महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आले. तेव्हापासून जवळजवळ पन्नास वर्षे राजकारणावर स्वतःची छाप सोडणारे दोन नेते राज्यात झाले. एक स्व. बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना जाऊन आता तेरा वर्षे होत आली मात्र अजूनही राजकारणावर त्यांचा ठसा दिसून येतो. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले तेव्हा त्यांनी कारण काय दिले होते ? तर उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करत आहेत ! बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवायचा असेल तर तो भाजपसोबत जाऊन जपला जाईल, हे शिंदे यांचे म्हणणे होते. दुसरीकडे, शिंदे यांनी माझा बाप चोरला अशी कैफियत उद्धव ठाकरे मांडत राहिले. आजही शिंदे आणि ठाकरे या दोघांच्याही बॅनरवर बाळासाहेबांची प्रतिमा सर्वात ठळक असते. गोपीनाथ मुंडेना प्यार किया तो डरना क्या म्हणण्यापासून ते शिर्डी साईबाबाच्या सिंहासनावर टीका करण्यापर्यंत बाळासाहेब ठाकरेंच्या रंजक किस्स्यांबद्दल जाणून घेऊ. (Balasaheb Thackeray)
आपल्या निधनानंतरसुद्धा एक दशकापेक्षा अधिक काळ राजकारणावर अशा प्रकारचा प्रभाव पडणारे फार कमी नेते आपल्याला दिसतात. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे तसे रूढार्थाने राजकारणी नव्हे. सामान्य राजकारणी जसे लोकांच्या घोळक्यात वावरतात, लोकांना खुश करण्यासाठी गोड गोड बोलतात तसे बाळासाहेबांनी कधीही केले नाही. ते स्वतःच म्हणत असत, ओठात एक आणि पोटात एक ही माझ्या राजकारणाची रीत नाही. म्हणूनच स्वतःच्या हिमतीवर व ताकदीवर आपल्या पक्षाला पाच-सहा वेळेस मुंबई महापालिकेत सत्तेवर आणू आणि एकदा विधानसभेत बहुमत मिळवून देऊनही, सध्याच्या लोकशाहीवर ते खुलेआम टीका करत. ही दळभद्री लोकशाही आहे, हा त्यांचा आवडता वाक्प्रयोग होता. त्यामुळेच 1995 मध्ये जेव्हा शिवसेना व भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार आले तेव्हा त्यांनी त्या सरकारला शिवशाही सरकार हे नाव दिले.
त्याच सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे एका तमाशा कलावंत महिलेशी संबंध असल्याचे प्रकरण खूप चर्चेत होते. सध्या धनंजय मुंडे ज्याप्रकारे चोहोकडून घेरले गेले आहेत, त्याचप्रकारे गोपीनाथ मुंडे यांच्यावर चौफेर टीका होत होती. अशा वेळेस बाळासाहेबांनी मात्र त्यांची पाठराखण केली. अत्यंत मिश्किलपणे ते म्हणाले होते, “गोपीनाथराव, जे असेल ते सांगून टाका, प्यार किया तो डरना क्या?” बाळासाहेब ठाकरे यांचा एकूण राजकीय प्रवास, त्यांची भाषणाची शैली, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची व्यंगचित्रकला वगैरे अनेक पैलूंवर खूप काही लिहून व बोलून झाले आहे. अजूनही बोलले जाते. तरीही व्यंगचित्रकार म्हणून त्यांचे काही विशेष सांगण्यासारखे आहेत. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले असे ते खूप मोठे व्यंगचित्रकार होते. जपानमधील प्रमुख वृत्तपत्र असलेल्या असाही Asahi Shimbun या वृत्तपत्रात त्यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध झाले होते. तसेच माजी ब्रिटिश पंतप्रधान विस्टन चर्चिल यांच्यावरील व्यंगचित्रांचा एक संग्रह ब्रिटनमध्ये प्रकाशित झाला होता. त्यात जगभरातील मोजक्या व्यंगचित्रकारांनी काढलेल्या व्यंगचित्रांचा समावेश आहे. त्या व्यंगचित्रांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेले व्यंगचित्र होते.(Balasaheb Thackeray)
