Home » भारतीय वस्तूंवर बहिष्कार करुन बांगलादेश होतोय कंगाल !

भारतीय वस्तूंवर बहिष्कार करुन बांगलादेश होतोय कंगाल !

by Team Gajawaja
0 comment
Bangladesh
Share

बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणा-या अत्याचाराची परिसीमा झाली आहे. भारतातून बांगलादेशमध्ये जात असलेल्या वस्तूंची होळी कऱण्यात येत आहे. भारतातून बांगलादेशात चहा, तांदूळ, गहू, साखर अशा जीवनावश्यक वस्तूंसह औद्योगिक उपकरणे, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू मोठ्या प्रमाणात पाठवण्यात येतात. तसेच औषधे आणि वैद्यकीय उपकरणेही पाठवली जातात. याशिवाय भारतीय कपडेही मोठ्या प्रमाणात बांगलादेशमध्ये निर्यात केले जातात. मात्र आता याच भारतीय वस्तूंची होळी करत बांगलादेश स्वतःच्याच पायावर दगड मारुन घेत आहे. कारण बांगलादेशमध्ये कितीही भारतद्वेष बाळगला गेला तरी भारतीय वस्तूंवरच बांगलादेश चालत आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. सध्या भारतीय वस्तूंची बांगलादेशमध्ये खुलेआम होळी करण्यात येत आहे. (Bangladesh)

त्यासाठी तेथील राजकीय अधिका-यांनीही पुढाकार घेतला आहे. पण या सर्वात पाकिस्तानी अधिका-यांचा हात असल्याचे पुढे येत आहे. नोबेल शांतता पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या राजवटीत बांगलादेशने पाकिस्तामधील कट्टरवाद्यांना बांगलादेशची द्वारे खुली केली आहेत. पाकिस्तानी नागरिक आता कुठल्याही परवानगी शिवाय बांगलादेशमध्ये प्रवेश करु शकतात. हे पाकिस्तानी कट्टरवादी आता बांगलादेशमध्ये भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करीत आहेत. त्यातून भारतीय अर्थव्यवस्थेला अडचणीत आणून पाकिस्तानमधून आवश्यक वस्तू खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र ज्या पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला पोहचले आहेत, तो पाकिस्तान बांगलादेशमध्ये कसला व्यापार करणार हा एक प्रश्नच आहे. अर्थात पाकिस्तानचे हे जाळे ओळखण्यापलिकडे सध्या बांगलादेशचे कट्टरवादी गेले आहेत. पाकिस्तानी कट्टरपंथीयांच्या जाळ्यात येऊन आपल्याच देशाला कंगाल करीत आहेत. बांगलादेशमध्ये हिंदू विरोध पराकोटीला गेला आहे. यातूनच आता भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घाला असे आवाहन कऱण्यात येत आहे. तिथे भारतीय साड्या रस्त्यावर जाळल्या जात आहेत. खालिदा झिया यांच्या पक्षाच्या नेत्याने आपल्या पत्नीच्या भारतातून नेलेल्या साड्या सर्वांसमोर जाळल्या. या घटनेचे चित्रण करण्यात आले आणि आता हे व्हिडिओ सर्व बांगलादेशमध्ये व्हायरल करण्यात येत आहे. (International News)

बांगलादेशात कुठल्याही भारतीय वस्तूंचे अस्तित्व ठेवू नका, असेही आवाहन करण्यात येत आहे. यासाठी चक्क पाकिस्तानी अधिकारी पुढाकार घेत आहेत. गेल्या काही दिवसापासून बांगलादेशातील हिंदू विरोधाला भारतीय उत्पादनावरील बहिष्काराची जोड मिळाली आहे. खालिदा झिया यांच्या पक्षाचे नेते आणि पाकिस्तानी अधिकारी यांची बैठक होऊन याबाबत एक योजना करण्यात आली आहे. यातून भारतीय वस्तूंवर बहिष्कार आणि पाकिस्तानी खाद्यमालाला बाजारपेठ हे धोरण स्विकारण्यात येणार आहे. या धोरणाची अंमलबजावणी म्हणून खालिदा झिया यांच्या पक्षाचे नेते कबीर रिझवी यांनी आपल्याच पत्नीच्या भारतातून आणलेल्या साड्यांची एक बॅगच कट्टरपंथीयांच्या स्वाधीन केली. या कट्टरपंथीयांनी या साड्यांना आग लावत मेड इन इंडिया उत्पादनांच्या विरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरु केली. #BoycottIndianProducts X वर ट्रेंड केला जात आहे. यामध्ये भारतीय बनावटीच्या वस्तू किती कुचकामी आणि बेकार असल्याच्या बातम्याही देण्यात येत आहेत. या सर्वांमागे पाकिस्तानशी संबंधित हँडल्सचाही समावेश आहे. त्यातूनच बांगलादेश भारताऐवजी पाकिस्तानकडून साखर खरेदी करणार अशा बातम्याही आल्या आहेत. (Bangladesh)

========

हे देखील वाचा : पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन !

========

अर्थात ज्या पाकिस्तानमध्ये स्वतःच्या नागरिकांना द्यायला पुरेसे अन्नधान्य नाही, तो पाकिस्तान बांगलादेशी नागरिकांच्या गरजा कशा आणि किती पुरवू शकेल हा प्रश्न आहे. पाकिस्तानमध्ये एक किलो गव्हाच्या पिढाची 200 रुपयांहून अधिक दरानं विक्री होते. तिथेच बांगलादेशमध्ये भारतातून गहू पाठवण्यात येतो आणि त्याचे दर यापेक्षा कितीतरी कमी आहेत. आता भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकत पाकिस्तानला खुले द्वार केले बांगलादेशही कंगाल होण्याच्या वाटेवरच जाणार आहे. बांगलादेशातील बंदरे आणि विमानतळांवर सीमाशुल्क तपासणीचे नियम बदलण्यात आले असून पाकिस्तानी नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. तिथे आता भारतात बनवलेल्या साड्यांऐवजी बांगलादेशी साड्या, राजशाही सिल्क आणि कमिला खादी यासारख्या बांगलादेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भारत आत्तापर्यंत बांगलादेशला अन्नधान्यापासून कार, मोटरसायकल आणि ऑटो पार्ट्सही मोठ्या प्रमाणात पाठवत आहे. या सर्वांवर बंदी आणल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे. मात्र त्यापेक्षाही बांगलादेशातील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.