बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे गाव बालाघाट पर्वताच्या कुशीत वसलेले आहे. मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंगांपैकी नागनाथ एक आहे. प्राचीनकाळी हा प्रदेश दारुकावन नावाने प्रसिद्ध होता.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
या मंदिराच्या शिल्पकलेची वेरूळ व अजिंठा येथील शिल्पकलेशी तुलना करून काही इतिहासकारांनी या मंदिराच्या उत्पत्तीचा संबंध वाकाटक आणि राष्ट्रकुट घराण्याशी व त्या कालखंडाशी जोडला. परंतु, चिकित्सक दृष्टीने पाहिल्यास या मंदिराचे पूर्ण शिल्पकाम हे हेमाडपंती असल्याचे जाणवते. हेमाडपंती कालखंड सर्वसाधारण ११ ते १२ वे शतक असा मानला जातो. यामुळे या कालखंडातच या मंदिराचे निर्माण कार्य झाले असावे. तसा पुरावा १२९४ मध्ये येथे कनकेश्वरी देवी जवळ सापडलेल्या शिलालेखातून मिळतो. ह्यात यादव राजा रामदेवराय यांनी या मंदिराचा उल्लेख केल्याचा सापडतो म्हणून या मंदिराचा कालखंड ११ वे ते १२ वे शतक मानला जातो.
मंदिराची रचना
नागेश्वर मंदिर हे शिल्पकलेने नटलेले आहे. मंदिराच्या भोवती २० फूट उंचीचा तट असून त्याला ४ प्रवेशद्वारे आहेत. या मंदिराच्या आवारासह लांबी २८९ बाय १९० फूट एवढी आहे. मुख्य मंदिर मात्र १२६ बाय ११८ फूट इतके आहे. मंदिराच्या आतील भागात वर्तुळाकार मंडप ८ खांबांनी तोलून धरला आहे. त्याचे छत घुमटाकार असून अष्टकोनी कलाकुसरीचे आहे. अशा येथील मंदिराच्या गर्भगृहात सुंदर शिवलिंग भूमिगत पद्धतीने ठेवण्यात आलेले आहे. परधर्मीयांच्या हल्ल्यापासून मंदिरातील मूर्तीला इजा पोहचू नये किंवा संभाव्य आक्रमणांपासून मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून ही खबरदारी घेतली आहे.
पूजा आणि उत्सव
महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव होतो तसेच येथे होणारा रथौत्सव पाहण्यासाठी लांबून भाविक या ठिकाणाला भेट देतात. रथाच्या ५ फेऱ्या मंदिराभावती मारल्या जातात. असं म्हटलं जातं की काशीची गंगा येथे प्रकट होते व कुंडाचे पाणी स्वच्छ करून टाकते. विजयादशमीच्या दिवशी नागनाथ महाराजांची पालखी निघते.
कसे पोहोचाल?
विमानाने –
जवळचे विमानतळ : नांदेड आणि औरंगाबाद
रेल्वेने –
जवळचे रेल्वे स्थानक : हिंगोली.
मोठे रेल्वे स्टेशन : परभणी हे आहे. परभणी हे थेट दिल्ली, मुंबई, बेंगलोर, हैदराबादशी जोडलेली आहे.
रस्त्याने –
औरंगाबादपासून रस्ता मार्ग : २०० कि.मी.
नांदेडपासून रस्ता मार्ग : ७० कि.मी.
परभणीपासून रस्ता मार्ग : ५६ कि.मी.
हिंगोलीपासून रस्ता मार्ग : २४ कि.मी.
शब्दांकन – शामल भंडारे.
=====
हे देखील वाचा: बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग – वैजनाथ
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.