मात्रा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू अजूनही फारसे समोर आले नाहीत. अद्भुत, अलौकिक आणि अनपेक्षित या शब्दांमध्येच त्यांचे वर्णन करता येईल. बाळासाहेबांना गृहीत धरून राजकारणच काय, पण समाजकारण व पत्रकारिता करणेही कोणाला कधी जमले नाही. बेधडकपणा हा त्यांच्या रक्तातच होता. या बेधडकपणाचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. ही गोष्ट आहे ऑगस्ट 2006 मधली. शिर्डीच्या साईबाबांना सोन्याचे सिंहासन तयार करण्यासाठी 75 लाख रुपये जमा केल्याची बातमी मराठी माध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. लोकमत या प्रसिद्ध वृत्तपत्रानेही ती बातमी प्रकाशित केली होती. त्यावर बाळासाहेबांनी शिर्डीच्या साईबाबांना सोन्याचे सिंहासन देण्यास विरोध केला. या सिंहासनासाठी जमलेले पैसे लोककल्याणासाठी वापरा, अशी ठाम भूमिका बाळासाहेबांनी घेतली. तीसुद्धा बातमी सर्व वृत्तपत्रांनी ठळक प्रसिद्ध केली.
खरी गंमत इथून पुढे आहे. शिर्डीतल्या काही साईभक्तांना शिवसेनाप्रमुखांची ही भूमिका पसंत पडली नाही. त्यांनी एक छायाचित्र लोकमत वृत्तपत्राकडे पाठविले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः चांदीच्या सिंहासनावर बसतात पण साईबाबांच्या सोन्याच्या सिंहासनाला मात्र विरोध करतात, असा आक्षेप घेतला. तेही छायाचित्र लोकमतने प्रकाशित केले आणि बाळासाहेब दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. यावर लोकमतचा या सिंहासनावर आक्षेप असेल तर हे सिंहासन मला नको. मी ते लोकमतकडे पाठवतो, त्यांनीच ते वापरावे, असे बाळासाहेबांनी सामनातून जाहीर केले. आणि खरोखर काही शिवसैनिकांच्या हाती त्यांनी ते सिंहासन लोकमतच्या मुंबईतील कार्यालयात पाठवून दिले. या सर्व प्रकारामुळे लोकमतचे व्यवस्थापन हादरून गेले. शेवटी त्या वृत्तपत्राने शिवसेनाप्रमुखांची जाहीर फी मागितली आणि सन्मानाने ते सिंहासन परत मातोश्रीवर घेऊन गेले. (Marathi News)
यातला विशेष भाग हा, की शिवसेनाप्रमुखांचे ते चांदीचे सिंहासन शिर्डीतच त्यांना देण्यात आले होते. भारतीय कामगार सेनेचे एक महाशिबीर 9 एप्रिल 2002 रोजी शिर्डीत झाली होती. यावेळी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेमाने ते सिंहासन शिवसेनाप्रमुखांना दिले होते. वास्तविक ती लाकडी खुर्ची होती आणि त्याला चांदीचा पत्रा लावण्यात आला होता. हे आसन शिवसेनाप्रमुखांनी शेवटपर्यंत वापरले. (Marathi News)
ही बेधडक वृत्ती बाळासाहेबांनी राजकारणातही अनेकदा दाखविली. शरद पवार यांनी 1991 मध्ये राज्याचे राजकारण सोडून दिल्ली गाठली. त्यावेळी बारामतीत लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी त्या पोटनिवडणुकीत शरद पवार यांच्या विरोधात दादा कोंडके यांना उमेदवारी देण्याची घोषणा बाळासाहेबांनी केली होती. अर्थात पुढे ते उमेदवारी देण्यात आली नाही, परंतु काही दिवस त्या घोषणेची खूप चर्चा झाली. या बेधडकणासोबतच अफाट अशी दिलदारीही बाळासाहेब दाखवत असत. बाळासाहेब आणि शरद पवार यांच्यातील राजकीय विरोध प्रसिद्ध होता. बारामतीचा म्हमद्या, मैद्याचं पोतं किंवा बारा पिंपळावरचा मुंजा अशा शेलक्या शब्दांमध्ये बाळासाहेब शरद पवारांची खिल्ली उडवत. परंतु पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे जेव्हा राजकारणात आल्या तेव्हा त्यांचा मार्ग सुकर करणारे बाळासाहेबच होते. ही गोष्ट स्वतः शरद पवारांनी सांगितलेली आहे.
