भारतात 1 दिवसात 640 दशलक्ष मतांची मोजणी झाली.
कॅलिफोर्निया अजूनही मतांची मोजणी करत आहे
— एलोन मस्क – 4 नोव्हेंबर 2024
टेस्ला आणि एक्स या सोशल प्लॅटफॉर्मचे मालक असलेल्या एलोन मस्क यांच्या या ट्विटनं जगभर धुमाकूळ घातला आहे. तमाम भारतीयांना अभिमान वाटत असलेल्या या ट्विटनं आधुनिक अमेरिकेची वास्तविकता जगासमोर आणली आहे. जगात सर्वात शक्तीशाली आणि आधुनिक देश अशी वल्गना करणा-या अमेरिकेला भारतातील तंत्रज्ञानानं पुन्हा एकदा पराभूत केल्याचा हा पुरावा असल्याचे मत आता व्यक्त होत आहे. एलोन मस्क यांनी हे ट्विट केले आहे, त्यावेळी अमेरिकेच्या निवडणुकीला 18 दिवस होऊन गेले आहेत. शिवाय डोनाल्ड् ट्रम्प यांची अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडही झाली आहे. मात्र तेथील कॉलिफोर्निया राज्यातील मतांची मोजणी अद्यापही झालेली नाही. ही मतमोजणी करण्यासाठी अजून काही दिवसांचा कालावधी लागणार आहे. प्रगत अमेरिकेमध्ये अशा गतीनं मतमोजणी सुरु होत असतांना भारतामध्ये मात्र एका दिवसात 64 कोटी मतांची मतमोजणी होऊन निकालही जाहीर झाले आहेत, याचे मस्क यांनी जाहीरपणे कौतुक केले आहे. (India VS America)
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या सरकारमध्ये महत्त्वाचा भाग असणारे एलॉन मस्क यांनी भारताच्या निवडणूक पद्धतीचे जाहीरपणे कौतुक केले आहे. भारताने एका दिवसात 64 कोटी मतांची मोजणी करून निवडणुकीचा निकाल जाहीर केला, हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले आहे. योसोबत अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये 5 नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरूच आहे. दुसरीकडे भारतानं महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभांसह अन्य राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणीही केली, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारताकडून ही पद्धती अमेरिकेनं शिकण्यासारखी असल्याची टिपही मस्क यांनी दिली आहे. महाराष्ट्रात आलेल्या निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएम अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला आहे. (International News)
निवडणुकीत पराभूत झालेल्या पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणुका जिंकल्याचा आरोप केला. असे असतांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणा-या एलॉन मस्क यांनी मात्र भारतीय निवडणूक व्यवस्थेचे कौतुक केले. यासोबत मस्क यांनी अमेरिकन निवडणूक प्रक्रिया किती सदोष आहे, हेही स्पष्ट केलं आहे. अमेरिकेत निवडणुका होऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र आत्ताही कॅलिफोर्निया राज्यातील मतमोजणी सुरु आहे. ही निराशाजनक बातमी आहे. अशी बातमी देतांनाही मला दुःख होत असल्याचे मस्क यांनी सांगितले आहे. मस्क यांनी आपल्या प्रतिक्रियामध्ये भारतातील निवडणूक प्रक्रिया प्रगत असल्याचे सांगितले आहे. भारताची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक असून त्याची कार्यवाही आणि संपूर्ण प्रक्रिया ही एका चमत्कारासारखी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जिथे काही कोटी मतांची मोजणी एका दिवसात होऊन निकाल जाहीर होतात, पण अमेरिकेत अद्याप तीन लाखांहून अधिक मतपत्रिकांची मोजणी व्हायची आहे, हे सांगून मस्क यांनी खेद व्यक्त केला आहे. वास्तविक अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाले आहेत. मात्र त्यांच्या विजयात अजूनही कॅलिफोर्नियामधील मतांचा समावेश नाही. (India VS America)
=====
हे देखील वाचा : भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये पुरुषांना प्रवेश नाही
========
कॅलिफोर्नियामध्ये 39 दशलक्ष रहिवासी आहेत आणि त्यापैकी 16 दशलक्ष लोकांनी मतदान केले. यापैकी मेलद्वारेही मोठ्या संख्येने लोकांनी मतदान केले. त्यामुळे कॅलिफोर्नियामध्ये अजूनही मतमोजणी सुरू आहे. 2020 च्या निवडणुकीतही कॅलिफोर्नियामधील मतांची मोजणी करण्यासाठी अनेक आठवडे लागले होते. अमेरिकेत, बहुतेक मतदान कागदी मतपत्रिकेद्वारे किंवा ईमेल मतपत्रिकेद्वारे केले जाते. 2024 च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानासाठी मशीन्सचा वापर फक्त 5% परिसरात करण्यात आला होता. त्यातही कॅलिफोर्नियासारख्या राज्यात या मशीनचा वापर करण्यात आलेला नाही. अमेरिकेत दर निवडणुकीत मतमोजणी अशीच काही आठवड्यांसाठी चालते. आपल्याला आठवत असेल की, कोरोना काळात जे लसीकरण झाले होते, तेव्हाही भारतानं आधुनिक पद्धतीनं ही नोंद केली होती, आणि लसधारकांना कार्ड देण्यात आली होती. मात्र अमेरिकेत एका कागदाच्या तुकड्यावर लस दिल्याचे लिहून देण्यात आले होते, याबाबतचे व्हिडिओही तेव्हा बरेच व्हायरल झाले होते. एकूणच अमेरिका म्हणजे, स्वर्ग अशी ज्यांची धारणा आहे, त्यांच्यासाठी मस्कचे हे ट्विट महत्त्वाचे आहे. (International News)
सई बने