ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील प्रसिद्ध अशा बोंडी बीचवर झालेल्या हल्ल्यातील अनेक पैलू आता समोर येत आहेत. बोंडी बीचवर हनुक्का हा प्रकाशोत्सव साजरा करण्यासाठी सुमारे २००० नागरिक उपस्थित होते. या हनुक्का उत्सवाचा हा पहिलाच दिवस असल्यामुळे ऑस्ट्रेलियामधील अनेक ज्यू कुटुंब यावेळी उपस्थित होती. हनुक्का उत्सावाची पहिली मेणबत्ती लावण्यास काही मिनिटांचा अवधी असतांनाच साजिद आणि नवीद अक्रम या दोघांनी उपस्थितांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ही उत्सवाची सुरुवात आहे, त्यासाठी आतिषबाजी सुरु आहे, असं उपस्थितांना वाटले, मात्र काही क्षणातच हा आनंद आक्रोशामध्ये बदलला गेला. कारण एकापाठोपाठ एक रक्ताच्या थारोळ्यात खाली पडायला लागले. त्यानंतर सर्वांचीच धावपळ सुरु झाली आणि आपल्यासोबत असलेल्या लहान मुलांना वाचवण्यासाठी पालकांनी अक्षरशः मुलांना मातीतून फरफटत नेलं. हा गोळीबार सुरु असतांना एक कुटुंब वेगळं झालं. आई आणि मुलगा एका बाजुला गेले, आणि त्या मुलाचा बाबा दुस-या बाजुला फेकला गेलाच पण त्याच्या डोळ्याजवळ एक गोळीही लागली. रक्तबंबाळ झालेल्या या माणसाचा चेहरा आज ऑस्ट्रेलियामधील ज्यू समाजावर झालेल्या गोळीबाराचा चेहरा झाला आहे. (Arsen Ostrovsky)

ही व्यक्ती आहे, आर्सेन ओस्ट्रोव्स्की. प्रसिद्ध वकील असलेले आर्सेन या दहशतवादी हल्ल्यातून वाचले असले तरी आपण जिंवत आहोत, यावर त्यांचा विश्वास बसत नाही. आर्सेन ओस्ट्रोव्स्की असेच ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यातूनही वाचले आहेत. आता आर्सेन या दोन्हीही हल्ल्यामधील फरक किती आहे, हेही स्पष्ट करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी बीचवर झालेल्या हल्ल्यात सुमारे १६ जण ठार झाले असून ४० हून अधिक जखमी झाले आहेत. याच जखमींमध्ये आर्सेन ओस्ट्रोव्स्की यांचाही समावेश आहे. प्रसिद्ध वकील असलेले आर्सेन हे इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यातूनही वाचले आहेत. या दोन्ही हल्ल्यातून आपण वाचलो असून आपण भाग्यवान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच आर्सेन यांनी या दोन्ही हल्ल्यामधील फरक स्पष्ट केला आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी, पॅलेस्टिनी राष्ट्रवादी इस्लामिक राजकीय संघटना हमासची लष्करी शाखा असलेल्या अल-कसम ब्रिगेड्सने गाझा पट्टीवरून इस्रायलवर अचानक हल्ला केला. तेव्हाही ज्यू धर्मियांचा उत्सवच होता. (International News)
किबुत्झ रीम जवळील शेमिनी अत्झेरेट या ज्यू उत्सवादरम्यान आयोजित केलेल्या सुपरनोव्हा या संगीत महोत्सवासाठी अनेक ज्यू जमले होते. यात तरुणांचा भरणा अधिक होता. या महोत्सवावर हमासनं केलेल्या हल्ल्यात ३७८ ठार झाले, तर अनेक जखमी झाले. शिवाय हमासच्या दहशतवाद्यांनी अनेक तरुणींना ओलीस म्हणून ताब्यात घेतले. आर्सेन हे सुद्धा या महोत्सवाच्या वेळी उपस्थित होते. हा हल्ला झाला तेव्हा त्यांनीही स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी पळून जाण्याचा मार्ग पत्करला. मात्र सिडनी येथे झालेल्या हल्ल्यात पळून जाण्यापेक्षा आपल्यासोबत असलेल्यांचा जीव वाचवण्यासाठी धडपडणारे अनेक होते, असे आर्सेन सांगतात. (Arsen Ostrovsky)

बोंडी बीचवर लहान मुले होती. गोळीबार सुरु झाल्यावर या लहान मुलांना वाचवण्यासाठी त्यांच्या पालकांची धडपड सुरु झालीच पण उपस्थित अन्य लोकांनीही आपल्या जीवापेक्षा लहान मुलांचा जीव वाचवायला हवा, म्हणून या मुलांना मातीवरुन ओढून सुरक्षित स्थळी लपवले. त्यामुळे मोठ्या संख्येनं मुलं असली तरी हल्ल्यात फक्त दहा वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू झाला. आर्सेन यांच्या डोक्याला गोळी लागली असून आपल्यासमोरुन मृत्यू गेला, असं ते सांगतात. (International News)
=====
हे देखील वाचा : Hanukkah : ज्यू समुदायाच्या प्रकाशोत्सवाला रक्ताचा डाग !
=======
आर्सेन ओस्ट्रोव्स्की यांच्यासोबतही त्यांचा लहान मुलगा आणि पत्नी होती. गोळीबार चालू झाल्यावर पत्नीनं मुलाला वाचवण्यासाठी आपल्या पुढे पकडले आणि ती पळाली, त्यांच्यापाठोपाठ आर्सेन ही पळू लागले. तेव्हा त्यांच्या डोक्यात गोळी लागली. आर्सेन यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले की, ते वाचले आहेत, हा एक चमत्कार आहे. आर्सेन सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. ज्यू समुदायासोबत काम करण्यासाठी, यहूदीविरोधी लढा देण्यासाठी ते दोन आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात आले होते. आर्सेन ओस्ट्रोव्स्की हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वकील आणि द इंटरनॅशनल लीगल फोरम चे सीईओ आहेत. त्यांनी इस्रायली-ज्यू काँग्रेसचे कार्यकारी संचालक म्हणूनही काम केले आहे. विशेषतः युरोपमधील ज्यू समुदाय आणि इस्रायलच्या समर्थनार्थ काम करणा-यांमध्ये आर्सेन यांचा समावेश आहे. (Arsen Ostrovsky)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
