Home » अमेरिकेला फ्लर्टचा विळखा…

अमेरिकेला फ्लर्टचा विळखा…

by Team Gajawaja
0 comment
America Flirt Virus
Share

कोविड-१९ची महामारी ही या दशकातील सर्वात भयानक महामारी ठरली आहे. लाखो नागरिकांचा यात मृत्यू झाला. कोविड-१९ ही महामारी आली आणि जवळपास दोन वर्ष सर्व जगाला बांधून गेली. गेल्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड महामारी संपल्याचे जाहीर केले. मात्र त्यासोबत काही संशोधकांनी कोविड हा जगातून सहजासहजी जाणारा रोग नाही, हेही स्पष्ट केले होते. 

ठराविक वर्षांनी हा रोग नवनव्या रुपात येतच राहणार आहे. तो कधीही संपूर्णपणे जाणार नाही, तर त्याचे अधिक प्रगत प्रकार येत राहणार आहेत.  त्यासाठी उपाय म्हणजे, माणसानं आपल्यातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवली पाहिजे.  संशोधकांचे हे म्हणणे आता तंतोतंत खरे झाले आहे. कारण अमेरिकेमध्ये अशाच प्रगत कोविडची नोंद झाली आहे. (America Flirt Virus)

फक्त नोंदच झाली नसून अमेरिकेमध्ये हा नवा कोविड वेगानं आपले हातपाय पसरत आहे. यामुळे काही मृत्यूही झाले असून काही रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे. फक्त अमेरिका नाही तर इंग्लड आणि न्यूझिलंडमध्येही या नव्या कोविडचे रुग्ण सापडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यानं पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे.  

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे अमेरिकेमध्ये चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकाराचे नाव ‘FLiRT’ Omicron आहे.  हा फ्लर्ट नावाचा कोरोना Omicron याच विषाणूचा भाग आहे.  याच कोरोना विषाणूने जगभरातील करोडो नागरिकांना संक्रमित केले होते.  आता त्याचा हा नवा फ्लर्ट नावाचा प्रकार अमेरिकेच्या काही भागात वेगाने पसरत आहे. (America Flirt Virus)

अमेरिकेत या फ्लर्ट व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.  त्यामुळे आरोग्य तज्ञांसमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे. यावर संशोधन करणा-या संशोधकांच्या मते या विषाणूचा वेग आधीच्या सर्व विषाणूंपेक्षा अधिक आहे.  त्यामुळे अमेरिकेत त्याचा प्रचार वेगानं होईलच शिवाय जगावरही या विषाणूचे सावट पसरणार आहे.   

Omicron याच विषाणूचा प्रगत विषाणू असलेला फ्लर्ट अधिक संसर्गजन्य असल्याचे संशोधकांचे मत आहे.  अमेरिकेतील रुग्णांची पाहणी करणा-या समितीच्या मते,  १४ ते १७ एप्रिल दरम्यान नोंदवलेल्या कोरोना प्रकरणांपैकी सुमारे एक चतुर्थांश केस नव्या विषाणूच्या आहेत.  आरोग्य संघटनांच्या पाहणीनुसार अमेरिकेच्या ज्येष्ठ व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. त्यामुळे त्यांना नव्या कोरोना लाटेचा धोका आहे. २०२३ च्या हिवाळ्यातही हा फ्लर्ट अमेरिकेत पसरला होता. मात्र आत्ताही त्याचा प्रसार होत असल्यानं अनेकांनी ही धोक्याची घंटा वाटत आहे.  फक्त अमेरिकाच नाही तर युनायटेड किंगडम, दक्षिण कोरिया आणि न्यूझीलंडमध्ये फ्लर्टच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.  त्यामुळे ही नवीन कोरोनाची लाट तर नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. (America Flirt Virus)   

संशोधकांनी या फ्लर्टच्या लक्षणांचीही माहिती दिली आहे. फ्लर्टची लक्षणे पूर्वीच्या इतर कोविड-१९ प्रकारांपेक्षा फारशी वेगळी नाहीत. फ्लर्टची लागण झाली असतानाही, शरीर दुखणे, घसा खवखवणे, वास आणि चव कमी होणे आणि नाक वाहणे अशीच लक्षणे समोर आली आहेत. याव्यतिरिक्त, ताप, जुलाब, उलट्या, खोकला, श्वास लागणे आणि पचन समस्यांच्या देशील समावेश आहे.  यावर आता जपानमध्येही संशोधन सुरु झाले आहे.  यात चिंताजनक परिणाम समोर आले आहे.  फ्लर्टचा संसर्ग झाल्यास त्याचा प्रतिकार करण्यासाठी शरीराला अधिक रोगप्रतिकारकशक्ती लागत असल्याचे जपानी संशोधकांनी सांगितले आहे.  त्यामुळेच या फ्लर्टचा वृद्ध, लहान मुले,  आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांना धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.  

============

हे देखील वाचा : रंगीला पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत

============

या प्रकारानं भारतातही काळजी व्यक्त होत आहे.  भारतात एप्रिलपासून कोरोनाचे काही रुग्ण आढळले आहेत.  पण हे फ्लर्टचे होते का हे स्पष्ट झालेले नाही.  अमेरिकेसह लंडमध्येही याचे रुग्ण आढळले आहेत. सध्या सुट्टीचा हंगाम आहे.  त्यामुळे यातूनच जगभर फ्लर्टचा प्रसार होईल, असा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र यासाठी आधीचीच काळजी घेतल्यास त्याला रोखणे शक्य होईल, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.  त्यासाठीच सामाजिक अंतर, योग्य स्वच्छता, आणि आवश्यकतेनुसार मास्कचा वापर फायदेशीर ठरणार आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.