Home » बबड्या लई गुणाचा…

बबड्या लई गुणाचा…

by Correspondent
0 comment
Share

आसावरीचा बबड्या कोण हे एव्हाना सगळ्यांनाच माहित आहे. अग्गंबाई सासूबाई मालिकेतील या बबड्याने चांगलेच मार्केट घेतलय. दिवसभर काम एक्के काम करणाऱ्या आईला तू कुठे काय करते असे विचारणाऱ्या बबड्याचा राग घराघरातील मम्मांना येणारच. सोशल मीडियावरच्या मम्मा ग्रुप, महिलांचे ऑनलाइन गप्पाष्टक यावर बबड्यावरून चांगलाच टाइमपास रंगतो.

बबड्या उर्फ सोहम कुलकर्णी हा मालिकेतील घरात आयतोबा, बेजाबदार, टोमणे मारणारा, आई, बायको शुभ्रा, आजोबा यांना कसेही बोलणारा असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र सोहम उर्फ आशुतोष पत्की खूप गुणाचा मुलगा आहे.

मालिका आणि प्रेक्षक एका ठराविक वेळेनंतर खूप रिलेट होतात. इव्हेंट किंवा एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात सेलिब्रिटी कलाकार पोहोचतात तेव्हा ते पडद्यावर जसे आहेत त्यापेक्षा खऱ्या आयुष्यात कसे आहेत हे जाणून घेण्याची भारी उत्सुकता असते. हा अनुभव काही आजचा नाही बरे, अगदी निळू फुले, राजशेखर यांच्यासारख्या नायक नायिकेच्या प्रेमात खो घालणाऱ्या अभिनेत्यांनीही हा अनुभव घेतला आहे. पडद्यावर बॅड बॉय असलेले कलाकार खऱ्या आयुष्यात गुड बॉय असतात हे अनेकांना माहित नसते.

अर्थात हा मालिकेचा आणि त्यातील कलाकारांच्या अभिनयाचा प्रभावच असतो म्हणा. व्हिलन, ग्रे शेड असलेल्या कलाकारांचा प्रेक्षकांना राग येणे, जाहीर कार्यक्रमात ते कलाकार भेटल्यानंतर त्यांनी असे वागू नये असा निरागस सल्ला प्रेक्षकांकडून दिला जाणे हीच तर पावती असते त्यांच्यासाठी. तर असो…

आपण बोलत होतो अग्गंबाई सासूबाई या सध्याच्या टीआरपी थर्मामीटरवर हिट असलेल्या मालिकेतील बबड्याविषयी. मालिकेत तर अगदी या पोराने जीव नकोसा करून सोडला आहे. नोकरी सोडून घरात त्रास देणाऱ्या, बिल्डिंगमधल्या प्रज्ञाच्या कानाला लागून कसेही वागणाऱ्या बबड्याची कानउघाडणी करण्यासाठी आसावरी कधी दुर्गा होते याची वाट प्रेक्षक पाहत आहेत. अर्थात मालिकेत येणाऱ्या नाट्यमय वळणासाठी हा ट्विस्ट लेखकाने हुकमाचे पान म्हणून राखून ठेवला असणारच आहे म्हणा.

रिललाइफ मध्ये दिसणारा बबड्या खऱ्या रिअल लाइफमध्ये मात्र खूप वेगळा आहे. त्यामुळे गुड बॉय आशुतोषला मालिकेत बॅड बॉय सोहम साकारताना दोन टोकं सांधावी लागली. अर्थातच तो ही भूमिका एन्जॉय करतोय असं तो नेहमी सांगतो.

घरात संगीताची परंपरा असूनही अभिनयाची आवड जोपासलेल्या आशुतोषची नायक म्हणून ही पहिलीच मालिका आहे. मेंदीच्या पानावर आणि दुर्वा या मालिकेत छोट्या भूमिकेत आशुतोष दिसला होता. तर नरेश बिडकर यांच्या वन्समोअर या आगामी सिनेमातही तो झळकणार आहे.

खुर्चीवर बसून, टेबलावर पाय सोडून आईने उपमा केला असताना थालीपीठ कर आत्ता लगेच असे म्हणत सतावणारा बबड्या खऱ्या आयुष्यात मात्र उत्तम कुक आहे. त्याने रितसर हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असल्याने आशुतोष पत्की म्हणून तो नेहमी आईबाबांना स्वताच्या हाताने पदार्थ बनवून खिलवतो. शिवाय पाककलेतील नवे प्रयोग करत तो अनेकदा स्वयंपाकघरात रमतो.

मालिकेत वेगळ्या अर्थाने मम्माज बॉय असलेला आशुतोष ऑफस्क्रिन त्याच्या आईची खूप काळजी घेतो. अशावेळी त्याला कुणी मम्माज बॉय म्हटलं तर अजिबात वाईट वाटत नाही. मालिकेत अत्यंत बेजाबदार अशी प्रतिमा असलेला हा बबड्या आशुतोष म्हणून खूप जबाबदारीने वागतो. त्याला कष्टाची, कष्टातून मिळणाऱ्या कमाईची अत्यंत कदर आहे. त्याचे वडील प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी केलेल्या संघर्षाची त्याला खूप जाण आणि अभिमान आहे.

https://www.facebook.com/zeemarathiofficial/videos/780071742808863/

मालिकेच्या घरात दिवसभर रिकामटेकडा बसणारा बबड्या खऱ्या आयुष्यात प्रचंड क्रिएटिव्ह आहे. फोटोग्राफीचा छंद जोपासण्यासाठी तो मालिकेतून मिळणारी सुट्टी सत्कारणी लावतो. बाइकवरून लाँग ड्राइव्हला जायला त्याला खूप आवडते. सध्या आशुतोष गिटार वाजवायला शिकतोय. बबड्याने जरा तरी घरातून बाहेर पडावं म्हणून त्याला त्याचे ऑनस्क्रिन बाबा अर्थात अभिजित राजे जॉगिंगला नेतात असा सीन लिहिला होता. पाच राऊंडमध्येच दमलेल्या बबड्याने घातलेला तो गोंधळ प्रेक्षकांनी पाहिलाही, पण खऱ्या आयुष्यात आशुतोष अत्यंत फिटनेसप्रेमी आहे. रोज न चुकता व्यायाम करणे, डाएट फॉलो करणे तो कधीच चुकवत नाही.

आहे की नाही बबड्या गुणाचा. खरंतर आईसाठी प्रत्येकजण पझेसिव्ह असतं. तसा हा बबड्याही आहे. ते पात्रच तसं आहे. पण आशुतोषने आपला मूळ स्वभाव सोडून रंगवलेल्या या पात्राने मजा आणली आहे.

अनुराधा कदम


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.