Home » भारत-न्यूझीलंड मालिका २०२१- भारताने काय कमावले व काय गमावले?

भारत-न्यूझीलंड मालिका २०२१- भारताने काय कमावले व काय गमावले?

by Team Gajawaja
0 comment
भारत-न्यूझीलंड मालिका २०२१
Share

भारत-न्यूझीलंड मालिका २०२१

नुकतीच मायदेशातील भारताने भारत-न्यूझीलंड मालिका २०२१ ही दोन कसोटी सामन्यांची मालिका १-० अशा फरकानं जिंकली. या विजयाबरोबरच भारताने मायदेशात २०१२ नंतर सलग १४ मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. याबद्दल भारतीय संघाचे सर्वप्रथम अभिनंदन. काही महत्वाचे खेळाडू खेळत नसताना संघाने मिळवलेले यश विशेष उल्लेखनीय आहे. कानपूरच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा शेवटचा गडी बाद करण्यात यश मिळाले असते तर भारत ही मालिका २-० अशा फरकाने जिंकू शकला असता. या मालिकेत भारताने काय कमावले व काय गमावले याचा लेखाजोखा घेणे आवश्यक ठरते.

भारताची मुख्य कमाई म्हणजे श्रेयस अय्यरचे कसोटी क्रिकेटमध्ये झालेले ‘शतकी’ पदार्पण. आपल्या पहिल्याच कसोटीत शतक ठोकणारा तो भारताचा १६ वा फलंदाज ठरला. विशेष म्हणजे तो फलंदाजीला आला तेव्हा भारताची अवस्था ३ बाद ८० अशी झाली होती. त्यानंतर रवींद्र जडेजाबरोबर शतकी भागीदारी  करून त्याने भारताचा डाव सावरला. त्याने दडपण न घेता त्याचा नैसर्गिक खेळ केला. दुसऱ्या डावात ५ बाद ५१ अशी अवस्था झाली असताना त्याने अश्विन व वृद्धिमान सहा बरोबर उपयुक्त भागीदाऱ्या करताना वैयक्तिक ६५  धावा काढल्या. पदार्पणात एक शतक व एक अर्धशतक झळकावणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. मला त्याची दुसऱ्या डावातील फलंदाजी अधिक परिपक्व वाटली. पहिल्या डावात त्याने थोडे धोके पत्करले व काही वेळा त्याची एकाग्रता भंग पावल्यासारखी वाटली.

Shreyas Iyer "In Good Mind Space" After Injury, Ready To Convert Delhi  Capital's IPL Dream Into Reality | Cricket News

दुसरी कमाई म्हणजे सलामीवीर मयांक अगरवालने भारतीय संघात केलेले पुनरागमन. मुंबईत त्याने पहिल्या डावात १५० व दुसऱ्या डावात ६२ धावा काढून आपली दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघातील जागा पक्की केली. या दोन्ही खेळी त्याने आव्हानात्मक खेळपट्टीवर केल्या हे विशेष.

तिसरी कमाई म्हणजे वृद्धिमान साहाचे यष्टिरक्षण व फलंदाजी. ऋषभ पंतच्या स्पर्धेत काहीशा मागे पडलेल्या सहाने कानपूरला मोक्याच्या वेळी अर्धशतक झळकावून आपला दावा ठोसपणे पेश केला. लक्ष्मणच्या मते वृद्धिमान आज क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम यष्टीरक्षक आहेच. अक्षर पटेलने आपली फलंदाजीतील उपयुक्तता सुद्धा सिद्ध करून आपण रवींद्र जडेजाला पर्याय ठरू शकतो हे दाखवून दिले.

गोलंदाजांमध्ये भारतातील संथ व फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर अश्विन सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला हे अपेक्षितच होते. त्याला कानपूरमध्ये अक्षर पटेलने तर मुंबईला चौथ्या दिवशी ऑफ स्पिनर जयंत यादवने चांगली साथ दिली.रवींद्र जडेजा नेहमीप्रमाणे कानपूरला शेवटच्या दिवशी घातक ठरला. मात्र माझ्या मते सर्वात लक्षवेधी कामगिरी केली ती मुंबई कसोटीत, न्यूझीलंडच्या पहिल्या डावात, मोहम्मद सिराजने.त्याने फक्त पाच षटके टाकली, पण त्यात  ३ विकेट्स काढताना त्याने ज्या वेगात गोलंदाजी केली ती कौतुकास्पद होती.त्याने रॉस टेलरचा त्रिफळा उडवताना जो ऑफ कटर टाकला तो लाजवाब होता.

IND vs NZ- Prediction, Who Will Win The Match Between New Zealand And  India? New Zealand Tour of India 2021, 1st Test

भारताच्या उणिवांची चर्चा करायची तर पुजारा व राहणे यांचे अपयश उठून दिसले. पुजारा आखूड टप्प्याचे चेंडू खेळू शकत नाही याचा पुरेपूर फायदा न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी उठवला, तर राहणेचे सदोष तंत्र पुन्हा उघडे पडले. आफ्रिकेच्या दौऱ्यात जर हे दोघे पुन्हा अपयशी ठरले, तर त्यांच्या कसोटी कारकिर्दीची अखेर निश्चित आहे. विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म फारसा चांगला नाही.

गोलंदाजीमध्ये इशांत शर्मा प्रभावहीन ठरला.तसेच त्याच्या हालचाली सुद्धा मंद झाल्या असल्याने त्याचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते.भारतीय क्षेत्ररक्षण अजून चपळ होणे आवश्यक होते. न्यूझीलंडच्या एजाज पटेलने मुंबईला पहिल्या डावात भारताच्या दहाही विकेट्स घेऊन इंग्लंडच्या जिम लेकर व भारताच्या अनिल कुंबळेच्या पंक्तीत स्थान मिळवले.न्यूझीलंडच्या सुमरविलेने निराशा केली. न्यूझीलंडने जर निल वॅग्नर या तेज गोलंदाजाला सुमेरविलेऐवजी खेळवले असते, तर अधिक बरे झाले असते. त्याचे बॉऊन्सर्स व आऊटस्विंगर्स खेळणे भारताला जड गेले असते.

हे ही वाचा: रवींद्र जडेजा एक शांत योद्धा!

न्यूझीलंडची फलंदाजी दोन्ही कसोटीत मोक्याच्या वेळी ढेपाळली.मुंबईत तर पहिल्या डावात केवळ ६२ धावात त्यांचा खुर्दा उडाला. रॉस टेलर पूर्णपणे अपयशी ठरल्याने त्यांची मधली फळी कोसळली. मालिका  दोनच सामन्यांची असल्याने दोन्ही संघाच्या खेळाडूंना पुरेशी संधी मिळाली नाही त्यामुळे एकदम कुठला निष्कर्ष काढणे धाडसाचे ठरेल, पण कसोटी चॅम्पिअनशिप स्पर्धेत भारताची सुरुवात चांगली झाली ही समाधानाची गोष्ट. भारताला आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी शुभेच्छा.

– रघुनंदन भागवत

(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.