भारतामध्ये अनेक जाती, धर्म आणि पंथाचे लोकं राहतात. त्यामुळे आपल्या देशात नेहमीच विविध सण साजरे केले जातात. मुख्य म्हणजे आपल्या देशात आणि धर्मात आपण तर विविध सण साजरे करतो, मात्र सोबतच आपल्या पशु पक्ष्यांसाठी आणि इतर पाळीव प्राण्यांसाठी देखील सण साजरे करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा महिना म्हणजे सणांचा राजा. अतिशय पवित्र महिना म्हणून श्रावणाला ओळखले जाते. विविध सण-उत्सवासाठी ओळखला जाणारा हा श्रावण महिना आता लवकरच संपणार आहे. या श्रावणातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा सण ओळखला जातो. या सणाला देखील विशेष महत्त्व आहे. यानंतर भाद्रपद महिना सुरु होऊन गणपती बाप्पा येतात.
संपूर्ण देशभरात विविध नावांनी पोळा साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण बैलपोळा नावाने साजरा केला जातो. आपला देश कृषीप्रधान असून, शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सर्वच शेतकऱ्यांचा जिवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते. याच बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील पिक पिकवण्यासाठी मोठी मदत होते. त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे.
पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो. यावर्षी श्रावणी अमावस्या 2 सप्टेंबर रोजी आहे. 2 सप्टेंबर सोमवारी रोजी पहाटे 5 वाजून 21 मिनिटांनी अमावस्या प्रारंभ होणार असून ती 3 सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी 7 वाजून 24 मिनिटांनी अमावस्या संपणार आहे. उगवत्या सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार अर्थात उदयतिथीनुसार, अमावस्या 2 सप्टेंबर 2024 रोजी असून याच दिवशी बैलपोळा साजरा केला जाईल.
पोळा सण हा शेतकरी त्यांचा जिवलग मित्र असलेल्या बैलांप्रती आणि त्याच्या कष्टांप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. या सणाचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात असते कारण बैल म्हणजे शेतकऱ्याचे मित्र. त्याच्याच जीवावर शेतकरी शेत नांगरतो, जमिनीतून धान्य पिकवतो. शेतकऱ्या प्रमाणे बैलही शेतात रात्रंदिवस राबतात, कष्ट करतात. त्यांना या दिवशी आर्म दिला जातो. हा सण प्रामुख्याने गावात आणि खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. किंवा अशा सर्वच ठिकाणी जिथे शेतकरी आणि बैल असतात. मात्र बहुतकरून पोळ्याची धूम ही खेडेगावातच जास्त पाहायला मिळते.
आपल्या देशात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशूपालन या व्यवसायाकडे पाहिले जाते. याच व्यवसायाचा भाग म्हणजे बैल पाळणे. याच बैलांमुळे शेतकऱ्याला शेताची कामे करणे अतिशय सोपे होते. त्यामुळे वर्षाचा एक दिवस तरी त्याची या कष्टदायक कामापासून सुटका व्हावी आणि त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी बैलपोळा साजरा केला जातो.
ज्यांच्याकडे बैल नसतात असे लोकं मातीचा अथवा लाकडाच्या बैलांची प्रतीकात्मक पूजा करतात. या दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही. polyachya दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात.
बैलांना जेवणासाठी या दिवशी पुरणपोळी करत नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. त्यांची मिरवणुक काढतात. घरातील स्त्रिया बैलांचे औक्षण करतात. या दिवशी प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतींचे आयोजन करण्यात येते.
बैलपोळा कथा
बैलपोळ्याविषयी एक कथा प्रचलित आहे. असं म्हणतात की, कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाट खेळत होते. सारीपाटाचा हा डाव माता पार्वतीने जिंकला मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले. हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायचे ठरले. शेजारी नंदी उभा होता नंदी त्या क्षणाचा साक्षीदार होता तेव्हा पार्वती मातेने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला ? त्यावेळी भगवान शंकराचा परम भक्त नंदीने शंकराची बाजू घेतली.
======
हे देखील वाचा : पिठोरी अमावस्या व्रत, पूजा विधी आणि कथा
======
नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला. कलयुगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील असा शाप पार्वतीने नंदीला दिला. नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने पार्वती मातेची माफी मागितली. तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला सांगितले की तुला कलयुगात जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील तुला कष्टाचे काम करायला देणार नाहीत.
तेव्हापासून बैलाची पूजा करणारा बैलपोळा हा सण साजरा होऊ लागला. बैलपोळ्याची कथा काल्पनिक असली तरी हा सण साजरा करण्यामागची भावना मात्र नक्कीच कृतज्ञतेची आहे. निसर्गातील प्रत्येक वृक्ष, वेली, प्राणी, डोंगर, नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे. ही परंपराच माणसाची निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून ठेवते.