अनिल कपूरच्या नायक पिक्चरमधील एक फेमस सीन आहे. अमरीश पुरी जे मुख्यमंत्री असतात, अनिल कपूरला एक मुलाखत (Interview) द्यायला येतात. मुलाखतींच्या ठरलेल्या साच्यात ही देखील मुलाखत होईल या अपेक्षेने अमरीश पुरी मुलाखतीला बसतात आणि भलतंच काहीतरी घडत. अनिल कपूर अगदी रोखठोक प्रश्न विचारून, घडलेल्या घटनांचे पुरावे देऊन अमरीश पुरींना अडचणीत आणून ठेवतात.
एखाद्या मुलाखतीत (Interview) विचारल्या गेलेल्या प्रश्नांमुळे अडचणीत येण्याचा प्रसंग हा काही फक्त चित्रपटांमध्येच घडतो अस नाही. देशातील एका मोठ्या राजकीय नेत्याला असे बेधडक प्रश्न विचारून एका पत्रकाराने एवढे अडचणीत आणले होते की, ते नेते अवघ्या तीन मिनिटांमध्ये मुलाखत (Interview) सोडून निघून गेले आणि त्यानंतर ही मुलाखत कित्येक दिवस चर्चेचा विषय राहिली होती. ही मुलाखत घेणारे पत्रकार होते करन थापर आणि मुलाखत देणारे नेते होते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी !
गुजरातच्या विधानसभा निवडणुका दोन आठवड्यांवर येऊन ठेपल्या होत्या. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा पहिला कार्यकाळ नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केला होता आणि सलग दुसऱ्यांदा या पदावर विराजमान होण्याची त्यांची तयारी चालू होती. भारतीय जनता पक्षाचा जोरदार प्रचार चालू होता. मोदींच्या पहिल्या कार्यकाळात झालेल्या २००२ च्या दंगली हे मोदी सरकारला लागलेलं गालबोट होत. त्याला पुसायचा प्रयत्न प्रचारादरम्यान सुरु होता. त्यादरम्यानच करन थापर यांच्यासोबतची ही मुलाखत घडून येणार होती. मुलाखत ठरली. ती घेण्यासाठी करन थापर अहमदाबादला गेले. मुख्यमंत्री मोदींनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले आणि मुलाखतीच्या वेळी अगोदरच बोलावून घेऊन गप्पादेखील मारल्या. मुलाखत (Interview) सुरु झाली आणि थापर यांनी मोदींना पहिला प्रश्न विचारला.
“ मोदीजी, तुमच्यापासूनच बोलायला सुरुवात करुया. मुख्यमंत्रीपदाच्या तुमच्या कार्यकाळात गुजरात हे सर्वाधिक सुरळीत चालवलं गेलेले राज्य आहे. या शब्दात ‘राजीव गांधी फाउंडेशन’ने तुमच्या सरकारचं कौतुक केलं. सर्वाधिक प्रभावी मुख्यमंत्री म्हणून ‘इंडिया टुडे’ने तुमचा उल्लेख केलेला आहे आणि एवढं असून देखील लोक तुम्हाला हत्यारा म्हणून संबोधतात, तुम्ही मुस्लिमविरोधी असल्याचा दावा करतात. याबद्दल काय…”
मोदींनी यावर उत्तर दिलं
“ मला वाटत, लोकं असा विचार करतात, असं म्हणण योग्य नाही. दोन तीन लोकच असं काही बोलत आलेले आहेत आणि देव त्याचं भल करो”
“तुम्ही म्हणताय हा दोन तीन लोकांचाच हा कट आहे” करन थापर.
“मी असं म्हणालो नाही” नरेंद्र मोदी.
“परंतु तुम्हीच म्हणताय हा दोन तीन लोकांचा कट आहे” करन थापर.
“अशी माहिती आहे माझ्याकडे, जनतेची अशी धारणा नाही” नरेंद्र मोदी
“सप्टेंबर २००३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारवरील विश्वास गमावला आहे, अशी टिप्पणी केली. तर एप्रिल २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी असे मत मांडले होते की, तुम्ही आधुनिक निरो आहात ज्यांनी बायकामुले अक्षरशः जळत असतांना त्याकडे पाठ फिरवली. सर्वोच्च न्यायालयाला तुमच्यासोबत बरीच समस्या आहे असं वाटतं” करन थापर.
