वर्षातला सर्वात मोठा सण दिवाळी सध्या चालू आहे. दिवाळीचा सण सगळ्यांच्या आयुष्यत प्रकाश आणि आनंद घेऊन येतो. तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा हा सण सगळ्यांचाच आवडता सण आहे. संपूर्ण आसमंत उजळून काढणाऱ्या या दिवाळीच्या सणाचे आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. पाच दिवस चालणाऱ्या या दिवाळी सणाच्या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये देण्यात आले आहे. नुकतेच सगळ्याने मोठ्या जल्लोषामध्ये लक्ष्मीपूजन साजरे केले. आजचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदेचा.
आज बलिप्रतिपदा आहे. बळीपूजा या नावाने देखील आजचा दिवस प्रसिद्ध आहे, कार्तिक मासाच्या प्रतिपदेला म्हणजेच पहिल्याच दिवशी साजरी केली जाते. यावर्षी बलिप्रतिपदेच्याच दिवशीच दीपावली पाडवा देखील आहे. आजच्या दिवशी सोने खरेदीस प्राधान्य दिले जाते. सोबतच आज पाडवा असल्याने पत्नी आपल्या पतीला औक्षण करते. व्यापार वर्गासाठी आजचा दिवस हा वर्षाचा प्रारंभ असतो. शिवाय आजच्या दिवसाचे अजून एक मोठे आणि महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आजचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. पाडव्याला किंवा बलिप्रतिबादेला बळीची रांगोळी किंवा शेणाची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.
ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. हे देखील पाडव्याचे खास महत्व आहे. मात्र बलिप्रतिपदा का साजरी करतात? या दिवसाचे पौराणिक महत्व काय आहे चला जाणून घेऊया.
बलि प्रतिपदा कार्तिक मासाच्या प्रतिपदेला म्हणजेच यंदा १ नोव्हेंबर या दिवशी आहे. बलिप्रतिपदा किंवा बळीपूजा ही बळीराज्याच्या पृथ्वीवर परत येण्याचे प्रतिक म्हणून साजरी केली जाते. भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन राजा बळीला पाताळलोकात धाडले होते अशी कथा सांगितली जाते.
असे मानले जाते की भगवान विष्णूद्वारे दिल्या गेलेल्या वरदानामुळे बळीराजाची पूजा केली जाते. हिंदु धर्मग्रंथांनुसार, भगवान विष्णूने वामन अवतार धारण करून राजा बळीकडून तीन पावले जमीन मागितली. आणि त्यांनी त्यांच्या तीन पावलामध्ये संपूर्ण विश्वच व्यापून टाकले. त्यांत वामन अवतारातील विष्णूंनी बळीराजाला पाताळलोकात पाठवले होते. मात्र बळीराजाच्या उदारतेमुळे भगवान विष्णूने राजाला पुन्हा पृथ्वीवर परतण्यासाठी वर्षातील ३ दिवसांची परवानगी दिली होती. या वरदानानुसार पहिल्यांदा बळीराजा कार्तिक प्रतिपदेला पृथ्वीवर आला. असे मानले जाते की, बळीराजा ३ दिवस पृथ्वीवर राहतो आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतो.
बळीपूजा शुभ वेळ
बलिप्रतिपदेची पूजा २ नोव्हेंबर २०२०४ रोजी आहे. प्रतिपदा तिथी शुक्रवार, ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ०६ वाजून १६ मिनिटांनी सुरू होईल. प्रतिपदा तिथीची समाप्ती २ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ०८ वाजून २१ मिनिटांनी होईल.
भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटूवेशात बळीराजा समोर उभे झाले. बळीने विचारले ‘काय पाहिजे’ बटू म्हणाला ‘मी मागेल ते तुला द्यावे लागेल, असे वचन दे’.बळी म्हणाला ‘मी वचन देतो, तुला हवे ते माग’.बटू म्हणाला ‘तिन्ही लोकांवर तुझे राज्य आहे. मला तीन पावले जमीन दे’.बळीराजा वचनपूर्ती करणारा राजा होता. वामन अवतारी विष्णूने प्रचंड रूप धारण केले, एक पाऊल स्वर्गात, दुसरे भू लोकावर आणि तिसरे बळी राज्याच्या डोक्यावर ठेवले. बळीराजा पाताळलोकात गेला. गविर्ष्ठ झाला तरीही सत्त्वशील, दानशूर बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील.
बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात, असे व्यापारी सांगतात. वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात. उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते.
दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी संध्याकाळी पत्नी पतीचे औक्षण करते. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतवून लावले, त्यांचा पाडाव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रमसंवत ही कालगणना सुरू केली. इ. स. पूर्व ५७ पासून ही कालगणना प्रचलित आहे. इ. स. पूर्व काळातील संस्कृतीच्या वैभवाचे, सर्वागीण सभ्यतेचे आणि एकछत्री राज्यव्यवस्थेचे हे एक उदाहरण आहे.