Home » दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी हिरोशिमाचीच निवड का केली?

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेनं अण्वस्त्र हल्ला करण्यासाठी हिरोशिमाचीच निवड का केली?

by Team Gajawaja
0 comment
Hiroshima and Nagasaki
Share

दुसऱ्या महायुद्धात जपानी सैनिकांच्या शौर्यापुढे अमेरिका त्रस्त झाली होती. अमेरिकेची लढाऊ विमानं पाडण्यासाठी ते आत्मघातकी मिशनमध्ये सहभागी व्हायलाही मागेपुढे पाहायचे नाहीत. त्यामुळे त्रस्त झालेल्या अमेरिकेनं जपानला नमवण्यासाठी अखेर जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच अण्वस्त्र हल्ला करण्याचं ठरवलं. पण त्यासाठी हिरोशिमाचीच निवड का केली? (Hiroshima and Nagasaki bombings)

वर्ष १९४५ उजाडेपर्यंत सामान्य जपानी माणसाचं आयुष्य बिकट झालं होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या झळा तीव्र झाल्या होत्या. दुकानांतून अंडी, दूध, कॉफी, चहा अशा दैनंदिन गरजेच्या वस्तू गायब झाल्या होत्या. शाळेतली मैदानं आणि घरच्या बागेत भाज्या पिकवून खाण्याशिवाय नागरिकांपुढे पर्याय उरला नव्हता. पेट्रोलच्या टंचाईमुळे सगळीकडे चालत जावं लागायचं… सामान्यांचं जीवन इतकं अवघड झालं असलं, तरी युद्धात जपानी सैनिक मागे पडत नव्हते आणि अमेरिकेला तोडीस तोड उत्तर देत होते. 

अमेरिकेला त्रास देण्यासाठी जपानी सैन्यानं ‘कामिकाझे’ तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला होता. कामिकाझे म्हणजे स्फोटक द्रव्यांनी भरलेलं विमान शत्रूच्या तळावर किंवा विमानांवर आदळवून ते उध्वस्त करत जपानी सैनिक हाराकिरी करायचे. विशेष म्हणजे, अशाप्रकारच्या आत्मघातकी मोहिमांमध्ये सहभागी व्हायला जपानी सैनिक मागेपुढे पाहायचे नाहीत.

जपान्यांच्या या कामिकाझेमुळे अमेरिका चांगलीच हैराण झाली होती. अखेर अमेरिकेनं जपानला शरण आणण्यासाठी आतापर्यंतचं सर्वात खतरनाक आणि टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेत अण्वस्त्र हल्ला करण्याचं ठरवलं. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी या हल्ल्याला परवानगी दिली आणि जगातली सर्वात क्रुर नरसंहाराची घटना लिहिली गेली. (Hiroshima and Nagasaki bombings)

हिरोशिमाच का?

जपान्यांच्या कामिकाझेमुळे अमेरिकेचं प्रचंड नुकसान होत होतं. ते कमी करून जपानला मागे हटण्यासाठी भाग पाडण्याचा अमेरिकेचा उद्देश होता, पण त्यासाठी मुद्दाम हिरोशिमाची निवड करण्यात आली कारण जपानला फक्त शरण आणून अमेरिकेचं समाधान होणार नव्हतं, तर जपानची युद्ध लढण्याची क्षमता किमान काही वर्षांसाठी तरी नष्ट व्हावी अशी अमेरिकेची इच्छा होती. 

