– श्रीकांत ना. कुलकर्णी
”बांगला देशचा स्वातंत्र्यदिन २६ मार्च रोजी पार पडला. त्यानिमित्त बांगला देशात पार पडलेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांचा हा दोन दिवसांचा दौरा बराच गाजला. कारण त्या सोहोळ्यात बोलताना श्री नरेंद्र मोदी यांनी, आपण स्वतः बांगला देश (‘शोनार बांगला’) स्वतंत्र होण्यासाठी झालेल्या सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवास भोगला होता असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियातून अनेकांनी खिल्ली उडविली होती.
तसेच प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील मोदी यांच्या या बांगला देश दौऱ्याला तीव्र हरकत घेतली होती. प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुका चालू असताना पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या फायद्यासाठी मुद्दाम बांगला देशला भेट दिली असा त्यांचा आक्षेप होता. अर्थात त्यांच्या या आक्षेपाची फारशी कोणी दखल घेतली नाही. भारताचे तत्कालीन लष्करप्रमुख म्हणून बांगला देश युद्धात महत्वाची कामगिरी बजावणारे जनरल माणेकशा यांनी देखील त्यावेळी युद्धानंतर असेच एक वादग्रस्त विधान केले होते. त्यांचा जन्मदिन नुकताच (२ एप्रिल) साजरा झाला. त्यानिमित्त साहजिकच त्यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्याची आठवण झाली म्हणून हा लेखनप्रपंच.
बांगला देश युद्धात भारतीय लष्कराने फार मोठी महत्वाची कामगिरी बजावली होती. भारतीय जवानांनी गाजविलेल्या अतुलनीय शौर्यामुळेच बांगला देशाला पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात विजय मिळाला होता. या युद्धात पाकिस्तानचे बांगला देशातील लष्करप्रमुख जनरल नियाझी यांना सुमारे एक लाख पाकिस्तानी सैनिकांसह सपशेल शरणागती पत्करावी लागली होती.
अर्थात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी पाकिस्तानला कायमचा धडा शिकविण्याच्या हेतूनेच बांगला देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाला पाठिंबा दिला होता हे उघड सत्य होते. त्यामुळे या विजयानंतर इंदिरा गांधी यांची देशातील आणि ‘जागतिक प्रतिमा’ अधिकच उंचावली गेली.
तत्कालीन जनसंघाचे नेते अटलबिहारी बाजपेयी यांनी तर संसदेत बोलताना इंदिरा गांधी यांचा ‘दुर्गा’ या शब्दात गौरव केला होता.
बांगला देशाच्या युद्धातील विजयानंतर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना तत्कालीन लष्करप्रमुख जनरल माणेकशा (Sam Manekshaw) यांनीही भारतीय लष्कराच्या कामगिरीचे कौतुक केले. या पत्रकारपरिषदेला देशी आणि विदेशी पत्रकारांनी साहजिकच प्रचंड गर्दी केली होती. पत्रकारपरिषद संपत आली असताना एका पत्रकाराने माणेकशा यांना सहज गमतीने एक प्रश्न केला, ”जर या युद्धाच्या वेळी तुम्ही पाकिस्तानचे बांगला देशातील लष्करप्रमुख असता तर काय झाले असते?” (पत्रकारांना ‘जर-तर’चे प्रश्न विचारायची सवय असतेच.)
त्यावेळी माणेकशा यांनी हसत हसत ”तर कदाचित उलटे चित्र दिसले असते” असे उत्तर दिले. थोडक्यात, मी पाकिस्तानचा बांगला देशातील लष्करप्रमुख असतो तर भारताचा पराभव झाला असता असा त्यांच्या त्या विधानाचा उघड अर्थ होता त्यांच्या या उत्तरातील खोच काही जणांच्या आणि खुद्द त्यांना उशीरा लक्षात आली. आपले हे विधान वादग्रस्त ठरणार हे लक्षात आल्यावर जनरल माणेकशा यांनी, ”तसे मी विनोदाने म्हणालो होतो ” असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी ‘बाण’ सुटून गेला होता.
जनरल माणेकशा यांची ‘त्या’ विधानाची अनेक वृत्तपत्रांनी गंभीर दखल घेतली आणि खास अग्रलेख लिहून माणेकशा यांच्यावर तिखट शब्दात टीका केली. औरंगाबादच्या मराठवाडा या दैनिकाचे संपादक अनंतराव भालेराव यांनी आपल्या अग्रलेखात ”मूर्खांचा विनोद ऐकू नये आणि कुरूप स्त्रीशी कधी शृंगार करू नये” अशा शब्दात माणेकशा यांच्या त्या विधानाचा समाचार घेतला होता. असे असूनही लष्करप्रमुख जनरल माणेकशा यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नंतर ‘फिल्ड मार्शल’ हा सर्वोच्च लष्करी किताब देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.
-श्रीकांत ना. कुलकर्णी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)