पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बलुचिस्तान फुटीरतावादी बंडखोरांनी जाफर एक्सप्रेसवर हल्ला करत ट्रेनचे अपहरण करुन पाकिस्तानला त्यांच्याच कर्माची फळे द्यायला सुरुवात केली आहे. बलुचिस्तान आर्मीनं अख्ख्या ट्रेनचेच अपहरण केल्यामुळे अवघ्या जगभर खळबळ उडाली. मात्र चीनमध्ये या अपहरण नाट्यामुळे एक वेगळीच चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुळात या सर्व प्रकरणाच्या मुळाशी पाकिस्तान सरकारचे चीन प्रेम आहे. ग्वादर हे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील अरबी समुद्रावरील, इराणच्या सीमेजवळील एक शहर आणि बंदर आहे. ग्वादर शहर बलुचिस्तान प्रांतात आहे. अर्ध्याअधिक बलुची नागरिकांची उपजिवीका या ग्वादर बंदरावर अवलंबून होती. मात्र हे अवघं बंदर पाकिस्तान सरकारनं बुलची लोकांच्या विरोधानंतरही चीनला आंदण दिलं. त्यानंतर चीननं बलुची नागरिकांना हे बंदर जणू बंदच केलं. येथील खोल समुद्रात मासेमारी बंद झाली. स्थानिकांच्या मासेमारी बोटींना पाकिस्तानी सैन्यानं बंदी घातली आणि चीनी सैन्यानं बलुची नागरिकांसाठी सीमाच आखून दिली. आपल्याच भागात आपल्याला जाण्यासाठी बंदी आणि ही बंदी मोडली तर जबर मारहाण, प्रसंगी मृत्यूही, यामुळे अवघ्या बलुचीस्तानात ग्वादर बंदराच्या पाकिस्तान सरकारनं घेतलेल्या निर्णयाबाबत असंतोष निर्माण झाला होता. (Balochistan)
त्यात पाकिस्तान सरकारनं या ग्वादरला प्रती दुबई बनवणार असल्याची घोषणा केली. अर्थात यासाठीही या ग्वादरमधील मोठा भूभाग हा चीनच्या ताब्यात दिला. या सर्व कामांविरोधात बलुचीस्तानमधील नागरिकांमध्ये असंतोष वाढत होता. त्यातून चीनी अभियंत्यांवर हल्ले सुरु झाले. याबाबत चीननं पाकिस्तान सरकारला तंबी दिल्यावर बलुची नागरिकांवर पाकिस्तान सैन्याकडून होणा-या अत्याचारात वाढ झाली. या सर्वांची प्रतिक्रिया म्हणून जाफर एक्सप्रेसचे अपहरण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान या भागावर सध्या जगाचे लक्ष लागले आहे. मात्र त्या बलुचिस्तानला पाकिस्तान या देशाचा भागच व्हायचे नाही, आणि नव्हतेही. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानचा समावेश झाल्यापासून येथील जनतेनं पाकिस्तानपासून विलग होण्यासाठी लढा सुरु केला, तो आता या ट्रेन अपहरण नाट्यापर्यंत येऊन पोहचला आहे. या सर्वांच्या मुळाशी आहे, ते बलुचिस्तानमधील ग्वादर हे बंदर. ग्वादर हे एक महत्त्वाचे मासेमारी आणि व्यापार केंद्र आहे. (International News)
ग्वादर बंदर सध्या चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर प्रकल्पाचा मुख्य भाग आहे. हे ग्वादर 1958 पर्यंत ओमानच्या ताब्यात होते. मात्र 1958 मध्ये त्याचा ताबा पाकिस्तानकडे देण्यात आला, तेव्हापासून बलुचिस्तान विरुद्ध पाकिस्तान सरकार हा लढा चालू झाला. कारण संपूर्ण बलुचिस्तानचे जसे शोषण पाकिस्तान सरकारनं चालू केले, तसेच ग्वादर बंदरही त्यांच्याच शोषणाचा एक भाग बनले. या बंदराचा विकास करायचा आहे, आणि हा सर्व भाग प्रती दुबई म्हणून विकसीत करायचा आहे, हे कारण देत पाकिस्ताननं ग्वादर बंदराचा पूर्ण ताबा चीनकडे दिला. चीनने निधी दिलेल्या सीपीईसी प्रकल्पाला बलुचांनी सुरुवातीपासून विरोध केला. पाकिस्ताननं दाखवलेल्या प्रती दुबईच्या स्वप्नातला एकही प्रकल्प येथे चीननं उभारला नाही. मात्र त्याच्या नावाखाली बलुचिस्तानचा मोठा भूभाग चीनच्या ताब्यात आला. या सर्वांमुळे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं बंड पुकारले. या सर्वात चीननं ग्वादर भागत स्वतःचे सुरक्षित ठाणे तयार केले. यात चीनी सुरक्षा रक्षकांचाही समावेश होता. आधुनिक साधन सामुग्रीच्या बळावर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येऊ लागले. (Balochistan)
