Home » आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत चहावाल्याच्या मुलीने मिळवले रौप्यपदक 

आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत चहावाल्याच्या मुलीने मिळवले रौप्यपदक 

by Team Gajawaja
0 comment
Nikita Kamlakar
Share

जिद्द म्हणजे काय असते, हे आज कोल्हपूरच्या निकिता सुशील कमलाकर (Nikita Kamlakar) या मुलीने दाखवून दिले आहे. कालपरवापर्यंत हे निकिता कमलाकर हे नाव कोणाला माहित नव्हते.  पण आज ही निकिता आपल्या देशासाठी मेडल घेऊन आली आहे. एका चहावाल्याच्या मुलीचा पराक्रम म्हणून बातम्या सोशल मिडियावर येऊ लागल्या आणि निकिताबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांच्याच मनात निर्माण झाली. 

निकिताचा संपूर्ण प्रवासच संघर्षाचा आहे. तिच्या या संघर्षाला तिच्या आई-वडिलांचा मोठा पाठिंबा आहे.  निकिता कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील तेरवाड मधली. तिचे वडिल सुशील कमलाकर हे दोन्ही पायांनी अधु आहेत. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी ते फिरत चहा विकण्याचा व्यवसाय करतात. शाळा, बँक, कार्यालयामध्ये सायकलने जाऊन ते चहा विक्री करतात. निकिताची आई दत्त साखर कारखान्यातील दवाखान्यात नर्स म्हणून काम करते. निकिताच्या घरची परिस्थिती अगदी बेताची आहे. 

शाळेत असतानाच निकितामधील गुण तिच्या शिक्षकांनी हेरले. तिचे प्रशिक्षक विजय माळी यांनी ती पाचवीत असतानाच तिला वेटलिफ्टिंगचे धडे द्यायला सुरुवात केली. मुलीने वेटलिफ्टींगसारख्या क्रीडा क्षेत्रात जाण्यास अनेकांचा विरोध असतो. मात्र कमलाकर जोडप्यांनी आपल्या मुलीला प्रोत्साहन दिले.  त्यांची परिस्थिती नसतानाही या खेळासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गरजा पूर्ण केल्या.  (Asian Youth Weightlifting Championship –  Nikita Kamlakar)

आई वडिलांचे कष्ट आणि निकिताची मेहनत आता सार्थकी लागली आहे. आशियाई यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये निकिताने रौप्यपदक पटकावले आहे. ताश्कंद -उजबेकिस्तानमध्ये ही स्पर्धा सुरू असून निकिताच्या यशामुळे तिच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.  

====

हे देखील वाचा – कसा झाला कोल्हापूरच्या ऐश्वर्याचा विम्बल्डनपर्यंतचा प्रवास 

====

अत्यंत प्रतिकूल परस्थितीमध्ये असूनही निकीताने आकाशाला गवसणी घातली आहे. तिने एक महिन्यापूर्वी मेक्सिकोमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, तिथे तिला पदकानं हुलकावणी दिली. ही सर्व कसर तिने या यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भरुन काढली. (Nikita Kamlakar wins silver medal)

निकिताने 55 किलो वजनी गटात 67 किलो स्नॅक आणि 95 किलो क्लीन अँन्ड जर्क असे एकूण 163 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले. पाचवीपासून वेटलिफ्टिंग करणारी निकिता आता बारावीमध्ये शिकत आहे. या यशानं तिच्या संघर्षाला एक ओळख मिळाली आहे. निकिताला प्रशिक्षक विजय माळी, विश्वनाथ माळी, निशांत पवार यांनी मार्गदर्शन केले.  त्यांनाही तिच्या यशाचा अभिमान वाटत आहे.  

आईवडीलांच्या कष्टाची निकीताला जाणीव आहे. तसेच आपल्या प्रशिक्षकांवरही तिचा विश्वास आहे. निकिताचे आगामी लक्ष आहेऑलिम्पिक स्पर्धा. ऑलिम्पिंक स्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न ती पाहतेय. त्यामुळे मिळालेलं यश साजरं करून ती तयारीलाही लागली आहे. तिच्या यशासाठी शुभेच्छा….

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.