अमरनाथ यात्रेकरूंसाठी आनंदाची बातमी आली आहे. बाबा बर्फानी यांचे पहिले दर्शन झाले असून बाबा अमरनाथ यांच्या या बर्फाच्या शिवलिंगाची पूजाही करण्यात आली आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर, बाबा अमरनाथ यांचे पहिले दर्शन घेण्यात आले आणि त्याचे छायाचित्र तमाम शिवभक्तांसाठी जाहीर करण्यात आले आहे. अमरनाथ यात्रेकरूंसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे यावेळी बाबा बर्फानी त्यांच्या पूर्ण रूपात प्रकट झाले आहेत. त्यामुळे यावर्षी जुलैपासून सुरु होणा-या बाबा अमरनाथ यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक येण्याची शक्यता आहे. (Amarnath Yatra)
हिंदू धर्मात अमरनाथ यात्रा ही सर्वात पवित्र आणि अवघड यात्रा मानली जाते. तरीही अमरनाथ गुहेमध्ये नैसर्गिकरित्या तयार होणा-या या बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक गर्दी करतात. अमरनाथ गुहा, जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये आहे. समुद्रसपाटीपासून 12756 फूट उंचीवर असलेल्या या गुहेपर्यंत जाणारा अवघड मार्ग पार करतांना शिवभक्तांची कसोटी लागते. कारण ही सर्व यात्रा निसर्गावर अवलंबून असते. अनेकवेळा पाऊस आणि बर्फवृष्टी यामुळे यात्रा स्थगित होते. काहीवेळा या मार्गावर ढगफुटी होऊन मोठी मनुष्य आणि वित्तहानीही झाली आहे. (Social News)
अशा दुर्घटना होऊनही बाबा बर्फानींच्या भक्तांचा उत्साह कधीही कमी झालेला नाही. दरवर्षी पहलगाम किंवा बालटाल येथून अमरनाथ गुहेपर्यंत जाण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. अमरनाथ गुहा श्रीनगरपासून सुमारे 140 किलोमीटर आणि पहलगामपासून सुमारे 46 किलोमीटर अंतरावर आहे. या वर्षी जेष्ठ पौर्णिमेच्या मुहूर्तावर बाबा बर्फानी यांचे पहिले दर्शन घेण्यात आले आहे. यावेळी, बाबा अमरनाथ यांच्या पूजेचा पहिला विधी देखील करण्यात आला. ही पूजा अमरनाथ श्राइन बोर्डाने आयोजित केली होती. अधिकृतरित्या बाबा अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरु होणार आहे. यावेळी या यात्रेसाठी फार कमी कालावधी निश्चित करण्यात आला आहे. 9 ऑगस्ट रोजी ही यात्रा संपन्न होईल. म्हणजेच फक्त 38 दिवस बाबा अमरनाथ यात्रा होणार आहे. (Amarnath Yatra)
गेल्या वर्षी बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी सुमारे 5 लाखाहून अधिक भाविक आले होते. यावर्षी या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे कायम सावट असते. त्यामुळे यावर्षी विशेष सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेच्या सर्व मार्गावर एफआरएस तंत्रज्ञानाने सुसज्ज कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे डिजिटल छायाचित्रे किंवा व्हिडिओंमधील चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांचे विश्लेषण करून एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यास मदत करतात. यातून कोणताही दहशतवादी आपली ओळख बदलून अमरनाथ यात्रेमध्ये सामील झाला, तर त्याची ओळख पटवण्यात येणार आहे. याशिवाय यात्रेदरम्यान सुरक्षा व्यवस्थेसाठी केंद्रीय निमलष्करी दलांच्या 580 हून अधिक कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. विशेषतः पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रेतील यात्रेकरुंसाठी विशेष सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे. (Social News)
याशिवाय रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानासह बँडचा वापर केला जात आहे. प्रवास मार्ग, बेस कॅम्प आणि लंगर सेवा स्थळांवरही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. या सर्व प्रवास मार्गावर ड्रोनद्वारेही सतत लक्ष ठेवले जाणार आहे. यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी स्निफर डॉगचाही वापर केला जाणार आहे. या यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरुंनाही काही सूचना देण्यात आल्या आहेत. यात्रेकरुंच्या शिबिरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना आधार आणि अन्य नोंदणी कागदपत्र, परवाना पत्र दाखवणे आवश्यक केले आहे. गेल्या काही वर्षात अमरनाथ यात्रेमध्ये यात्रेकरुंची संख्या वाढत आहे. ही यात्रा सगळ्यात अवघड असली तरी यात्रेकरु मोठ्या संख्येनं सहभागी होऊ लागल्यामुळे आयोजक असलेल्या अमरनाथ श्राइन बोर्डाने अनेक सुविधा केल्या आहेत. या सर्व मार्गावर मोठ्या प्रमाणात भंडारे उघडण्यात येत आहेत. (Amarnath Yatra)
===========
हे देखील वाचा : Odisha : भगवान जगन्नाथ मावशीच्या घरी का जातात !
Kerala : श्री पद्मनाभस्वामी मंदिरात महाकुंभभिषेक !
===========
या भंडा-यामध्ये यात्रेकरुंसाठी मोफत अन्न सुविधा उपलब्धअसते. शिवाय ठराविक अंतरावर वैद्यकीय सुविधा असलेले कॅम्पही उभारण्यात येत आहेत. या यात्रेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे असते. शिवाय वैद्यकीय प्रमाणपत्राचीही गरज असते. यात्रेत सहभागी होण्यासाठी अमरनाथ श्राइन बोर्डाच्या वेबसाईटचा पर्याय आहे. या यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा देखील उपलब्ध आहे. गेल्यावर्षी या यात्रेमध्ये मध्ये 5 लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. मात्र गेल्यावर्षी ही यात्रा 52 दिवस चालली. मात्र यावर्षी यात्रा फक्त 38 दिवस असून 5 लाखांहून अधिक भाविक गर्दी करणार आहेत. त्यामुळे या भाविकांच्या गटांचे नियोजन करण्यासाठी अमरनाथ श्राइन बोर्ड विशेष योजना तयार करीत आहे. (Social News)
सई बने