देशभरात असलेल्या भगवान शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढत आहे. भगवान शंकराला जल अभिषेक करुन प्रसन्न करण्यासाठी हे भक्त प्रार्थना करीत आहेत. मात्र जिथे साक्षात अग्निच्या रुपात भगवान शंकर विराजमान आहेत, त्या मंदिरात देवाची पूजा कशी केली जाते, हे जाणून घेणे उत्सुकतेचे आहे. तामिळनाडू राज्यामध्ये असेच एक अद्वितीय भगवान शंकराचे मंदिर आहे. तिरुवन्नमलाई टेकड्यांच्या मध्यभागी असलेले हे मंदिर अरुणाचलेश्वर मंदिर भगवान शंकराच्या अग्निरुपासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराला अन्नामलाईयार मंदिर असेही म्हणतात. अरुणाचलेश्वर मंदिरात 3 फूट उंच अन्नामलाईयर लिंग असून येथे भगवान शिव अग्नीच्या रूपात विराजमान आहेत. या मंदिराचे शाही गोपुरम 217 फूट उंच आहे. दूरवरुन हे शाही गोपुरम भाविकांना दर्शन देतात. या गोपुरम म्हणजेच शिखरांचेही दर्शन झाले तरी भाविक देवाचा आशीर्वाद लाभल्याचे समाधान व्यक्त करतात. (Arunachaleshwar Temple)
श्रावण महिन्यानिमित्तानं देशभरातील भगवान शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी आहे. अशातच देशातील काही वैशिष्टपूर्ण मंदिरांमध्ये मोठ्या संख्येनं भाविक दाखल होत आहेत. यात तामिळनाडूतील तिरुवन्नमलाई टेकड्यांच्या मध्यभागी असलेल्या अरुणाचलेश्वर मंदिराचा समावेश आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, येथे महादेव अग्नीच्या रूपात भक्तांसमोर प्रकट झाले आहेत. अरुणाचलेश्वर शिव मंदिर 24 एकर एवढ्या मोठ्या जागेत पसरले आहे. या मंदिराचे शिखर, म्हणजेच गोपुरम 217 फूट आहे. त्याला राजा गोपुरम म्हणतात. अरुणाचलेश्वर शिव मंदिरामध्ये 3 फूट उंच अन्नामलाईयर लिंगम स्थापित केले आहे. या शिवलिंगाला उर्जेचे केंद्र मानले जाते. या अग्निशिवलिंगाचे दर्शन घेतल्याने सर्व क्लेश संपूष्टात येतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच या श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. (Social News)
तमिळ शैव धर्मात या मंदिराचे खूप धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. तामिळ भक्ती ग्रंथ, थेवरम, थिरुवेमपावई आणि थिरुप्पुगझ मध्येही या मंदिराच्या भव्यतेचा आणि येथील अग्निशिवलिंगाच्या पावित्र्याचा उल्लेख आहे. या मंदिराचे गोपुरम हे भारतभर त्याच्या अनोख्या कलेसाठी ओळखले जातात. तंजावर नायकर राजवंशातील सेवाप्पा नायकर यांनी या भव्य गोपुरमची उभारणी केली. या मंदिर परिसरात अन्यही मंदिर आहे. यातील मुख्य मंदिर अन्नामलाईयार मंदिर आहे. तर भगवान शंकराची पत्नी म्हणून उन्नामुलाई अम्माई या पार्वतीच्या रुपातील देवीचेही भव्य मंदिर याच संकुलात आहे. विजयनगर राजवंशाच्या काळात येथे बांधलेला हजार स्तंभांचे सभागृह पाहतांना आजही भाविक स्तब्ध होतात. याशिवाय चोल राजवंश, सालुवा राजवंश आणि तुलुवा राजवंशांनी या मंदिराच्या उभारणीमध्ये आपापल्या काळात भर टाकली आहे. (Arunachaleshwar Temple)
या मंदिरातील अग्नि शिवलिंगासंदर्भात एक कथा सांगितली जाते, त्यानुसार एकदा, भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यात त्यांच्यापैकी कोण श्रेष्ठ आहे यावर वाद झाला. हा वाद वाढल्यावर सर्वच देवांनी भगवान शंकराला वाद मिटवण्याची प्रार्थना केली. त्यावर भगवान शंकर ब्रह्मा आणि विष्णू त्यांच्यासमोर अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले. यावेळी महादेवांनी घोषित केले की, ज्याला या स्तंभाचा वरचा भाग किंवा तळ सापडेल तोच श्रेष्ठ मानला जाईल. त्यासाठी ब्रह्माने हंसाचे रूप धारण केले आणि शिखराच्या शोधात वर उडून गेला, तर विष्णूने वराह रूप धारण केले आणि ते पाया शोधण्यासाठी पृथ्वीतलात खोलवर खोदू लागले. अथक शोधानंतर, विष्णूने नम्रपणे पराभव स्वीकारला, त्यांना समजले की स्तंभ अंतहीन आहे. (Social News)
===================
हे देखील वाचा : Mansa Devi Temple : नागांची देवी म्हणून पुजल्या जाणा-या मनसा देवीचे रहस्य
===================
मात्र अहंकाराने ग्रासलेल्या ब्रह्माने आपल्याला शिखर सापडल्याचे खोटे सांगितले. त्यामुळे ज्योतीच्या रुपात भगवान शंकर तिरुवन्नमलईमधील अन्नामलाई टेकडी येथे प्रकट झाले. आता हे शिवलिंग लिंगोद्भव म्हणून ओळखले जाते. सुरुवात किंवा अंत नसलेल्या परमात्म्याचे प्रतीक म्हणून त्याची पूजा केली जाते. या मंदिरात पौराणिक काळापासून ज्या पुजा होत होत्या, त्या पूजा आजही त्याच स्वरुपात होत आहेत. मंदिरात बारा वार्षिक महोत्सव साजरे होतात. त्यातही कार्तिगाई दीपम उत्सव नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी टेकडीवरील उंच जागी एक मोठा दिवा लावला जातो. हा दिवा दूरवरून दिसतो आणि आकाशात विलीन होणाऱ्या अग्नीच्या शिवलिंगाचे प्रतीकाच्या स्वरुपात त्याला नमन केले जाते. हा सर्वात भव्य सोहळा असतो. यासाठी सुमारे तीस लाख भाविक उपस्थित असतात. (Arunachaleshwar Temple)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics