नुकतीच पुण्यात भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील, तर ते शरद पवार आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून पवारांनीही शाह यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे. यावरून तडीपार हा शब्दच राजकारणात रिपीट केला जात आहे. पण अमित शाह यांना सुप्रीम कोर्टाने खरंच तडीपार केलं होतं का ? आणि जर केलंच होतं तर त्याचं कारण काय होतं ? (Amit Shah vs Sharad Pawar)
गृहमंत्री अमित शाह यांचं तडीपार होण्याचं प्रमुख कारण म्हणजे २०१० ची सोहराबुद्दीन शेख फेक एन्काऊंटर केस गुजरात पोलिसांनी २००५ साली गँगस्टर सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसर बी यांची एका फेक एन्काऊंटरमध्ये हत्या केली होती. खंडणी प्रकरणी सोहराबुद्दीनचा एन्काऊंटर करण्यात आला, असं पोलिसांचं म्हणणं होतं. सध्या देशाचे गृहमंत्री असणारे अमित शाह हे तेव्हा गुजरातचे गृहमंत्री होते. या एन्काऊंटरच्या एका वर्षानंतर सोहराबुद्दीनचा पार्टनर तुलसीराम प्रजापती याचाही एन्काऊंटर करण्यात आला आणि तो सुद्धा फेक एन्काऊंटर असल्याचं बोललं जातं. या सर्व हत्या गुजरात एटीएसने राजकीय दबावात केल्याचा आरोप होता. याप्रकरणी गुजरातचे अनेक मोठमोठे पोलीस ऑफिसर २००७ पासून आजपर्यंत जेलमध्ये आहेत. (Amit Shah vs Sharad Pawar)
२०१० साली सीबीआयने एक चार्जशीट तयार केली. यामध्ये अमित शाह यांच्यावर आरोप लावण्यात आला होता की, तेसुद्धा गँगस्टर सोहराबुद्दीन शेखसोबत या खंडणीच्या रॅकेटमध्ये सामील होते. सीबीआयच्या तपासात गुजरात सीआयडीचे पोलीस इन्स्पेक्टर व्ही. एल. सोलंकी यांनी अमित शाह यांचं नाव घेतलं होतं. याप्रकरणी सीबीआयने अमित शाह यांच्यावर बोट ठेवत तीन हत्यांच्या प्रकरणांमध्येही ते Accused आहेत, असं सांगितलं. यानंतर गृहमंत्री असतानाच सीबीआयने अमित शाह यांना अटक केली. त्यानंतर तीन महिने ते जेलमध्येच होते.
यानंतर सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळवून त्यांनी स्वतःची सुटका केली. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना गुजरात राज्यातून तडीपार करण्यात आलं आणि काही काळ गुजरातमध्ये प्रवेश करायचा नाही, अशी स्पष्ट ताकीद दिली. २०१० ते २०१२ या दोन वर्षात ते गुजरातमधून बाहेर होते. यादरम्यान शाह मुंबई आणि दिल्लीमध्ये राहत होते, असं म्हणतात. याच प्रकरणामुळे विरोधक शाह यांचा उल्लेख करताना अनेकदा विरोधक ते तडीपार असल्याचं सांगत असतात. पण गृहमंत्री अमित शाह यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. (Amit Shah vs Sharad Pawar)
=================
हे देखील वाचा: अजित पवारांवर एवढी नामुष्की का ओढवली?
==================
याव्यतिरिक्त जस्टीस लोया केस, इशरत जहा एन्काऊंटर केस अशा सर्व केसेसमध्ये अमित शाह यांनाच धारेवर धरलं गेलं. पण हे सर्व आरोप चुकीचे असल्याचं शाह यांनी नेहमी म्हटलं आहे. जस्टीस लोया हे सोहराबुद्दीन एन्काऊंटर केस हँडल करत होते आणि २०१४ साली त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातील सर्व २२ आरोपींची सीबीआयच्या विशेष कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. अमित शाह यांनाही क्लिन चिट मिळाली. सर्व २१० साक्षीदार फितूर झाले असून या खटल्यात कोणत्याही आरोपीविरुद्ध समाधानकारक पुरावे नाहीत, असं नमूद करत कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
असं होतं अमित शाह यांच्या तडीपार असण्याचं प्रकरण ! याच प्रकरणामुळे शरद पवार यांच्यापासून इतर अनेक विरोधक अमित शाह यांच्याबाबत तडीपारीचा पाढा वाचत असतात. पण काळवेळ अशा रीतीने बदलली आहे की, आज अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. आज देशातील सर्व तपास यंत्रणा आणि संरक्षण खाती त्यांच्याच हाताखाली आहेत. (Amit Shah vs Sharad Pawar)