Home » Anjan Dham in Gumla District, Jharkhand: गुढ अंजन धाम

Anjan Dham in Gumla District, Jharkhand: गुढ अंजन धाम

by Team Gajawaja
0 comment
Share

भगवान हनुमानाच्या जन्मस्थळाबाबत अनेक दावे केले जातात. कर्नाटकातील अंजनाद्री टेकड्या, आंध्र प्रदेशातील तिरुमला, महाराष्ट्रातील नाशिकमधील अंजनेरी डोंगर आणि झारखंडमधील अंजन धाम या ठिकाणी भगवान हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा केला जातो. मात्र असे वाद कितीही असले तरी या प्रत्येक स्थळी हनुमान भक्तांची मोठी गर्दी होत असते. यातही झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील अंजन धाम येथील गुहेमध्ये माता अंजनीचे वास्तव्य होते, असा दावा केला जातो. गुमला जिल्ह्यातील घनदाट अरण्यात असलेल्या या गुहा रहस्यमय मानल्या जातात. यातीलच एका गुहेमध्ये माता अंजनीने हनुमानाला जन्म दिल्याचे सांगितले जाते. हे स्थान गुमला जिल्हा मुख्यालयापासून अंदाजे १८ ते २१ किलोमीटर अंतरावर आहे. ( Anjan Dham Gumla District )

माता अंजनीचे येथे निवासस्थान होते, म्हणूनच या स्थानाचे नामकरण अंजन धाम पडले, असे सांगितले जाते. येथील स्थानिकांचा विश्वास आहे की हनुमानाचा जन्म याच टेकडीवरील गुहेत झाला. स्थानिक मान्यतेनुसार माता अंजनीने एकदा रागाच्या भरात येथील एक गुहा बंद केली. आजही ही गुहा बंद असून त्यामध्ये अनेक शिवलिंग असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी आता एक मंदिर असून येथे रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दोन्ही उत्सवांसाठी सध्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण सुरू आहे. झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील अंजन धाम हे भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. घनदाट जंगल आणि टेकड्यांच्या मध्ये वसलेले हे ठिकाण श्रद्धा आणि निसर्गाचा अद्भुत संगम आहे. याच ठिकाणाजवळ असलेल्या पालकोटमध्ये सुग्रीव गुहाही आहे. येथे ३६० शिवलिंग असल्याचे सांगितले जाते आणि हा परिसर रामायण काळात अत्यंत समृद्ध होता, असे मानले जाते.

माता अंजनीने याच अंजन धाममधील गुहेमध्ये हनुमानाला जन्म दिला, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे आज त्या स्थानावर मंदिर असून जगातील एकमेव असे मंदिर आहे, जिथे बाळ हनुमान आई अंजनीच्या मांडीवर विराजमान आहेत. याच भागात माता अंजनी राहत असल्याचे दाखले असल्यामुळे येथील स्थानिक स्वतःला भगवान हनुमानाचे वंशज मानतात. हा संपूर्ण परिसर निसर्गाने नटलेला आहे. घनदाट जंगले, टेकड्या आणि मयूरक्षी नदीच्या सभोवतालची वृक्षराजी यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. अंजन धामला “अंजनय” असेही म्हटले जाते. अंजन धाममधील गुहा आजही रहस्यमय मानल्या जातात. एवढ्या वर्षांनंतरही या गुहांमधील गूढ उलगडण्यात अपयश आले आहे. शिव गुहेजवळ हनुमानाचे मंदिर आहे. मात्र बाजूच्या अनेक गुहा बंद असून त्यामध्ये रामायण काळातील रहस्य दडले असल्याची मान्यता आहे. ( Anjan Dham Gumla District )

=======

हे देखील वाचा : Shimga : कोकणचो शिमगो…कोकणातील पालखी परंपरा

=======

असे सांगितले जाते की माता अंजनी येथे यज्ञ आणि पूजा करत असत. त्या शिवभक्त होत्या आणि रोज एका शिवलिंगाची पूजा करत असत. त्यामुळे येथे ३६५ शिवलिंग, ३६५ तलाव आणि ३६५ महुआ वृक्ष होते, असेही सांगितले जाते. कालांतराने ही शिवलिंगे लुप्त झाली आणि तलाव भरून टाकण्यात आले. मात्र अंजन धाममध्ये आजही काही प्राचीन परंपरा पाळल्या जातात. अलिकडच्या वर्षांत या मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येथे सोयी-सुविधाही वाढवण्यात आल्या आहेत. या हनुमान मंदिरात पोहोचण्यासाठी तीन मार्ग आहेत, त्यापैकी एक मार्ग पक्क्या पायऱ्यांचा आहे. मंदिर संकुलात अंजनी माता, हनुमान, राधा-कृष्ण, राम-लक्ष्मण-सीता आणि भगवान शंकर यांच्या मूर्ती आहेत. याच भागात माता अंजनी यांच्या नित्य पूजनातील ३६५ शिवलिंग होती, मात्र आता त्यांचे अवशेष पाहायला मिळतात. त्यांच्या जागी चक्रधारी मंदिरात दोन ओळींमध्ये आठ शिवलिंगे स्थापित करण्यात आली आहेत. मंदिराच्या खाली एक सर्प गुहा देखील आहे. येथे अनेक वेळा साप दिसत असत. ही गुहा सुमारे १,५०० फूटांपेक्षा अधिक लांब असून तिचा एक मार्ग कुठे जातो, याचा अद्याप शोध लागलेला नाही. अंजन धाममध्ये रामनवमीपासून उत्सव सुरू होतो आणि तो हनुमान जन्मोत्सवापर्यंत साजरा केला जातो. या निमित्ताने येथे जागरण आणि अखंड रामनाम जप केला जातो. या काळात झारखंडसह इतर राज्यांतील हनुमान भक्त दर्शनासाठी येथे येतात. सध्या मंदिर परिसरात याच उत्सवाची तयारी सुरू आहे. ( Anjan Dham Gumla District )

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.