अठ्ठावीस युगांपासून विटेवर उभे राहून आपल्या भक्तांना दर्शन देणारा विठ्ठल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आणि आराध्य दैवत. दक्षिण कशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरमध्ये विठ्ठल त्यांची पत्नी असलेल्या रुक्मिणीसोबत निवास करतात. हेच पंढरपूर आज भक्तांच्या गर्दीने भरून गेले आहे. निमित्तच तसे आहे आषाढी एकादशीचे.
आपल्या १२ महिन्यांच्या वर्षाच्या कॅलेंडरमध्ये प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षात एक आणि शुक्ल पक्षात एक अशा एकूण २४ एकादशी येतात. यातच आषाढ महिन्यात येणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी. याला देवशयनी एकादशी, मोठी एकादशी देखील म्हटले जाते. यादिवशी पंढरपुरात मोठी यात्रा भरते. जगाच्या कानाकोपऱ्यातून यादिवशी इथे भक्त येतात आणि विठुरायाचे दर्शन घेतात. (Ashadhi Ekadashi)
सोबतच महाराष्ट्रातील विविध गाव, खेडे, शहरांमधून पंढरपूर इथे वाऱ्या येतात. यात शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते. या वाऱ्यांसोबत हजारो, लाखो लोकं पायी येतात आणि आषाढीला चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात.
आषाढी किंवा देवशयनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णू पुढील चार महिन्यासाठी योग निद्रेत जातात. त्यामुळे या काळात शुभ कार्ये केले जात नाही. या चार महिन्यांना चातुर्मास असेही म्हणतात. आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठीच विशेष असतो. खासकरून वारकरी सांप्रादायासाठी तर हा दिवस जरा जास्तच महत्वाचा असतो. या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजाही होते. (Ashadhi Ekadashi)
आषाढी एकादशी तिथी आणि शुभ मुहूर्त
हिंदू पंचागानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी किंवा आषाढी एकादशी साजरी केली जाते. यावर्षी ही आषाढी एकादशी १७ जुलैला साजरी केली जाणार आहे. आपल्या हिंदू पंचागानुसार एकादशीची तिथी ही १६ जुलैला रात्री ८ वाजून ३३ मिनिटांनी सुरु होऊन १७ जुलै रात्री ९ वाजून ३३ मिनिटांनी संपेल. सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार अथवा उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची ही तिथी १७ जुलै असणार आहे.
आषाढी एकादशीचे व्रत
आषाढी एकादशीला संपूर्ण दिवस उपवास करण्याची परंपरा आहे. काही लोकं निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात. अनेक लोकं विविध पद्धतीने हे व्रत आणि हा उपवास करतात. पांडुरंगाच्या चरणाजवळ विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याची मान्यता आहे. त्यामुळेच या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपास करतात. विठ्ठलाला भगवान विष्णूचा अवतार म्हणून ओळखले जाते. या दिवसापासून भगवान विष्णूची निद्रावस्था सुरु होते. त्यामुळे विठ्ठल भक्त पंढरपुरात जाऊन विठू माऊलीचा आशीर्वाद घेतला जातो. (Ashadhi Ekadashi)
दिवसभर भजन, पूजा, कीर्तन, हरीकीर्तनासाठी असे उपक्रम या दिवशी केले जातात. एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून अर्थात एकवेळेला जेवून एकादशीला पहाटे उठून स्नान करावे आणि भगवान विष्णूला तुळस अर्पण करावी. संपूर्ण दिवस उपवास करावा. रात्री हरिभजन करत जागरण करावे. देवाच्या नामस्मरणात दिवस घालवावा. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे. या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा. विठ्ठल दर्शनाने पायवारी करून आलेल्यांची वारी सार्थकी लागते.
आषाढी एकादशीच्या दिवशी अतिशय साधा आणि सात्विक आहार ग्रहण करावा. या दिवशी चुकूनही मांस, दारू, लसूण, कांदा यांचे सेवन करू नये. याशिवाय या दिवशी कोणतेही नशा करणारे पदार्थ सेवन करू नयेत. या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते. (Ashadhi Ekadashi)
======
हे देखील वाचा : पोट कमी करण्यासाठीचे काही उपाय
======
आषाढी एकादशी महात्म्य कथा
शंकरानी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला एका स्त्रीच्या हातून मरण पावशील असा वर दिला. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकणार नाही असा विचार करत थेट देवांवर स्वारी केली. हे पाहून देवांनी शंकराकडे मदतीसाठी आचण केली. पण त्यांनी दिल्यामुळे वरदानामुळे त्यांना देखील काहीही करता येत नव्हते. तेव्हाच देवाच्या श्वासातून एक देवी प्रकट झाली आणि तिनेच मृदुमान्य राक्षसाला ठार केले. तो दिवस देवांसाठी खूपच शुभ होता. त्या दिवशी जोरदार पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. (Ashadhi Ekadashi)
राक्षस मरेपर्यंत सर्व देव एका गुहेत लपून असल्याने त्यांना तो पूर्ण दिवस उपवास घडला. या पक्त झालेल्या देवीचे नाव होते एकादशी. तेव्हापासूनच एकादशीचा उपवास करण्याची परंपरा सुरु झाली. आपल्या शास्त्रानुसार जी व्यक्ती या दिवशी विष्णूसह देवी एकादशीची मनोभावे उपासना करते तिची सर्व पापातून सुटका होते.