हिरोशिमा हे त्याकाळी जपानमधलं सातव्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर होतं आणि तिथेच सैन्याचं मुख्यालय होतं. सैन्याला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या पुरवठ्याची गोदामं हिरोशिमामध्येच होती आणि युद्धनीती आखण्याचं कामही तिथूनच व्हायचं. हिरोशिमाच नष्ट झालं, तर जपानला शरण येण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशा ठाम समजुतीतून अमेरिकेनं हिरोशिमावर अण्वस्त्र हल्ला करण्याचं ठरवलं. पण अमेरिकेचा हा अंदाज साफ चुकला. (Hiroshima and Nagasaki bombings)

====

हे देखील वाचा – नैंसी पेलोसी ताइवानला गेल्याने का सुरु झाला वाद, का चीन संतप्त झालाय? जाणून घ्या

काय घडलं त्या दिवशी

६ ऑगस्ट १९४५ च्या त्या दिवशी जपान्यांचं आयुष्य नेहमीप्रमाणेच संथ गतीनं सुरू होतं. सकाळी सातच्या सुमारास जपानी रडारवर सात अमेरिकी विमानं येत असल्याचं दिसलं. सगळीकडे इशाऱ्याचे भोंगे वाजले, रेडिओ कार्यक्रम थांबवले गेले, मात्र देशात पेट्रोलची इतकी टंचाई होती की, अमेरिकी विमानांना थांबवण्यासाठी विमान पाठवणंही जपानला शक्य नव्हतं. आठ वाजायच्या सुमारास इशारा देणं थांबवलं गेलं, रेडिओही परत सुरू झाला… दरम्यान जपानच्या आकाशात वेगळंच नाट्य घडत होतं.

अमेरिकी वायुसेनेतले कर्नल पॉल टिबेट्स आणि त्याचे सहकारी एनोला गे नावाच्या विमानात बाँब टाकण्यासाठी सज्ज झाले होते. बरोब्बर आठ वाजून नऊ मिनिटांनी विमानाच्या इंटरकॉमवरून ‘लिटल बॉय’ नावाचा बाँब टाकत असल्याचं त्यांनी मायदेशी कळवलं. ३१ हजार फुट उंचीवरून पॅराशूटमधून बाँब टाकले गेले आणि हिरोशिमापासून अंदाजे २००० फूट उंचीवर असताना त्यांचा स्फोट झाला. 

मशरूमच्या आकाराच्या अतीप्रचंड ढगामागे अख्खं शहर क्षणात नाहीसं झालं. या स्फोटात जवळपास सव्वा लाख लोकांचा अक्षरशः जागीच मृत्यू झाला, तर शहरातल्या ८० टक्के इमारतींचा चुराडा झाला. जखमींची मोजदादच राहिली नाही… इतकं झाल्यानंतर जपान सहज शरण येईल असा अमेरिकेचा अंदाज होता, मात्र तो साफ चुकला.

इतकं होऊनही जपान मागे हटलं नाही. ते पाहून अस्वस्थ झालेल्या अमेरिकेनं क्रुरतेचा कळस गाठत तीनच दिवसांत, ९ ऑगस्ट रोजी नागासाकीवरही बाँबहल्ला केला. त्या हल्ल्यातही लाखो लोकांचा मृत्यू झाला. हिरोशिमा आणि नागासाकी या दोन्ही शहरं पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे मृत्यूचा अधिकृत आकडा कधीच कळू शकला नाही. मात्र, नागासाकीवर झालेल्या हल्ल्यानंतर जपानने शरणागती पत्करली. (Hiroshima and Nagasaki bombings)

हिरोशिमा दिवस

हिरोशिमा आणि नागासाकी इथं झालेला बाँबहल्ला जितका भयंकर होता, तितकंच त्यामुळे तयार झालेलं रेडिएशनही जपानच्या पुढच्या कित्येक पिढ्यांनी भोगलं. रेडिएशनमुळे जपानी नागरिकांना बरीच वर्ष कर्करोग, मानसिक अपंगत्व, जन्मजात दोष अशा विविध दुष्परिणामांना सामोरं जावं लागलं. त्या हल्ल्यातून सावरत जपाननं ‘फिनिक्स’ भरारी घेतली, मात्र दरवर्षी ६ ऑगस्टचा दिवस देशात आणि जगभरात हिरोशिमा दिवस म्हणून साजरा केला जातो. 

कीर्ती परचुरे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.