प्रसंगी या आर्मीतील सैनिकांना मारण्यातही आले. यामुळे बलुच आर्मी आणि बलुचिस्तानमध्ये असंतोष वाढत होता. या सर्व प्रकल्पावर चीननं मोठा खर्च केला आहे. 62 अब्ज डॉलर येथे खर्च झाल्याची माहिती आहे. 2015 मध्ये सुरु झालेल्या या प्रकल्पामुळे चीनला मध्य आशिया आणि आफ्रिकेतील व्यापारी मार्गांवर नियंत्रण मिळवता येणार आहे. शिवाय ग्वादरचा उपयोग चीन आपल्या लष्करी तळासारखा करणार आहे. ग्वादरचा समुद्र खोल आहे, त्यामुळे चीनी नौदलाच्या बोटींचा येथे वावर असतो. या समुद्रात आता स्थानिकांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांच्या मासेमारीच्या रोजगारावर गदा आली आणि त्यांच्यामध्ये असंतोष वाढला. बलुची आर्मीकडून होणारे हल्ले पाहता, चीननं ग्वादरमध्ये उंच कुंपण, सुरक्षा चौक्या आणि सैन्याची गस्त वाढवली. या भागात मोठ्या प्रमाणात चिनी कामगार आले. त्यांनी स्थानिक मासेमारांना खोल समुद्रात जाण्यापासून रोखले. या चिनी दादागिरीला बळ मिळाले ते पाकिस्तानी सैन्याचेच. (International News)
पाकिस्तानी सैन्यानं ग्वादरमधील स्थानिकांच्या बोटी जप्त केल्या. त्याला विरोध कऱणा-यांना मारहाण झाली. यात भर म्हणून ग्वादरमध्ये चीननं गाढवांच्या कत्तलीचा कारखाना बांधायला सुरुवात केली आहे. त्यासाठी आफ्रिकेतून गाढवे आणली जाणार असून चिनी औषध उद्योगासाठी त्याचा वापर होणार आहे. यामुळे ग्वादरच्या पर्यावरणाला धोका होणार आहे. पण स्थानिकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करीत चीन आणि पाकिस्तान या कारखान्याच्या उभारणीवर ठाम आहेत. वास्तविक ग्वादर बंदरातून पाकिस्तानला फक्त 10 टक्के उत्पन्न मिळते. बाकी सर्व नफा हा चीनच्या खजिन्यात जात आहे. बलुच आर्मीनं या सर्व प्रकल्पाचा, बलुचिस्तानची संपत्ती लुटण्याचे षडयंत्र म्हणत त्याविरोधात लढा उभारला. त्यातून 2018 मध्ये ग्वादरमधील चिनी हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला. 2022 मध्ये पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज आणि चिनी दूतावासावर हल्ला झाला. ऑक्टोबर 2023 मध्ये कराची विमानतळाजवळ चिनी नागरिकांची हत्या झाली. या वाढत्या हल्ल्यांमुळे चीन सरकारनं पाकिस्तानला बलुच आर्मीचा बंदोबस्त करा, असा इशारा दिला. (Balochistan)
=============
हे देखील वाचा : Nepal : नेपाळची राजेशाहीकडे वाटचाल !
Devendra Fadanvis : भोंग्यांचं राजकारण पुन्हा महाराष्ट्रात होणार ?
=============
परिणामी पाकिस्तानी सैन्याकडून बलुचिस्तानमध्ये होणा-या अत्याचारात वाढ झाली. यामुळे बलुचिस्तानमधील सर्वच बंडखोर गट एका झेंड्याखाली जमा झाले, आणि त्यांनी चीन आणि पाकिस्तानविरोधात लढा चालू केला. जाफर एक्सप्रेसचे झालेले अपहरण हा त्याच लढ्याचा भाग आहे. अख्ख्या ट्रेनचे अपहरण करतांना यामध्ये अधिकाधिक पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी असतील, याची माहिती बलुची आर्मीला होती, शिवाय त्यांनी जे हल्ल्याचे ठिकाण निवडले, ते पाहता, याबाबत बलुची आर्मीनं बराच काळ या योजनेवर अभ्यास केल्याचे जाणकारांचे मत आहे. या अपहरण नाट्याची समाप्ती कधी होईल, याची कल्पना नाही, मात्र यासर्वांमागे पाकिस्तानचीच निती कारणीभूत ठरली आहे. (International News)
सई बने