Home » Middle East War : अमेरिका-इराण संघर्ष, अमेरिकेचा सेल्फ गोल ?

Middle East War : अमेरिका-इराण संघर्ष, अमेरिकेचा सेल्फ गोल ?

by Team Gajawaja
0 comment
Share

२८ फेब्रुवारी २०२६ हा दिवस जगाच्या इतिहासात एक ‘लँडमार्क ‘ दिवस म्हणून नोंदवला जाईल. या दिवशी इराणवरील अमेरिका व इस्राएल यांच्या संयुक्त हल्ल्यात इराणचा सर्वोच्च धार्मिक नेते व शिया पंथीयांचे धर्मगुरू खामेनी व त्यांच्या ४० प्रशासकीय सहकाऱ्यांचा  मृत्यू झाला. त्यावेळी वाटलं होतं की इराण आता या धक्क्यातून सावरणार नाही. पण ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार इराणने, ‘मारता मारता मरे तो झुंजेन ‘ असा पण केलेला दिसतो. इराणने अमेरिकेच्या मध्य पूर्वे मधील लष्करी तळांना निशाणा बनवताना अमेरिकेला थारा देणाऱ्या अरब देशांना भाजून काढण्यास सुरुवात केली आहे. हजारो क्षेपणास्त्रे व ड्रोन विमानानी अमेरिकन तळांचे जबरदस्त नुकसान केले आहे. या हल्ल्यांचा साईड इफेक्ट म्हणजे दुबई, दोहा, रियाध आणि इतर मध्य पूर्वेतील महत्वाच्या शहरात होत असलेले infrastructure चे प्रचंड नुकसान. जगातील निम्म्याहून अधिक हवाई क्षेत्र यामुळे बाधित झाले असून विमानसेवा ठप्प झाली आहे.

अमेरिका,इस्रायल, इराण याशिवाय या युद्धात इतरही अनेक अरब देश ओढले गेल्याने आता ‘तिसरे महायुद्ध होणार का? असा प्रश्न अनेक लष्करी विश्लेषकांना तसेच सामान्य लोकांना पडला आहे. माझ्या मते, जरी अनेक देश यात ओढले गेले असले तरी तिसरे महायुद्ध वगैरे काही होणार नाही. युनोचे आजच्या घडीला अंदाजे १९५ सदस्य देश आहेत. त्यातील १७० देशांना युद्ध नको आहे. तसेच अनेक लष्करी तज्ज्ञ्यांच्या मते इराणची सध्याची लष्करी क्षमता ही १० ते १५ दिवसाच्या युद्धा्पुरती मर्यादित आहे. इराणच्या बाजूने अजून तरी कुठलाही देश उघडपणे युद्धात उतरलेला नाही. रशिया युक्रेनबरोबरच्या लढाईत गेली ४ वर्षें गुंतल्याने तो इराणला लॉजिस्टिक सहाय्य करेल पण प्रत्यक्ष युद्धात उडी घेणार नाही. चीन प्रेक्षकाच्या भूमिकेत राहणे पसंत करेल आणि अमेरिकेच्या होणाऱ्या नुकसानीत आपला फायदा कसा होईल ते बघेल. आधुनिक जगात प्रत्येक देशाचे आर्थिक हितसंबंध एकमेकात गुंतले असल्याने कोणालाच तिसरे महायुद्ध परवडणार नाही.भारत नेहमीप्रमाणे परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवेल. इराण हा जगभरातील दहशतवादाचा पोशिंदा आहे आणि त्याची झळ भारतालाही बसली आहे. त्यामुळे सिनो- अमेरिकन हल्ल्यामुळे दहशतवादाची नांगी परस्पर ठेचली जात असेल तर भारताने मौन बाळगणेच हितकारक ठरते.अफगाणिस्तान -पाकिस्तान यांचे समांतर युद्धही चालू आहे. अफगाणिस्तानसारख्या पाहुण्याच्या काठीने पाकिस्तानरुपी साप मरत असेल तर भारत कशाला मधे पडेल?सुंठेवाचून खोकला जात असेल तर भारताच्या दृष्टीने दुधात साखरच आहे.तरी सुद्धा भारतातील अस्तनीतील निखारे वेळीच विझवण्यासाठी भारताला सतत ‘हाय अलर्ट ‘ वर राहावे लागेल.

