व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे पहाटे अनेक स्फोट झाले. एकापाठोपाठ एक अशा ७ स्फोटानंतर येथील लष्करी तळाजवळ वीज खंडित झाली. अमेरिका-व्हेनेझुएलातील वाढत्या तणावात अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करणार अशी अटकळ व्यक्त होत होती. ही अटकळ खरी ठरली असून अमेरिकेच्या लष्करी विमानांनी व्हेनेझुएलाच्या राजधानीवर हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारण हल्ला झाला तेव्हा कराकसमध्ये कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांचा आवाजही ऐकू आला. स्फोट ऐकू येताच, शहराच्या विविध भागात घाबरलेले लोक रस्त्यावर धावले. त्यानंतर आकाशात धुराचे लोट पसरले. यासर्वांबाबत अमेरिका किंवा व्हेनेझुएला सरकारकडून कोणताही अधिकृत दावा करण्यात आला नाही. मात्र गेल्या आठवड्यात व्हेनेझुएलानं अमेरिकेच्या पाच नागरिकांना ताब्यात घेतल्यावर कुठल्याही क्षणी अमेरिका व्हेनेझुएलावर हल्ला करणार अशी भीती व्यक्त होत होती, ती आता खरी ठरली आहे. या हल्ल्यानंतर व्हेनेझुएला आणि त्याचा मित्र देश रशिया काय पाऊल टाकणार याकडे आता जगाचे लक्ष आहे. हल्ल्यानंतर निकोलस मादुरो राष्ट्रपती राजवाड्यातून बाहेर पडले आहेत आणि व्हेनेझुएलामध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. ( America Vs Venezuela )

America Attacks Venezuela
व्हेनेझुएला आणि अमेरिकेतील तणाव शिगेला पोहोचला असतानाच व्हेनेझुएलाच्या राजधानीवर हल्ला झाला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अनेक तेल टँकर जप्त केले आहेत आणि लष्करी कारवाई सुरू केली आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे, अमेरिका प्रत्यक्ष व्हेनेझुएलावर हल्ला करणार अशी अनेक देशांना शंका होती, ती आता खरी ठरली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे मादुरो सरकार ड्रग्ज व्यापारात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. मादुरो यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. शिवाय जगातील सर्वात मोठे तेल साठे असलेल्या व्हेनेझुएलावर अमेरिकेला ताबा हवा आहे, यातून तेलाच्या साठ्यांवरील हक्कही अमेरिकेला हवा आहे. त्यामुळेच ट्रम्प प्रशासन मादुरो यांच्यावर सत्ता सोडण्यासाठी दबाव टाकत आहे. पण मादुरो यांनी त्याला नकार दिल्यामुळे आता ट्रम्प यांनी ड्रग्ज व्यापाराचा आरोप घेत पाश आवळायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यांपासून, ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातील ड्रग कार्टेल्सवर हल्ले सुरु कऱणार अशी धमकी दिली होती. त्यातूनच राजधनी कराकसवर हा हल्ला झाल्याची माहिती आहे.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार कराकस शहरावर कमी उंचीची विमाने फिरत असून त्यांचे मोठे आवाज ऐकू येत आहेत. या स्फोटांमुळे संपूर्ण कराकसमध्ये घबराट पसरली आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र या हल्ल्याचे जे व्हिडिओ सोशल मिडियावर दाखवण्यात येत आहेत, त्यातून हा हल्ला जोरदार असून यात मोठ्या प्रमाणात वित्त आणि मनुष्यहानी झाली असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व हल्ल्यासाठी गेल्या महिन्यात व्हेनेझुएलातील ड्रग्ज-लाँच बेसवर अमेरिकन लष्कराने केलेला हल्लाही कारणीभूत ठरला आहे. यात व्हेनेझुएलाने पाच अमेरिकन नागरिकांना अटक केली. त्यामुळे दुखवालेल्या अमेरिकेनं अशाप्रकारच्या मोठ्या हल्ल्याची धमकी दिली होती. ( America Vs Venezuela )
=======
हे देखील वाचा : Zohran Mamdani : अमेरिकेच्या कर्माचे फळ…. रामझी कासेम
=======
व्हेनेझुएलाच्या भोवती असलेल्या समुद्रात मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे आहेत. व्हेनेझुएलाचे हे साठे जगभरातील तेल साठ्यांमध्ये सर्वाधिक आहेत. त्यामुळेच या तेलावर अमेरिकन कंपन्यांची नजर आहे. अमेरिकेचा हा हेतू जाणून १९७६ मध्ये व्हेनेझुएलाचे तत्कालीन राष्ट्रपती कार्लोस आंद्रेस पेरेझ यांनी संपूर्ण तेल उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले. तेव्हापासून अमेरिका आणि व्हेनेझुएला हा संघर्ष सुरु झाला. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा आहे की व्हेनेझुएलाने अमेरिकन कंपन्यांकडून बेकायदेशीरपणे तेलाचे हक्क हिसकावले. म्हणजेच अमेरिकन कंपन्यांना आता हे तेल काढतांना अनेक अटींना सामोरे जावे लागत आहे. एक्सॉन, गल्फ ऑइल, मोबिल या अमेरिकन कंपन्या गेल्या अनेक दशकांपासून व्हेनेझुएलामध्ये तेलाचा व्यापार करीत आहेत. आता या कंपन्यांना हा सर्व कारभार व्हेनेझुएला सरकारी मालकीची कंपनी, पेट्रोलिओस डी व्हेनेझुएला यांच्यामार्फत करावा लागत आहे. त्यामुळे या अमेरिकन कंपन्या नाराज झाल्या असून व्हेनेझुएलाच्या तेल उद्योगाच्या विकासात आपण मोठी भूमिका बजावल्याचा त्यांचा दावा आहे. या सर्वात व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी अमेरिकेला कायम विरोध केला आहे. मादुरो आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मैत्री आहे. व्हेनेझुएलावर अमेरिकेनं हल्ला केला तर रशिया व्हेनेझुएलाच्या मदतीला येईल, असे आश्वासन त्यांना पुतिन यांनी दिले आहे. त्यामुळेच आता या युद्धाचे पुढचे पाऊल काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रशिया या युद्धात उतरली तर नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात जग आणखी एका विनाशक युद्धाकडे वळणार आहे. ( America Vs Venezuela )
सई बने
