अंटार्क्टिकामध्ये हजारो हिमनद्या आहेत. पूर्व अंटार्क्टिका, पश्चिम अंटार्क्टिका आणि अंटार्क्टिका द्वीपकल्पात सर्वात जास्त बर्फ साठलेला आहे. अंदाजे ९०% भाग बर्फानं व्यापलेला आहे. अनेक लहान-मोठ्या हिमनद्या येथे असून त्यावरील बर्फाच्या आवरणाचे संशोधन होत आहे. यातून एक धक्कादायक अहवाल आता काढण्यात आला असून अंटार्क्टिकामधील बर्फाच्या या हिमनद्या वेगानं वितळत असल्याचे स्पष्ट होत आहे. या हिमनद्या वितळण्याचा वेग काही वर्षापासून झपाट्यानं वाढला आहे. नुकत्याच एका पाहणीत अंटार्क्टिकामधील प्रमुख हेक्टोरिया हिमनदी दोन महिन्यांत अर्ध्याने गायब झाल्याचे संशोधकांनी दिसून आले. (Antarctica)

यामुळे लाखो लिटर पाणी समुद्रात सामावले असून समुद्राची पातळी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. हा बदलत्या हवामानाचा सर्वात मोठा धोका आहे. अंटार्क्टिकाच्या हेक्टोरिया हिमनदीने फक्त दोन महिन्यांत जवळजवळ अर्धा बर्फ गमावला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात जलद आणि सर्वात धक्कादायक हिमनदी वितळण्याचा एक रेकॉर्डच झाला आहे. यामुळे संशोधक धास्तावले आहेत. कारण अंटार्क्टिकामधील अन्य हिमनद्याही अशाच वेगानं वितळू लागल्या तर जगभरातील समुद्र किना-यांना धोका निर्माण होणार आहे. सखल भागात वसलेल्या जगभरातील सर्व किनारी शहरांना पुराचा धोका निर्माण होणार आहे. फ्लोरिडा आणि डेन्मार्कचे काही भाग पूर्णपणे पाण्याखाली जातील अशी शक्यता संशोधक व्यक्त करीत आहेत. आता या हिमनद्या वितळण्याचा वेग निश्चित करण्यासंबंधीचे संशोधन करण्यात येत असून त्यातून जगभरातल्या कुठल्या समुद्र किना-यांना धोका निर्माण होईल, याचे पडताळणी सुरु झाली आहे. (International News)
गेल्या काही वर्षापासून बदलत्या हवामानाचा सर्वात मोठा फटका अंटार्क्टिकामधील हिमनद्यांना बसला आहे. अंटार्क्टिकामध्ये पृथ्वीच्या ९०% बर्फ आहे. हा बर्फ इतका जाड आहे की, त्याची सरासरी जाडी २,१६० मीटर आहे. यामुळे पृथ्वीच्या समुद्राची पातळी अंदाजे ७० मीटरने वाढण्यास पुरेशी ठरणार आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून अंटार्क्टिकामधील बर्फाची जाडी कमी होऊ लागली आहे. अंटार्क्टिकामधील हिमनद्या वितळू लागल्या आहेत. याबाबत अनेक संशोधक अंटार्क्टिकामध्ये संशोधन करीत आहेत. कोलोरॅडो बोल्डर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून असे दिसून आले की, सपाट खडकांच्या पृष्ठभागामुळे हेक्टोरिया हिमनदी अचानक तरंगू लागली आणि काही आठवड्यांतच ती आठ किलोमीटर मागे सरकली. अशाच प्रकारे अंटार्क्टिकाच्या हिमनद्या वितळल्याने जगभरातील किनारी शहरांना धोका निर्माण होणार आहे. यामुळे समुद्राची पातळी वाढेल आणि जगभरातील सखल भाग पाण्याखाली जातील. जगभरातील सर्व किनारी शहरांचे अस्तित्वच समुद्राची पातळी वाढल्यास नष्ट होणार आहे. (Antarctica)

या नद्यांवर संशोधन करणारे संशोधक अधिक चिंतीत झाले आहेत, कारण गेल्या दोन महिन्यापासून हिमनद्या वितळण्याचा वेग अचानक वाढला आहे. पूर्व अंटार्क्टिकामध्ये असलेल्या हेक्टोरिया हिमनदीचा २०२३ च्या सुरुवातीला फक्त दोन महिन्यांत ११५ चौरस मैल बर्फ वितळला आहे. यातून हवामान तज्ञ सजग झाले असून याकडे भविष्याताल गंभीर धोका म्हणून बघितले जात आहे. याबाबत नेचर जिओसायन्समध्ये अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये या सर्व घटनेचे फोटो उपग्रहामार्फतही घेण्यात आल्याचे म्हटले आहे. या हिमनदीच्या वितळण्याची माहिती मिळाल्यावर CIRES मधील प्रमुख संशोधकांनी या भागाचा प्रत्यक्ष दौरा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२४ च्या सुरुवातीला जेव्हा हेक्टोरिया हिमनदी पाहिली, तेव्हा आम्हाला मोठा धक्का बसला. (International News)
=======================
हे देखील वाचा : Danky soap : गाढवाच्या दुधापासून बनलेल्या साबणाला तुफान मागणी !
=======================
प्रत्यक्ष दृश्य उपग्रहांनी काढलेल्या छायाचित्रांपेक्षाही भयानक असल्याचे या संशोधकांनी सांगितले. अंटार्क्टिकावरील एकूणच बर्फाच्या आवरणाचा एक मोठा भाग विरळ होत चालल्याची ही खूण आहे. असे झाले तर, इतर मोठ्या हिमनद्यांमध्ये अशाच घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. हा सर्वात मोठा धोक्याचा इशारा असणार आहे, कारण यातून जागतिक समुद्राची पातळी वाढू शकते. अंटार्क्टिकामधील हिमनद्या अशाच वितळल्या तर पुढच्या काही वर्षात जगभरातील समुद्रकिना-यावरील अनेक देश पाण्याखाली जाणार आहेत. तसेच अनेक शहरांनाही समुद्राचे पाणी आपल्यात सामावून घेणार आहे. अंदाजानुसार, अंटार्क्टिकामधील सर्व बर्फ वितळला तर समुद्राची पातळी अंदाजे ७० मीटर किंवा २३० फूट वाढेल. असे झाल्यास संपूर्ण जगाचा नक्षा बदलला जाणार आहे. (Antarctica)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
