वर्ष होतं १९६५, हिंदी चीनी भाई भाईचा नारा देऊन १० वर्षं उलटून गेली होती. तरी चीन काही भारतीयांना भाऊ मानत नव्हता आणि मानत जरी असला तरी, शेतजमिनीच्या बांधावरून सख्खे भाऊ जसे पक्के वैरी होतात. तसाच चीन वागत होता आणि भारतावर काहीही बिनबुडाचे आरोप करत होता. चीन आरोप करत होता की भारताने त्यांच्या ८०० मेंढया आणि ५९ याक चोरले आहेत. चीनच्या या भंपक आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या एका खासदाराने चीनच्या हास्यास्पद आरोपांएवढंच विनोदी आंदोलन केलं होतं. त्यामुळे चीनच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. म्हणजे सेझवान चटणी खाऊन जेवढं तिखट लागणार नाही, तेवढी मिरची या अंदोलनामुळे चीनला झोंबली होती. ते आंदोलन केलं होतं, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी. हे आंदोलन काय होतं? हे जाणून घेऊ. (Atal Bihari Vajpayee)
१९५० साली चीनने ताकदीच्या जोरावर तिबेटवर स्वत:चं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. तेव्हा तिबेटीयन लोकांना भारताने आश्रय दिला, भारताचा स्व:भावच दिलदार आहे. पण या दिलदारपणामुळे चीन-भारत संबंध ताणले गेले. पुढे १९६२ मध्ये चीनने भारताच्या काही क्षेत्रावर आक्रमण केलं, काय नाय चायनीजच्या गाड्या टाकायला जागा हवी असेल, असो पण यामुळे युद्ध सुरू झालं. तेव्हा चीनी सैनिकांचा भारताने विरोध केला, पण त्यावेळी भारताचा पराभव झाला. हे युद्ध दोन महिने चाललं, आणि डिसेंबर १९६२ मध्ये चीनने युद्ध थांबवलं.
मग काही वर्ष सर्व काही शांत होतं, पण चीनला शांत बसवत नव्हतं, काही ना काही काड्या करत चीन भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता. कारण चीनला सिक्कीमवर कब्जा मिळवायचा होता. तेव्हा सिक्कीम भारताच्या हद्दीत असलं तरी, ते भारताचा भाग नव्हतं. सिक्कीमसाठी चीनने भारताच्या उकाळ्या पाकाळया काढायला सुरुवात केली. चाळीतले शेजारी ज्या कारणांवरुन भांडतात अगदी तसेच आरोप चीनने भारतावर केले. हो असेच आरोप चीनने भारताला पत्र पाठवून केले होते. ज्यामध्ये लिहिलं होतं की, भारतीय सैनिकांनी चीनच्या ८०० मेंढया आणि ५९ याक चोरले आहेत. हे असे ते अर्थहीन आरोप होते. वर चीनने धमकी सुद्धा दिली होती की, जर भारताने मेंढया परत केल्या नाहीत, तर भारताला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. (Atal Bihari Vajpayee)
तेव्हा संसदेत जनसंघाचे नेते अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) खासदार होते आणि त्यांनी या आरोपांना प्रतिउत्तर देण्यासाठी, ८०० मेंढया जमवल्या आणि त्या घेऊन ते दिल्लीच्या दुतावासासमोर गेले. मेढ्यांना गवत चरायला नाही आंदोलन करायला. मेढ्यांसोबत त्यांनी काही फलक सुद्धा नेले होते जे त्या मेंढयांच्या गळ्यामध्ये अडकवले होते. ज्यावर लिहिलं होतं “मुझे खा लो, लेकिन दुनिया बचालो.” तेव्हा आंदोलन करताना, उपहासात्मक चर्चा केली जात होती की, चीन आता मेंढया आणि याकवरुन सुद्धा वर्ल्ड वॉर सुरू करेल. हे सगळं पाहून चीनी दूतवासाने रागाच्याभरात भारतीय दूतवासाला एक पत्र लिहिलं ज्यात वाजपेयींच्या आंदोलनाला सरकारचाच पाठिंबा आहे, भारताचे नागरिक चीनचा अपमान करत आहे. अशी तक्रार त्यांनी केली. या आंदोलनामुळे चीनने केलेले अर्थहीन आरोप आणखी जास्त चर्चेत आले होते.
==============
हे देखील वाचा : Passport : भारतात चार रंगात मिळतो पासपोर्ट, जाणून प्रत्येक रंगाच्या पासपोर्टचे वैशिष्ट्य
==============
चीनने लिहिलेल्या पत्राला भारत सरकारने सुद्धा तेवढ्याच स्पष्टतेने प्रत्युत्तर दिलं, ‘काही भारतीय नागरिकांनी ८०० मेंढ्यांसोबत चीनी दूतावासासमोर आंदोलन केले हे सत्य आहे. मात्र, या आंदोलनात भारतीय सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. पण हे आंदोलन चींनने भारताला दिलेल्या युद्धाच्या धमकीच्या विरोधात शांतता आणि सद्भावनेचा संदेश देण्यासाठी करण्यात आलं होतं.’ असं लिहून भारताने चीन दूतवासाला पत्र धाडून दिलं. पण एवढं होऊन सुद्धा चीन गप्प बसला नाही. त्याने पुढे २ वर्षांनी १९६७ ला सिक्कीमच्या नाथुला पासवर भारतीय सैनिकांवर हल्ला केला. ज्याचा भारतीय सैन्याने तेवढ्याच ताकदीने प्रतिकार केला. या युद्धात चीनचं मोठं नुकसान झालं त्यांचे ४०० सैनिक मारले गेले. पण भारताने १९६२ च्या युद्धाचा बदला पूर्ण केला.