ब्रिटीश (British) साम्राज्य, हे इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य असल्याची नोंद काही ठिकाणी आहे. वास्तविक ब्रिटीश साम्राज्यानं जेवढे अत्याचार केले असतील तेवढे कुठल्याच शासकानं केले नाहीत. अनेक देशांना ओरबाडून ब्रिटीशांनी आपली तिजोरी भरली. त्यात भारताचा प्रमुख समावेश आहे. एका शतकाहून अधिक काळ ब्रिटीशांनी जगावर सर्वात मोठे लष्करी आणि आर्थिक महासत्ता म्हणून राज्य केले. दुसऱ्या महायुद्धानंतर या ब्रिटीश साम्राज्यापासून अनेक देशांची सुटका झाली आणि त्यांना स्वातंत्र मिळाले. आता या घटनेला अनेक वर्ष उलटून गेली आहेत. ब्रिटीश साम्राज्याचाही वचक कमी झाला आहे. मात्र या ब्रिटीश (British) राजघराण्यानं जगावर सत्ता मिळवण्यासाठी केलेली दडपशाही, आखलेले कट आता कुठे उघडकीस येत आहेत. असाच एक प्रकार आता चर्चेत आहे. इथिओपियन राजकुमराला विष देऊन त्याची ब्रिटीश राजघराण्यानं हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हत्या केलेला हा इथिओपियन राजकुमार अवघ्या 18 वर्षाचा होता. त्याचा मृतदेह त्याच्या मातृभूमीत न पाठवताच ब्रिटीश राजघराण्यानं अज्ञात जागेत पुरला आहे. आता त्याचे अवशेष परत करावे अशी मागणी इथिओपिया कडून ब्रिटीश (British) राजघराण्याकडे करण्यात आली आहे. तसेच विष देऊन आपल्या शत्रूंना संपवण्याचे काम ब्रिटीश राजघराणे अनेक वर्ष करीत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. राजकुमाराच्या कुटुंबानं केलेल्या या आरोपामुळे खळबळ उडाली असून, अशाप्रकारच्या घटनेचा ब्रिटीश राजघराण्यानं निषेध केला आहे.
मुळात हे सर्व प्रकरण काय आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. इथिओपिया या आफ्रिकन देशातील राजकुमाराचे अवशेष ब्रिटनमध्ये दफन आहेत, आणि ते आता त्याच्या कुटुंबियांना परत द्या अशी मागणी पुढे आली, आणि ब्रिटीश राजघराण्यात खळबळ उडाली. 19व्या शतकात विंडसर कॅसल येथे इथिओपियन राजपुत्राच्या मृतदेहाचे दफन करण्यात आल्याच्या दाव्यानं सर्व जगात खळबळ उडाली आहे. 1868 मध्ये ब्रिटीश (British) सैन्याने उत्तर इथिओपियाच्या शाही राजवाड्यावर हल्ला केला. या लढाईत सम्राट टिओड्रॉस द्वितीय याचा मृत्यू झाला. सम्राटाच्या मृत्यूनंतर ब्रिटिश सैनिकांनी राणी आणि राजपुत्र अलेमायेहू याला अटक केली. इथिओपियामध्ये आपले शासन लावले आणि इथिओपियाच्या राणी आणि राजकुमाराला ब्रिटीश जेलमध्ये पाठवून दिले. पण या प्रवासात राणीचा मृत्यू झाला आणि अगदी सात वर्षाचा राजकुमार अलेमायेहू एकाकी पडला. अफ्रिकेचा हा लहान राजकुमार 1868 च्या जूनमध्ये ब्रिटनमध्ये आला. तेव्हा राणी व्हिक्टोरियाचे राज्य होतं. तिच्यासमोर या राजपुत्राला हजर करण्यात आले. या राजकुमाराची स्थिती पाहून राणीला त्याच्याबद्दल आपलेपणाची भावना वाटली. तिनं राजकुमाराच्या शिक्षणाची व्यवस्था केली. या राजकुमाराला राणीनं शिक्षण देण्यासाठी कॅप्टन ट्रिस्ट्रम चार्ल्स सॉयर स्पीडी यांची नेमणूक केली. कॅप्टन ट्रिस्ट्रम चार्ल्स हेच इथिओपियाहून या राजपुत्राच्या सोबत होते. त्यांनी या राजकुमाराला जग दाखवण्यासाठी जगभराचा दौरा केला. मात्र हा दौरा म्हणजे राजकुमाराला ब्रिटीश राजवटीची ताकद किती आहे, याची जाणीव करुन देण्यासाठी होता, असे सांगितले जाते. पुढे या राजकुमाराला शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. अलेमायेहूला रग्बी येथील ब्रिटीश (British)पब्लिक स्कूलमध्ये पाठवण्यात आले. नंतर त्याला सँडहर्स्ट येथील रॉयल मिलिटरी कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. या दोन्ही ठिकाणी राजकुमाराचे शिक्षण व्यवस्थित झाले नाही. त्याला सतत अपमानाची वागणूक देण्यात आली. त्याचा काळा वर्ण त्याच्या आड येत होता. त्यामुळे राजकुमार अलेमायेहू यांचे शिक्षण लीड्समधील एका खाजगी घरात झाले. या दरम्यान अचानक राजकुमार अलेमायेहू अचनाक आजारी पडला. राजकुमार अलेमायेहू यांना न्यूमोनिया झाल्याचे सांगण्यात आले. पण राजकुमाराच्या मते त्याच्यावर विषप्रयोग झाला होता. त्यातूनच त्याचे आजारपण वाढले. राजकुमार अलेमायेहू हे दरम्यान ब्रिटनमध्ये ओळखले जाऊ लागले होते. त्यांच्या आजाराची बातमी वृत्तपत्रात गाजली. 1879 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी न्यूमोनियामुळे अलेमायेहू यांचे दुःखद निधन झाले. ब्रिटीश राजघराण्यानं या राजकुमाराच्या मृतदेहाचे विंडसर पॅलेसच्या शेजारी कॅटाकॉम्ब्समध्ये दफन केला.
=======
हे देखील वाचा : अमेरिका रासायनिक शस्त्रे नष्ट करणार…
=======
आता अवघ्या सात वर्षाचे असतांना ब्रिटनमध्ये गेलेल्या या राजकुमार अलेमायेहू यांच्या नातेवाईकांनी त्याच्या अस्थी पुन्हा आपल्या देशात पाठवण्याची मागणी ब्रिटीश राजघराण्याकडे केली आहे. यासोबत त्यांनी ब्रिटीश राजघराण्यावर राजकुमार अलेमायेहू यांना विष दिल्याचा आरोपही केला आहे. आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी ब्रिटीश राजघराणे अशीच पद्धत वापरत असे, अशी जोडही त्यांनी दिली आहे. या सर्व प्रकरणामुळे ब्रिटीश राजघराणे पुन्हा चर्चेत आले आहे. इथिओपियन राजकुमार अलेमायेहू याचा मृत्यू नेमका कशामुळं झाला हा प्रश्नही विचारण्यात येत आहे.
सई बने