Home » अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीत बदल झाल्यामुळे होणाऱ्या वादाचं नेमकं कारण काय?

अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीत बदल झाल्यामुळे होणाऱ्या वादाचं नेमकं कारण काय?

by Team Gajawaja
0 comment
Ashok stambh controversy
Share

नुकतंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सेंट्रल व्हिस्टा’ या प्रकल्पाचा भाग म्हणून उभ्या करण्यात येत असलेल्या नवीन संसद भवन परिसरात सारनाथ इथल्या अशोक स्तंभाच्या प्रतिकृतीचं अनावरण केलं. हे मानचिन्ह मूळ सारनाथ स्तंभासारखं नाही, त्यामधील सिंहांच्या रचनेत बदल करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येतोय. (Ashok stambh controversy)

सम्राट अशोकाने उभ्या केलेल्या अशोक स्तंभावरील सिंह आणि नवीन संसद भवनावरील अशोकस्तंभ प्रतिकृतीतील सिंह यांच्या मुद्रांमध्ये असलेला फरक विरोधी पक्षांनी अधोरेखित केला आहे. नवीन प्रतिकृतीतील सिंह हे मूळ अशोक स्तंभावरील सिंहांचा रुबाब दर्शवत नसून गुजरातमधल्या गीरच्या अभयारण्यातल्या सिंहांच्या क्रूरपणाचं प्रतिबिंब असल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी अशोक स्तंभाची प्रतिकृती घडवत असताना करण्यात आलेले बदल अनावश्यक आणि अयोग्य असल्याची प्रतिक्रिया विविध क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

भारताच्या इतिहासात शूर आणि पराक्रमी म्हणून लौकिक असलेला मौर्य राजा सम्राट अशोक याने भारतात अनेक स्तंभ आणि स्तूप उभे करुन बौद्ध धर्माचा प्रसार केला. उत्तर प्रदेशातल्या सारनाथ इथे या अशोक स्तंभाची निर्मिती केली आहे. सम्राट अशोकने दिल्लीजवळ फिरोजशहा कोटला, उत्तर प्रदेशात अलाहाबाद, मध्य प्रदेशात सांची आणि बिहारमध्ये लौरिया, नंदनगड आणि वैशाली अशा सहा ठिकाणी अशोक स्तंभांची उभारणी केली होती. (Ashok stambh controversy)

भारताचं राष्ट्रीय प्रतिक (नॅशनल एम्ब्लेम) म्हणजेच राजमुद्रा ही सारनाथच्या अशोक स्तंभावरुन घेण्यात आली आहे. सारनाथ अशोक स्तंभाच्या वरच्या बाजूला चार सिंहांची रचना करण्यात आली आहे. हे चारही सिंह एकमेकांकडे पाठ करुन आहेत. हे सिंह शक्ती, साहस, अभिमान आणि आत्मविश्वास या गुणांचं प्रतिक आहेत. सिंहांबरोबरच बैल, हत्ती आणि घोडा यांच्या रचनाही या स्तंभावर करण्यात आल्या आहेत. या स्तंभांवर तीन शिलालेखही आहेत. सम्राट अशोकच्या काळातला शिलालेख हा ब्राह्मी लिपिमध्ये लिहिलेला आहे. 

सम्राट अशोकाने उभारलेला अशोकस्तंभ हा राजमुद्रा – नॅशनल एम्ब्लेम – म्हणून का निवडण्यात आला याची अनेक कारणं आहेत. अशोक स्तंभावर विराजमान चार सिंह हे शक्ती, साहस, अभिमान आणि आत्मविश्वासाचं प्रतिक आहेत. २४ आरे असलेल्या अशोकचक्राचा या राजमुद्रेमध्ये समावेश आहे. (Ashok stambh controversy)

२६ जानेवारी १९५० रोजी राजमुद्रा म्हणून अशोक स्तंभाची निवड करण्यात आली. ‘सत्यमेव जयते’ हे या राजमुद्रेचं ब्रीदवाक्य आहे. राजमुद्रा ही देशातल्या संपूर्ण शासकीय पत्रव्यवहार आणि कामकाजाची अधिकृतता दर्शवते. सारनाथ अशोकस्तंभावरुन निश्चित करण्यात आलेल्या राजमुद्रेचं रेखाटन हे ज्येष्ठ कलाकार दीनानाथ भार्गव यांनी केल्याचं मानलं जातं.

राजमुद्रेचा वापर ही अत्यंत गंभीर आणि महत्त्वाची गोष्ट आहे. तो वापर कुणी आणि कसा करायचा याचे काही कठोर नियम आहेत. त्यांचं उल्लंघन झालं तर तो एक गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी कठोरात कठोर शिक्षेची तरतूद आहे. भारतीय चलनी नोटा आणि नाणी, भारताचा पासपोर्ट यांच्यावर राजमुद्रेची प्रतिमा असते. भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या टोपीवर राजमुद्रा असते. मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजेच खासदारांना त्यांच्या अधिकृत लेटर हेड आणि व्हिजिटिंग कार्ड्सवर या राजमुद्रेची प्रतिमा छापण्याची परवानगी असते. (Ashok stambh controversy)

======

हे देखील वाचा- G-7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी दिल्या खास भेटी… वाचा कोणाला काय दिले? 

=====

राष्ट्रपती भवन, संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, सेंट्रल सेक्रेटरिएट्स, राजभवन किंवा राजनिवास, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची अधिकृत कार्यालयं, परदेशातील भारतीय वकिलाती अशा महत्त्वाच्या स्थळांवर या राजमुद्रा लावण्यास परवानगी असते. राजमुद्रेच्या वापराबाबत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंडात्मक रक्कम अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.