीची असते. भावाला राखी बांधण्यापूर्वी बहिणी देवाची प्रार्थना करुन भावाचे सुख मागतात. पण या दिवसासाठी एक खास मंदिर आहे, याची आपल्याला कल्पना आहे का? या मंदिराचं नाव आहे बंशीनारायण किंवा वंशीनारायण मंदिर ( Banshi Narayan Mandir).

भारताच्या प्राचीन इतिहासात अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्यामध्ये उत्तराखंडातील अनेक मंदिरांचा उल्लेख आहे. त्यापैकीच एक प्रमुख मंदिर म्हणजे बंशीनारायण किंवा वंशीनारायण मंदिर (Banshi Narayan Mandir). उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात जोशीमठ भागात हे मंदिर असून ते फक्त वर्षातून एकदाच उघडते, तेही रक्षाबंधनाच्या दिवशी.
बंशीनारायण मंदिर ( Banshi Narayan Mandir).
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील उरगाम खोऱ्यात हे मंदिर आहे. मंदिराचा संपूर्ण परिसर नितांत सुंदर असल्यानं तिथे कायम पर्यटकांचा ओढा असतो. शिवाय या दाट दऱ्या – खोऱ्यांमध्ये ट्रेकींगची आवड असलेल्या ट्रेकरचीही गर्दी असते. मंदिराचे स्थान असलेल्या उरगम खोऱ्याला स्थानिक भाषेत ‘बुग्याल’ असेही म्हणतात. दाट दऱ्यांनी वेढलेल्या या भागाला भेट देणेही सुखावह असतो.
भगवान विष्णू वामन अवतारातून मुक्त झाल्यानंतर या मंदिरात प्रकट झाल्याचे मानण्यात येते. तेव्हापासून येथे भगवान नारायणाची पूजा केली जाते. या मंदिराची उंची आतून फक्त 10 फूट आहे. मंदिराची आतील उंची फक्त 10 फूट आहे. मंदिराचे गर्भगृह चौकोनी आहे. या मंदिरात भगवान श्री हरी विष्णू चतुर्भुज रूपात विराजमान आहेत.

येथील पुजारी राजपूत आहेत. दरवर्षी मंदिर राखीपौर्णिमेला सजवले जाते आणि विशेष पुजा केली जाते. स्थानिक लोक भगवान नारायणाला आपल्या घरात केलेले ‘लोणी’ या दिवशी प्रसाद म्हणून अर्पण करतात. अविवाहित मुली तसेच विवाहित महिला आधी भगवान नारायणाला राखी बांधून मगच भावांच्या मनगटावर राखी बांधतात.
मंदिरात भगवान नारायण, भगवान शिव या दोघांच्याही मूर्तीसह गणपती आणि वनदेवीचीही मूर्ती आहे त्याचीही पूजा वर्षातून एकदाच केली जाते. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी फक्त पायवाट आहे आणि त्याची माहिती स्थानिकांना असल्यामुळे बाहेरील पर्यटकांना स्थानिकांच्या मार्गदर्शनावर अवलंबून रहावे लागते. मात्र स्थानिकही या पर्यटकांना सर्व सुविधा उपलब्ध होतील अशी काळजी घेतात. त्यामुळे मंदिरापर्यंतचा अवघड प्रवास सुखकर होतो.
====
हे देखील वाचा – ताजमहालावर दिव्यांची रोषणाई का केली जात नाही?
====
बन्सी नारायण मंदिर ट्रेक
बन्सी नारायण मंदिराचा ट्रेक देवग्रामपासून सुरू होतो आणि सुमारे 12 ते 15 किमी लांबीचा आहे. पायी जाण्याचे हे अंतर खूप वाटत असले तरी या सर्व भागातील निसर्गाचे सौदर्य बघत हा रस्ता कधी पार होतो हे समजतही नाही. हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे 13000 फूट उंचीवर आहे. या मंदिराचे बांधकाम सहाव्या शतकापासून ते आठव्या शतकातील असल्याचे सांगतात. स्थानिकांच्या मते पांडवांनी या मंदिराची निर्मिती केली आहे.
मंदिर वर्षातून एकच दिवस का उगडले जाते?
हरी नारायणाचे हे मंदिर दरवर्षी राखीपौर्णिमेच्या दिवशी सुर्योदयाला उघडण्यात येते आणि सूर्योस्ताला त्याचे दरवाजे बंद होतात. बाकी 364 दिवस हे मंदिर मग बंदच रहाते. रिती रिवाजानुसार स्थानिक महिला आणि मुली आपल्या भावांना राखी बांधण्यापूर्वी परमेश्वराची पूजा करतात. या सर्वांबाबत स्थानिकांमध्ये अनेक कथा सांगितल्या जातात.
बन्सी नारायण मंदिर वर्षाचे 364 दिवस बंद का असते, याचे उत्तर पुराणात असल्याचे इथले नागरिक सांगतात आणि या बंदच्या दिवसात या मंदिरात जाण्याचाही ते प्रयत्नही करीत नाहीत. मान्यतेनुसार त्या काळात येथे देव ऋषी नारद भगवान नारायणाची पूजा करतात. एकदा देव ऋषी नारद श्रावण पौर्णिमेला भगवान बन्सी नारायणाची पूजा करू शकले नाहीत कारण ते माता लक्ष्मीसह स्वर्गलोकात गेले होते. त्या दिवशी कालगोठ गावातील जख पुजारी यांनी भगवान बन्सी नारायण यांची पूजा केली. त्या दिवसापासून श्रावण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी कालगोठचे पुजारी दरवाजे उघडून त्यांची पूजा करतात आणि सूर्यास्तानंतर पुन्हा वर्षभरासाठी दरवाजे बंद केले जातात.

यामागे कथा काहीही असली तरी स्थानिक महिला या दिवशी मोठ्या भक्तीभावानं बन्सी नारायण मंदिरात भगवान नारायणाला राखी बांधण्यासाठी जातात. यासाठी किती किलोमिटरचे अंतर पायी कापावे लागेल याची त्या पर्वा करीत नाहीत. आपल्या भावावर भगवान नारायणाची कृपा रहाण्यासाठी बहिणींची ही पायपीट नक्कीच प्रसन्न वातावरणात होत असणार
– सई बने