Home » बाबा सिद्दिकींच्या हत्येला राज्यातूनच मदत

बाबा सिद्दिकींच्या हत्येला राज्यातूनच मदत

by Team Gajawaja
0 comment
Baba Siddique
Share

शनिवार, सर्वजण दसरा साजरा करत असताना एक धक्कादायक घटना समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला गेला आहे, अशी बातमी सुरुवातीला आली . त्यानंतर बाबा सिद्दिकींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, लीलावती रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मावळली. बाबा सिद्दीकी यांच्या छातीत गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाकडून कळवण्यात आलं. बाबा सिद्दकी यांची हत्या का करण्यात आली यावरून अनेक व्हर्जन्स समोर येत होती. त्यामध्ये कोणी SRA प्रकल्पावरून बाबा सिद्दिकींची हत्या झाल्याचं सांगत होतं, तर कोणी बाबा सिद्दीकी हे सलमान खानचे घनिष्ठ सहकारी असल्याने बिश्नोई टोळीने त्यांची हत्या केल्याचं सांगत होतं. मात्र, रविवारी चित्र क्लियर झालं.बाबा सिद्दीकी यांची हत्या बिश्नोई गँगने केली आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. बिश्नोई गॅंग महाराष्ट्रात हातपाय पसरत आहे का? बिश्नोई गॅंग ओरिजनली नेमकी कोणती आहे? आणि बाबा सिद्दिकींची हत्या का करण्यात आली जाणून घेऊया. (Baba Siddique)

बिश्नोई गँगने फेसबुकवर पोस्ट करत या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. तरी बिश्नोई गँगचा मोहरक्या लॉरेन्स बिश्नोई याने अधिकृत रित्या या हत्येची जबाबदारी स्विकारलेली नाही. पण बिश्नोई गँगतर्फे करण्यात आलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सिद्दीकींचे बॉलिवूड अभिनेता सलमान खान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे ही हत्या केली आहे.” सोबतच त्यांना सलमान खानसोबत कोणतेही युद्ध नको होते, पण बाबा सिद्दीकींच्या हत्येचे कारण त्यांचे दाऊद इब्राहिम यांच्याशी असलेले संबंध होते. बाबा सिद्दीकी यांची कथित शालीनता हा निव्वळ भ्रम आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिमसोबत मोक्का कायद्यातही त्याचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. सलमान खान आणि दाऊदच्या टोळीला जो कोणी मदत करेल, त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असा दावा बिश्नोई गँगने केला आहे. (Latest Updates)

महत्वाचं म्हणजे यानंतर पोलिसांनी जे गुन्हेगार पकडले आहेत, त्यामध्ये पुणे, अकोला या महाराष्ट्रामधील शहरांचं कनेक्शन समोर आलं आहे. पण बिष्णोई गँगच महाराष्ट्रात वावर वाढल्याचं हे पाहिलंच उदाहरण नाहीये. याआधी मुंबईमध्ये सलमानच्या बंगल्याच्या बाहेरही बिष्णोई गँगने फायरिंग केली होती. सोबतच, सिद्धू मुसेवालीची जेव्हा बिष्णोई गँगने हत्या केली होती तेव्हाही त्यात महाराष्ट्रातून काही गुन्हेगार सामील असल्याचं बोललं गेलं होतं. महाराष्ट्रात या गॅंगचा वावर वाढण्यामागे नेमकी कोणती कारणं आहेत? तर या बिष्णोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिष्णोई या मूळचा पंजाबचा आहे. अवघ्या ३१ वर्षांचा लॉरेन्स बिश्नोई हा पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील धत्तरनवली गावातील एका श्रीमंत शेतकऱ्याचा मुलगा आहे. तो बिश्नोई समाजाचा आहे, या समाजाचे सदस्य पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या अनेक भागात पसरले आहेत. (Baba Siddique)

बिष्णोईची गुन्हेगार जगातील एन्ट्रीही इंटरेस्टिंग आहे. बिश्नोई 12 वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी 2010 मध्ये चंदीगडला शिफ्ट झाला. डीएव्ही महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तो विद्यार्थी राजकारणात सामील झाला. 2011 ते 2012 दरम्यान पंजाब विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षही होता. याच काळात विद्यार्थी संघटनेच्या राजकारणातून त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता. लॉरेन्स बिष्णोई विरुद्ध पहिली एफआयआर हि Attempt To Murder ची होती, आणि त्यानंतर मग एकदा पोलीस स्टेशनची हवा खाल्यांनंतर लॉरेन्स गुन्हगारी क्षेत्राकडे वळला तो कायमचाच. (Latest Updates)

त्याने अनेक नामचीन गुंडांची मदत घेत स्वतःची टोळी उभारली. सोबतच पंजाब बरोबरच बॉर्डरला लागून असलेल्या हरियाणा आणि राजस्थानमध्येही त्याने आपल्या टोळीचं जाळं पसरवण्यास सुरुवात केली. त्यातूनच अनेक टोळीयुद्धात ही गॅंग समोर येत राहिली. लॉरेन्स बिश्नोई याच्यावर खून, हत्येचा प्रयत्न, खंडणी व इतर गुन्ह्यांचे दोन डझन गुन्हे दाखल आहेत. सध्या तो अहमदाबाद येथील साबरमती मध्यवर्ती कारागृहात बंद आहे आणि तुरुंगातूनच तो त्याची टोळी चालवतो. मात्र बिष्णोई पूर्ण देशाला माहित झाला तो दोन प्रकरणांमुळे. पहिला म्हणजे पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवेलाची हत्या. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची २०२२ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. बिष्णोई टोळीचा सदस्य असलेल्या गोल्डी ब्रारने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. ब्रार पहिल्यांदा 2017 मध्ये कॅनडाला गेला होता आणि तो देशाबाहेर होता. बिष्णोईचे इतर साथीदारही कॅनडा आणि अमेरिकेत असल्याचे समजते. (Baba Siddique)