अमेरिका मात्र आपल्या अगोचरपणामुळे अडचणीत येईल असे वाटते. Tarif war मुळे अमेरिकेचे ‘नाटो ‘ मधील मित्र देश आधीच दुखावले गेले आहेत. हे देश अमेरिकेच्या बाजूने युद्धात उडी घेतील असे वाटत नाही. (रशिया व युक्रेन यांच्या लढाईतही कुठलाही ‘नाटो’ देश प्रत्यक्षरित्या सहभागी झालेला नाही.ते युद्ध द्विपक्षीयच राहिले आहे ).  इस्रायल हा अमेरिकेला मदत करण्यासाठी लढत नसून स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी/अस्तित्वासाठी लढत आहे. म्हणजेच अमेरिका ‘एकाकी ‘ पडला आहे.महत्वाची बाब म्हणजे अमेरिका हे युद्ध स्वतःच्या स्वार्थासाठी लढत आहे, जगाच्या कल्याणासाठी नव्हे. इराणची मिसाईल्स अमेरिकेपर्यंत पोहोचू नयेत म्हणून इराणची क्षेपणास्त्रे निर्मितीची क्षमता नष्ट करणे हा अमेरिकेचा सुप्त हेतू आहे. इराणने आपल्या क्षेपणास्त्रांचा पल्ला ३०० km पर्यंतच ठेवला तर अमेरिकेची काही हरकत नाहीये.सर्व जगाला अमेरिकेच्या स्वार्थाची जाणीव झालेली आहे. ट्रम्प महाशय मात्र आपल्याच निराळ्या दुनियेत वावरत आहेत. कुणी सांगावे ‘ अमेरिकेतच ट्रम्प विरुद्ध कशावरून उठाव होणार नाही कारण या युद्धाची सर्वाधिक झळ अमेरिकन नागरिकांना बसणार आहे. अमेरिकेने आत्तापर्यंत क्यूबा, व्हिएतनाम, इराक,अफगाणिस्तान या देशात जी ‘साहसे’ केली ती अमेरिकेच्याच अंगलट आली आहेत हा इतिहास आहे.

हे देखील वाचा 

Islamic Revolutionary Guard Corps: IRGC… इराणचे क्रूर सैन्य

समजा अमेरिकेला याही युद्धातून नामुश्किने माघार घ्यावी लागली तर जगातील त्यांची ‘दादागिरी ‘ संपुष्टात येईल का हा खरा कळीचा मुद्दा आहे. दुसऱ्या देशात ‘रेजिम चेंज ‘ करण्याचा आपला जन्मसिद्ध हक्क आहे या भ्रमातून अमेरिका बाहेर पडेल काय? पाकिस्तानमध्ये इम्रान खानला सत्ताभ्रष्ट करणे, वेनेझूएलाच्या अध्यक्षांना उचलून आणणे, बांगला देशात लोकशाहीने निवडून आलेले सरकार उलथवून टाकणे (तेही ‘सेंट मार्टिन’ हे बेट हसीना आपल्याला बहाल करीत नाहीत म्हणून), नेपाळ, श्रीलंका येथे अराजक निर्माण करणे, भारतात मोदी विरोधी शक्तींना खतपाणी घालणे, अशा कारवाया करायचा अधिकार अमेरिकेला कोणी दिला आहे? सध्या इराणवर जो हल्ला केला आहे तो सुद्धा ‘रेजिम चेंज’साठीच हे ट्रम्पने स्पष्ट केले आहे. जर इराणमध्ये ‘रेजिम चेंज’ न होता ‘अधिक’ कट्टर पंथीय सरकार कायम राहिले तर ते अमेरिकेच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होईल. इराणचे पुनरुज्जी्वित धर्मांध सत्ताधीश अमेरिकेला यापुढे सुखासुखी जगू देतील असे वाटते का? वरील सर्व प्रश्नामुळेच अमेरिकेची इराणवरील कारवाई तिच्यावरच ‘बूमरँग ‘ होऊन उलटेल अशी शक्यता असल्यानेच अमेरिकेचे इराणवरील आक्रमण तिच्यासाठी ‘सेल्फ गोल ‘ ठरेल अशी साधार भीती वाटण्यासारखी परिस्थिती आहे.

लेखक – रघुनंदन भागवत


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.