आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आढळून आल्याने मोठा वाद निर्माण झाला. राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी प्रसादाच्या लाडूंमध्ये भेसळ असल्याचा दावा केला. त्यानंतर संपूर्ण जगभरातील हिंदू भाविकांनी या प्रसादातील भेसळीबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तिरुपतीबालाजी येथील या प्रसादाच्या लाडूमधील भेसळीमुळे देशभरातील अन्य मंदिरातील प्रसादाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. भारतात अलिकडे धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लाखे भाविक आपल्या अराध्या देवतांच्या मंदिराला भेट देतात. या मंदिरातून मिळणारा प्रसाद भक्तीभावानं घेऊन आपल्या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला देतात. मात्र याच प्रसादाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला. (Kashi Vishwanath Prasad)
यावर काशी येथील बाबा विश्वनाथ मंदिर प्रशासनानं उचलेलं पाऊल प्रशंसनीय आहे. आता काशी विश्वनाथ मंदिरात भाविकांना जो प्रसाद देण्यात येणार आहे, तो प्रसाद हिंदू धर्मग्रंथातील माहितीच्या आधारातून तयार करण्यात येणार आहे. तसेच यासाठी अमूल कंपनीनंही पुढाकार घेतला आहे. लवकरच काशी येथील बाबा विश्वनाथाच्या मंदिर परिसरात अमूल कंपनीनं बनवलेल्या शास्त्रशुद्ध प्रसादाचे वितरण सुरु होणार आहे. या सर्वांत प्रसादाची शुद्धता, गुणवत्ता आणि स्वच्छता याला सर्वोच्च स्थान देण्यात येणार आहे. मंदिरात मिळणार प्रसाद हा भाविकांच्या श्रद्धेचा विषय असतो. मात्र तिरुपती बालाजी येथील लाडववांच्या प्रसादातील भेसळ पुढे आल्यानंतर भारतातील सर्वच मंदिरांमधील प्रसादाबाबत अधिक काळजी घेण्यात येऊ लागली आहे. (Social News)
वाराणसी येथील प्रसिद्ध श्री काशी विश्वनाथ मंदिरातील प्रसादामध्येही बदल करण्यात आले आहेत. आता तांदळाच्या पिठ आणि बेलपत्र यापासून बाबा विश्वनाथाचा प्रसाद तयार करण्यात येणार आहे. हा प्रसाद बाबा विश्वनाथ मंदिराच्या आवारातच मंदिर संस्थानातर्फे तयार होत आहे. या प्रसादाची विक्री मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या स्टॉलवरच सुरु आहे. तांदळाचे पीठ, साखर आणि बेलपत्राच्या पावडरपासून हा प्रसाद तयार करण्याबाबत गेले काही दिवस अध्ययन करण्यात येत होते. त्यासाठी धार्मिक ग्रंथात दिलेल्या प्रमाणाचाही अभ्यास करण्यात आला. बाबा विश्वनाथ मंदिरातर्फे यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली होती. हा प्रसाद पूर्णपणे तयार झाल्यावर याच प्रमाणाला मंजूरी देण्यात आली. असा हा प्रसाद आता विजयादशमीपासून वितरीत करण्यास सुरुवात झाली आहे. (Kashi Vishwanath Prasad)
या प्रसादात महत्त्वाचे म्हणजे बाबा विश्वनाथांना जे बेलपत्र अर्पण केले जाते त्याचेच चूर्ण करून वापरण्यात येत आहे. बेलपत्राचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. भाविकांना या औषधी गुणांचाही लाभ होणार असल्याचे प्रशासनानं स्पष्ट केले आहे. हा प्रसाद जिथे तयार होत आहे, त्या जागेची स्वच्छता ही जिल्हाप्रशासन केव्हाही तपासणार आहे. हा प्रसाद आता वितरीत होत असला तरी त्यासाठी गेल्या काही महिन्यापासून परिक्षणे सुरु आहेत. हा विशेष प्रसाद तयार करण्यासाठी चार ते पाच महिने अनेक ग्रंथ आणि पुराणांचा अभ्यास करण्यात आला. भगवान शंकराला काय प्रसाद दिला जातो या सर्व विषयांवर विशेष संशोधन करून प्रसादाची रेसिपी तयार करण्यात आली आहे.
हा प्रसाद येत्या काळात अमूल कंपनीतर्फे करण्यात येणार आहे. मात्र या प्रसादात वापर होणारे जिन्नस तेच रहाणार असून त्यातील प्रमाणही धार्मिक ग्रंथात सांगितले आहे, तेच रहाणार आहे. (Social News)
======
हे देखील वाचा : प्रसाद व्यवस्थेसाठी काशी विद्वत परिषदेचा पुढाकार
======
प्रसादाची गुणवत्ता आणि शुद्धता याबाबत अमूलला विनंती करण्यात आली होती, ती अमूलने स्वीकारली आहे. प्रसादात तांदळाचे पीठ, देशी तूप आणि इतर काही खास जिन्नसांचा वापर करण्यात येणार आहे. प्रसादाचे पवित्र्य अबाधित रहाण्यासाठी तो तयार करणा-या सर्व कर्मचा-यांना धार्मिक विधी करुनच प्रसादकक्षात प्रवेश दिला जाणार आहे. सध्या जो प्रसाद तयार करण्यात आहे, त्याचे प्रमाण कमी आहे. मात्र पुढच्या वर्षात प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होत आहे. त्यावेळी लाखो भाविक काशी विश्वनाथाच्या दर्शनाला येणार आहेत. अशावेळी प्रसादही तेवढ्या प्रमाणात लागणार आहे. त्यामुळेच ही जबाबदारी अमूल सारख्या प्रख्यात कंपनीकडे देण्यात आली आहे. (Kashi Vishwanath Prasad)
सई बने