मात्र याच वेळी उत्तर भारतातील ही टोळी राज्यातही पसरू पाहत असल्याचं पहिल्यांदा समोर आलं होतं. सिद्धू मुसेवाला हत्येच्या तपासादरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोष जाधव याला गुजरातमधून अटक केली होती. जाधवला लपवून ठेवणारे नवनाथ सूर्यवंशी आणि सिद्धेश उर्फ महाकाल कांबळे यांनाही अटक करण्यात आली. तिघेही बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावातील रहिवासी होता, तर कांबळे नारायणगावचा आणि सूर्यवंशी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील होता. बिष्णोई टोळीला देशभर कुख्यात करणारी दुसरी घटना म्हणजे सलमान खानवर या टोळीचा असलेला डोळा. आपल्या गुन्हेगारी कारवायांना लोकप्रियतेच्या लेयरखाली लपवण्याची प्रत्येक गुन्हेगारची इच्छा असते. त्यानुसारच, केवळ गँगस्टर म्हणून ओळख राहू नये यासाठी लॉरेसीन बिष्णोईने आसरा घेतला त्याच्या बिष्णोई असण्याच. त्यातूनच मग बिष्णोई समाजाचा पाठींबा मिळवण्यासाठी त्याने सलमान खान विरोधात मोर्चा उघडला. (Latest Updates)

सलमान खानवर राजस्थनमध्ये एक काळवीटाच्या शिकारीचा आरोप होता. याचाच फायदा उचलत या टोळीने सलमानला धमकी देण्यास सुरुवात केली. यातूनच एप्रिलमध्ये मुंबईतील सलमानच्या घराबाहेर अनेक गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. आणि त्यानंतर आता हे बाबा सिद्दकीचं प्रकरण घडलं आहे. यामध्ये पुन्हा एक लोकप्रिय होण्याचं कार्ड खेळताना बाबा सिद्दीकी हे दाऊदशी संबंधित होता म्हणून त्यांची हत्या केल्याचं या लॉरेन्स बिष्णोई गँगने म्हटलं आहे. पण याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे या हल्यातही महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. (Baba Siddique)

शुब्बू लोणकर नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचं म्हटलं आहे. या पोस्टमध्ये सलमान खान आणि दाऊद गँगचाही उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टची सत्यता मुंबई पोलिसांकडून तपासण्यात येतेय. कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकर हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोटचा रहिवासी आहे, पण सध्या त्याचं पुण्यात वास्तव्य आहे. सिद्दीकी हत्या प्रकरणात शुभमच्या अकाऊटंवरून पोस्ट समोर आल्यानंतर, पोलिस अकोट तालुक्यातील निवरी बुद्रुक गावात शुभम लोणकरच्या घरी पोहोचले. मात्र, शुभम लोणकरच्या घराला कुलूप लावलेलं दिसून आलं. (Latest Updates)

शुभम लोणकरला यावर्षी फेब्रुवारीत महाराष्ट्र पोलिसांनी अकोल्यातून अवैध शस्त्रांसह अटक केली होती. तपासात शुभम लोणकरचं कनेक्शन लॉरेन्स बिष्णोई गँगसह असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं पुण्यातून शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बाबा सिद्दीकी यांच्यावर प्रत्यक्ष गोळीबार करणारे पुण्यात धर्मराज कश्यप आणि शिवानंद हे ज्या भंगाराच्या दुकानात काम करत होते, त्या भंगाराच्या दुकानाच्या बाजूलाच प्रवीण लोणकर याच्या मालकीचे दुकान आहे. या हत्येसाठी प्रवीण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर यांनी मिळून शिवानंद आणि धर्मराज कश्यप यांना निवडल्याचा संशय पोलिसांना आहे. (Baba Siddique)

======

हे देखील वाचा :  राजकारणात आणि बॉलिवूडमध्ये दबदबा असणारे बाबा सिद्धीकी आहेत तरी कोण?

======

थोडक्यात बिष्णोई गँगने महाराष्ट्रात अत्यंत खोल पाय रुजवल्याच बोललं जात आहे. या बाबत एक महत्वाचं कारण सांगितलं जातं. जाणकारांच्या मते, दाऊद इब्राहिम, छोटा राजन आणि रवी पुजारी यांच्या मुंबईतील अंडरवर्ल्ड टोळ्या गेल्या दीड दशकात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर निष्प्रभ केल्या आहेत. अशावेळी पोलिसांना संशय आहे कि बिष्णोई टोळी आता ही गुन्हेगारी टोळ्यांची निर्माण झालेली पोकळी भरण्याचा प्रयन्त करत आहेत, आणि त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण या टोळीत सामील केले जात आहेत. अशावेळी, मुंबई आणि राज्यातील इतर गॅंगवॉरवर कंट्रोल मिळवलेल्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांसमोर आता या उत्तरेतल्या लॉरेन्स बिष्णोई गँगच आव्हान असणार आहे एवढं नक्की. (Latest Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.