अमरनाथ यात्रा ही समस्त हिंदू धर्मियांसाठी अतिशय पवित्र अशी यात्रा आहे. अमरनाथ यात्रा करुन बाबा बर्फांनींचे दर्शन घेण्याचे स्वप्न प्रत्येक हिंदूंचे असते. या नैसर्गिक शिवलिंगाचा महिमा अलौकीक आहे. तसेच एक शिवलिंग मनाली येथे असून या शिवलिंगाला प्रती बाबा बर्फानी म्हणून ओळखले जाते. मोठ्या डोंगराच्या कड्यावरुन कोसळणाऱ्या धबधब्याने येथे शिवलिंगाचा आकार घेतला असून या बाबा बर्फानीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त अनवाणी डोंगरकडा चढत आहेत. मनालीपासून 25 किमी अंतरावर असलेल्या सोलंगनाला जवळील हे अंजनी महादेव मंदिर 11,500 फूट उंचीवर आहे. या अंजनी महादेव मंदिरातील शिवलिंग हे नैसर्गिकपणे तयार झाले असून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भक्त गर्दी करीत आहेत. (Anjani Mahadev Temple)
या शिवलिंगाचा आकार 30 फुटांपेक्षा जास्त असून तो दिवसेंदिवस वाढता आहे. त्यामुळेच या शिवलिंगाची महती वाढत आहे. या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे. या अंजनी महादेवासंदर्भात पौराणिक कथा सांगितली जाते. असे मानले जाते की, त्रेतायुगात माता अंजनीने पुत्रप्राप्तीसाठी आणि मोक्ष मिळविण्यासाठी तपश्चर्या केली. माता अंजनीने भगवान शंकाराची (Anjani Mahadev Temple) आराधना केली. ही तपश्चर्या पाहून भगवान शिव प्रकट झाले. तेव्हापासून येथे नैसर्गिकरित्या बर्फाचे शिवलिंग तयार झाले असल्याचे सांगण्यात येते. या शिवलिंगाचे दर्शन घेतल्याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
या शिवलिंगाचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे, या महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भक्त अनवाणी पायी चालत जाऊन अंजनी महादेवाचे दर्शन घेतात. ही वाट अत्यंत बिकट असून वाटेमध्ये अनेकवेळा बर्फाच्या ग्लेशिअरवरुन चालावे लागते. असे असूनही बर्फामुळे भाविकांना त्रास होत नाही. पर्यटक भाविक 100 मीटरचे अंतर अनवाणी कापतात. या भागातील अनेक रहिवासी या अंजनी महादेवाचे दर्शन अनवाणी घेत असत. मात्र आता येणारे पर्यटकही अंजनी महादेवाला अनवाणीच भेट देतात. अटल बोगदा झाल्यापासून या भागात येणारी भाविकांची गर्दीही वाढली आहे. अटल बोगदा झाल्यापासून भाविकांना अधिक सुलभपणे या महादेवाचे दर्शन घेता येऊ लागले आहे. मनाली ते सोलांगनाला असा 15 किलोमीटरचा प्रवास केल्यावर सोलंगनाळा ते अंजनी महादेव हा पाच किलोमीटरचा प्रवास पायी किंवा घोड्याने करता येतो. सध्या या सर्व भागात मोठ्याप्रमाणात विकासकामे चालू आहेत. आत्ताच झालेल्या जोरदार पावसानं या भागातही काही प्रमाणात नुकसान झाले. येथील विकास कामे थांबवण्यात आली. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यावर ही विकासकामे पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. अंजनी महादेवजवळ सध्या एका अॅडव्हेंचर पार्कचे काम सुरु आहे. तसेच पर्यटकांसाठी मोठ्याप्रमाणात निवासस्थानांचे कामही सुरु आहे.
============
हे देखील वाचा : वैवाहिक आयुष्यात आनंदित राहण्यासाठी ‘या’ मनी मॅनेजमेंट टीप्स करा फॉलो
============
अंजनी महादेवाजवळ कोसाळणारा धबधबा हा बाराही महिने पडत असतो. थंडीमध्ये या पाण्याचे बर्फात रुपांतर होते. मात्र हा धबधबा थांबत नाही. अगदी मे महिन्यातही हा धबधबा सुरु असतो. त्यामुळे हे अनोखे दृष्य बघण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या अंजनी महादेव मंदिर (Anjani Mahadev Temple) परिसरात संत बाबाजींची कुटी देखील आहे. याच ठिकाणी बाबा तपश्चर्या करत असत आणि ही कुटी आजही बाबांना समर्पित आहे. हे सुद्धा एक पवित्र ठिकाण मानण्यात येते. या आश्रम परिसरालाही भेट देण्यासाठीही मोठ्याप्रमाणात गर्दी होते. अंजनी महादेवाचे मंदिर हे अतिशय प्रेक्षणीय ठिकाण आहे. सुमारे 150 पायऱ्या चढून, भक्त एका मोठ्या व्यासपीठावर पोहचतात, तिथे अतिशय उंच धबधब्याखाली पवित्र शिवलिंग स्थापित झाले आहे. या धबधब्यातून खाली कोसळणारा पाण्याचा प्रवाह थेट शिवलिंगावर पडतो तेव्हा एक अतिशय सुंदर दृश्य समोर येते. या धबधब्याचे तुषार येणा-या भाविकांच्या अंगावरही पडतात. धबधब्याचे तुषार अंगावर पडल्यास भक्त तो देवाचा आशीर्वाद मानतात. अंजनी महादेवाला बारा महिने कधीही भेट देता येऊ शकते. बारा महिन्यात प्रत्येकवेळा या भागात निसर्गाची विविध रूपे पाहायला मिळतात. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात हा सर्व भाग हिरावईनं नटलेला असतो. अन्यवेळी हा संपूर्ण परिसर बर्फानं अच्छादलेला असतो. अत्यंत निसर्गसंपन्न अशा या अंजनी महादेवाची लोकप्रियता वाढत आहे.
सई बने