=================
हे देखील वाचा : Prayagraj : मस्क्युलर बाबा आणि एमटेक बाबा
==================
सुप्रिया सुळे जेव्हा निवडणूक लढविण्याचा विचार करत होत्या तेव्हा लोकसभा निवडणूक लढविण्यास त्या तयार नव्हत्या. स्वतः शरद पवार त्यांना राज्यसभेवर पाठविण्याची योजना आखत होते. त्यासाठी पुरेशी मते कसे मिळवावे याचा विचार ते करत होते. अशात एक दिवस त्यांना बाळासाहेबांचा फोन आला. “शरद बाबू, आमची सुप्रिया निवडणूक लढू इच्छिते असे मी ऐकले आहे आणि तुम्ही मला हे सांगितले नाही. मला हे बाहेरून कळायची वेळ यावी?” यावर सुप्रियांच्या विरोधात सेना-भाजपचा उमेदवार आहे हे पवारांनी त्यांना सांगितले. त्यावर बाळासाहेब उत्तरले, “कदापि नाही, सुप्रियाच्या विरोधात माझा उमेदवार असणार नाही. तुमची मुलगी ती माझी मुलगी.” आणि खरोखर सुप्रियांची बिनविरोध निवड झाली. (Balasaheb Thackeray)
राज्यात सेना-भाजपचे सरकार असताना बाळासाहेब ठाकरे आणि पु. ल. देशपांडे यांचा झालेला वाद सर्वश्रुत आहे. पु. ल. देशपांडे यांची संभावना बाळासाहेबांनी विदूषक अशी केली होती. अर्थात नंतर या दोन्ही दिग्गजांमध्ये मनोमिलन झाले. दोघांनाही एकमेकांबद्दल आदर होता. बाळासाहेबांचा असाच एक वाद क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याच्याशीही झाला होता. त्याचे झाले असे, की नोव्हेंबर 2009 मध्ये एका कार्यक्रमात बोलताना, मुंबईवर सर्व भारतीयांचा समान हक्क आहे, असे वक्तव्य सचिनने केले होते. वास्तविक, त्याने ते वक्तव्य कोणालाही उद्देशून केलेले नव्हते. मात्र बाळासाहेबांनी लगेच सचिनला फैलावर घेतले. ते म्हणाले, ‘‘क्रिकेटच्या मैदानात आम्हाला तुमचे चौकार षटकार पसंत आहेत, परंतु तुम्ही तुमचे तोंड चालवू नका. आम्ही हे सहन करणार नाही.” अर्थात यानंतरही दोघांमध्ये जवळीक कायम राहिली, हे सांगायला नको. (Marathi News)
अशा रीतीने प्रेम आणि राग सारख्याच तीव्रतेने व्यक्त करण्यात बाळासाहेबांनी कधी कुचराई केली नाही. अस्सल मराठी माणसाचे सर्व गुण त्यांच्यामध्ये दिसून येत. त्यामुळेच लाखो शिवसैनिकांचे पंचप्राण म्हणून त्यांना ओळखले जात होते. असा नेता पुन्हा होणे नाही!