“करन, माझी छोटीसी विनंती आहे. सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट जाऊन बघ त्यात काही लिखीत आहे का ? मला जाणून घ्यायला आवडेल.” नरेंद्र मोदी
“तुमचं अगदी बरोबर आहे. लिखित असं काही नाही पण न्यायालयाचे तसे निरीक्षण आहे” करन थापर.
“जर जजमेंट मध्ये तसं काही असलं असत, तर मला उत्तर द्यायला आनंद झाला असता.” नरेंद्र मोदी
“मग न्यायाधीशांनी न्यायालायात जे मत नोंदवलं त्याला काहीच महत्व नाही का” करन थापर
“माझी तुम्हाला एक साधी विनंती आहे. न्यायालयाच्या जजमेंटमधील तुम्ही म्हणताय ते वाक्य शोधून आणा. त्याबद्दल देशातील लोकांना पण कळू द्या. मला आनंदच होईल.” नरेंद्र मोदी
“ही न्यायाधीशांची फक्त टिप्पणी नव्हती. ऑगस्ट २००४ मध्ये न्यायालयाने ४६०० पैकी २१०० केसेस परत ओपन केल्या आहेत,जवळपास चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त कारण न्यायालयाला असं वाटत की, तुमच्या सरकारच्या नेतृत्वात राज्यात न्याय झाला नाही.” करन थापर
“न्यायालयाच्या या निर्णयावर मला आनंद आहे. शेवटी न्यायालयच निर्णय घेईल.” नरेंद्र मोदी
“मी सांगतो समस्या काय आहे ते. गुजरात दंगलीच्या पाच वर्षानंतरदेखील त्या हत्याकांडाचं भूत तुमच्या मानगुटीवरून उतरलेलं नाही. त्याला कमी करण्यासाठी तुम्ही काहीच का करत नाहीत ?” करन थापर
“ते काम मी करन थापर यांच्यासारख्या माध्यम प्रतिनिधींवर सोडून दिलेले आहे. त्यांना त्यांचा आनंद घेऊ द्या.” नरेंद्र मोदी
“मी काही सुचवू का ?” करन थापर
“मला काहीच समस्या नाही.” नरेंद्र मोदी
“तुम्ही का मान्य करत नाही की, जो हत्याकांड झाला त्याचं तुम्हाला दुःख आहे. सरकार मुस्लीमांच्या संरक्षणासाठी अजून काहीतरी करू शकली असती.” करन थापर
“त्या वेळेला जे काही बोलायचं होतं ते मी बोललो आहे. तुम्ही ते पाहू शकता.” नरेंद्र मोदी
“पुन्हा सांगा” करन थापर
“जे तुम्हाला ऐकायचं आहे त्याबद्दल २००७ मध्ये परत बोलावं हे काही गरजेचं नाही.” नरेंद्र मोदी
“पण हे परत न सांगून तुम्ही तुमच्याच प्रतिमेला धक्का पोहोचवत आहात. ते बदलण तुमच्याच हातात आहे.” करन थापर
=======
हे देखील वाचा : नेदरलँन्डमध्ये मुलांच्या इच्छामरणासाठी तयार केलाय कायदा
========
गुजरात दंगलीच्या अवतीभोवती फिरणाऱ्या प्रश्नांनीच मुलाखतीची सुरुवात झाल्याने मोदींना उत्तरे द्यायला थोडीशी अस्वस्थता जाणवू लागली. त्यांनी पाणी हवंय म्हणून सांगितलं तेव्हा थापर यांनी बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासाकडे इशारा केला. मोदींनी पाण्याचा ग्लास घेतला आणि माईक काढायला सुरुवात केली. ‘दोस्ती बनी रहे’ म्हणत ते मुलाखत अर्धवट सोडून निघून जाऊ लागले. थापर यांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला. मुलाखत (Interview) पूर्ण करावी म्हणून विनंती केली. मोदी मात्र मुलाखतीला पुन्हा आलेच नाहीत. त्यांच्या मुलाखत अर्धवट सोडण्याच्या या कृतीचा विरोधी पक्षांनी प्रचारात खूप फायदा घेतला. तेव्हा त्यांची तीन मिनिटांची ती मुलाखत चर्चेचा विषय ठरली होती.