Home » Licola Town : बाबो… या अवघ्या शहराची विक्री होणार

Licola Town : बाबो… या अवघ्या शहराची विक्री होणार

by Team Gajawaja
0 comment
Share

विकणे आहे, या हेडलाईन खाली आपल्यापैकी अनेकांनी दुकानाची विक्री होतांना पाहिले आहे. घर, जमिन, बंगला, गाडी, गाय, बैल यांचीही विक्री याच हेडलाईन खाली येते आणि त्यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. मात्र कधी तुम्ही एका पूर्ण शहराची विक्री होत आहे, असे ऐकले आहे का. फक्त ते शहरच नाही, तर त्यातील सर्व नागरिकांचीही विक्री होणार आहे, हे सांगितले तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण सध्या अशाच एका शहराच्या विक्रीची चर्चा आहे. सोबतच अवघं शहर त्याच्या नागरिकांसह कोण विकत घेणार याचीही उत्सुकता आहे. ऑनलाइन विक्रीस आलेले हे शहर ऑस्ट्रेलियामधील आहे. ऑस्ट्रेलियाच्या नदीकाठी बसलेल्या या शहरामध्ये पर्यटक साहसी खेळ खेळण्यासाठी जातात. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या शहराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. अवघी हातावर मोजण्याइतकी लोकसंख्या असलेल्या या शहरानं आपल्या अनेक गरजा सरकारवर विसंबून न रहाता भागवल्या आहेत. आता याच लिकोला शहराची 52 कोटी रुपयांना विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन बोली लावली जात आहे. ( Licola Town ) 

लिकोला हे ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यातील एक अद्वितीय निसर्ग सौदर्याचे एक खाजगी मालकीचे शहर आहे. लिकोला हे शहर प्रसिद्ध मेलबर्नच्या पूर्वेस २५४ किमी अंतरावर वेलिंग्टन शायरमध्ये वसलेले आहे. अल्पाइन नॅशनल पार्कचे प्रवेशद्वार म्हणून या लिकोला शहराकडे बघितले जाते. १९६० च्या दशकात व्हिक्टोरियाच्या लायन्स क्लबने या शहराची खरेदी केली. दोन नदींच्या काठावर असलेल्या आणि काहीशा दुर्गम ठिकाणी असलेल्या लिकोला येथील नागरिकांनी नदीच्या पाण्यावर शहरासाठीचा वीज निर्मिती प्रकल्पही उभारलेला आहे. या शहराची भौगोलिक रचना पाहता, येथे ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशातील नागरिक हे कॅम्पिंगसाठी येतात. एकेकाळी लिकोला हे त्यातील लाकूड गिरणींसाठीही ओळखले जात होते. या शहरातील इमारतीही लाकडाच्या सहाय्यानं उभारण्यात आलेल्या आहेत. येथील वैशिष्टपूर्ण लाकडी घरे बघण्यासाठीही येथे मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. मात्र आता येथील लाकूड गिरणी आता बंद झाल्या असून त्यांच्या जागी अनेक मनोरंजन केंद्र सुरु झाली आहेत. त्यामुळे अवघ्या ऑस्ट्रेलियामधील नागरिक येथे पर्यटनासाठी येतात. या लियोला शहरात काही लाकडाच्या इमारती, एक जनरल स्टोअर, एक पार्क आणि एक पेट्रोल पंप एवढी मोजकीच बांधकामे आहेत. ( Licola Town ) 

ऑस्ट्रेलियातील एकमेव खाजगी मालकीचे हे शहर या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात चर्चेत आले. कारण व्हिक्टोरियाच्या लायन्स क्लबने हे शहर विक्रीस काढण्याचे जाहीर केले. लिकोलामध्ये अनेक मनोरंजक सेंटर असले तरी, येथील स्थायिक नागरिकांची सख्या अगदी हातावर मोजण्याइतकी आहे. पर्यटनाच्या माध्यमातून लिकोलातील सर्व आर्थिक व्यवहार चालतात. येथे मासेमारी, कॅम्पिंग आणि जंगल सफारी हे मुख्य व्यवसाय आहेत. स्थानिकांशिवाय हे व्यवसाय करण्यास अन्य कोणालाही परवानगी नाही. खाजगी शहर असल्यामुळे लिकोला शहरानं आपल्या पायाभूत सुविधाही स्वतःच उभ्या केलेल्या आहेत. लिकोला शहर ऑस्ट्रेलियाच्या मुख्य वीज ग्रीडशी जोडलेले नाही. अगदी पिण्याच्या पाण्याचा शुद्धीकरण प्रकल्पही या शहराचा स्वतःचा आहे. असे असले तरी या सर्व सुविधांची देखभाल आता व्हिक्टोरियाच्या लायन्स क्लबला कठीण जात असल्याची माहिती आहे. त्यातच लिकोला शहर दोन नदींच्या काठावर आहे.

=======

हे देखील वाचा : Dubai City of Gold : चक्क सोन्याचं शहर

=======

मॅकॅलिस्टर नदीला जुलै 2007 मध्ये भीषण पूर आला. त्यानंतर या शहराचे मोठे नुकसान झाले. यावेळी शहरातील काही स्थानिकांनी देशाच्या अन्य भागात रहाणे पसंत केले. लिकोला शहर सुमारे 42 एकरमध्ये पसरलेले आहे. त्याची देखभाल करणे आता लानन्स क्लबला आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यानं त्यांनी या शहराला विक्रीला काढले आहे. तब्बल 50 वर्षाहून अधिक काळ या शहराचा सर्व कारभार व्हिक्टोरिया लायन्स क्लबद्वारे चालवण्यात आला आहे. मात्र आता याच शहराची विक्री होणार, या विचारानं येथील स्थानिक धास्तावले आहेत. हे शहर एखाद्या खाजगी विकासकाच्या हाती गेले, तर लिकोला शहराची खरी ओळखच पुसली जाईल, अशी भीती या स्थानिकांना वाटत आहे. त्यासाठी येथील नागरिकांना आता लिकोला शहर वाचवण्यासाठी क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली आहे. लिकोला शहरात राहून गेलेल्या नागरिकांना यासाठी आवाहन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत तब्बल 8 हजाराहून अधिक नागरिकांनी लिकोला शहर वाचवण्याच्या या मोहीमेत सहभाग घेतला आहे. ( Licola Town ) 

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.