Home » जपानमध्ये महिलांची संख्या वाढवण्यासाठी पैशांचे वाटप

जपानमध्ये महिलांची संख्या वाढवण्यासाठी पैशांचे वाटप

by Team Gajawaja
0 comment
Japan Population
Share

जपानमध्ये गेल्या काही वर्षापासून कमी होणा-या लोकसंख्येमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. याचे परिणाम जपानमधील नागरिकांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात होत आहेत. यातील एक मुख्य परिणाम म्हणजे, जपानच्या खेड्यातील कमी होणारी वस्ती. जपानच्या खेड्यातील महिलांचे प्रमाण हे हातावर मोजण्याइतपत कमी झाले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आता जपान सरकारनं महिलांना चक्क पैसे वाटप सुरु केले. ब-याचवेळा शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुली, नंतर शहर सोडून खेडेगावात जायला तयार होत नाहीत. जपानमध्येही तसेच झाले आहे. खेडेगाव सोडून आलेल्या या मुली आता शहरात राहू लागल्या आहेत. (Japan Population)

या मुलींनी किंवा शहरात कायमस्वरुपी रहाणा-या अन्य तरुणींनी खेडेगावत जाऊन रहावे, यासाठी जपान सरकारनं एक योजना जाहीर केली. त्यानुसार जपान सरकार अविवाहित तरुणींना लग्नासाठी मोठ्या प्रमाणात पैसे देणार होते. यात अट फक्त एकच की, या तरुणींनी ग्रामीण भागातील पुरुषांबरोबर लग्न करावे. यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि अन्य सुविधाही देण्यात येणार होत्या. मात्र ही योजना जाहीर झाल्यावर त्याच्यावर टिकाच अधिक झाली. जपानची ओस पडणारी गावं ही खरी समस्या आहे, ती सोडवण्यासाठी महिलांना अशाप्रकारे पैशांची ऑफर देणे, चुकीचे असल्याचा सूर जपानच्या सोशल मिडियात लावण्यात आला. महिला संघटनांनीही या योजनेवर आक्षेप घेतला. परिणामी जपान सरकारनं ही योजनाच मागे घेतली आहे. (Japan Population)

जपानमध्ये गेल्या अनेक वर्षापासून लोकसंख्येत घट होत आहे. याला अनेक सामाजिक कारणे असून त्याचे परिणाम आता समोर येत आहेत. लोकसंख्या घटल्यानं जपानमधील अनेक गावे ओस पडली आहेत. काही गावात हातावर मोजता येतील एवढी माणसं रहात आहेत. त्यातही वयोवृद्धांची संख्या अधिक आहे. जपानच्या एका गावात १४ वर्षानंतर मुल जन्माला आलं, यामुळे या गावात उत्सव साजरा झाला. अर्थात या मुलासोबत खेळण्यासाठी एकही लहान मुल गावात नाही. अशीच परिस्थिती बहुतांश जपानमध्ये आहे. आता जपान सरकार यातून बाहेर पडण्यासाठी एक-एक योजना जाहीर करत आहे. यासंदर्भात झालेल्या एका पहाणी अहवालानुसार ४० टक्क्यांहून अधिक जपानी नगरपालिकेत महिलांच्या संख्येत ३० टक्के घट झाली आहे.

यातूनच खेडेगावात जाऊन लग्न करण्यासाठी आकर्षक ऑफर महिलांना देण्यात आली. या योजनेत महिलांना रोख रक्कम आणि मॅचमेकिंग इव्हेंटसाठी ट्रेन तिकिटांचा समावेश होता. पण जपान सरकारच्या या योजनेवर चौफेर टीका करण्यात आल्यामुळे ही योजना रद्द करण्यात आली. त्यातून सरकार तरुणींना ७००० डॉलर्सपर्यंत मदत देणार होते. ही योजना रद्द झाली असली तरी जपानमधील घटती लोकसंख्या आणि त्यातही महिलांचे कमी असलेले प्रमाण हा जपानचा मोठा सामाजिक प्रश्न तयार झाला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी कुठलिही योजना जाहीर करण्यापेक्षा तरुणांची मानसिकता बदलणे गरजेच असल्याचे मत येथील तज्ञ व्यक्त करीत आहेत. जपानी तरुण आणि तरुणींमध्ये लग्नसंस्थेबदद्ल अनेक समज आहेत. करिअर आणि शहरातील महागडी जीवनशैली यामुळे जपानमध्ये लग्नाचे प्रमाण कमी झाले आहे. (Japan Population)

====================

हे देखील वाचा : कोरोना मेड इन अमेरिका

====================

मुलांना जन्म घातल्यास आपल्या करिअरला खिल बसेल अशी समजूत जपानच्या तरुणींची आहे. या व अन्य कारणांची सोडवणूक आधी करावी, अशी मागणी आता येथील सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे. २०२० च्या जनगणनेनुसार जपानमध्ये ९१ लाख एकल महिला आहेत, तर पुरुषांची संख्या १.११ कोटी आहे. महिलांची संख्या २० टक्क्यांनी कमी आहे. जपानच्या ग्रामिण भागातील तरुणी या शिक्षण पूर्ण करून शहरात नोकरीसाठी जातात. त्यामुळे गावातील महिलांची संख्या कमी झाली आहे. या तरुणींना गावातच रोजगार उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी आता जपानमध्ये होत आहे. जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जपानचा उल्लेख होतो. मात्र आता या देशातील सर्वाधिक जनता वृद्ध आहे. जपानमध्ये एकटेपणाही लोकांचा बळी घेत आहे. सुमारे ४० हजार लोक त्यांच्या घरात एकटे मरण पावले आहेत. यापैकी सुमारे चार हजार मृतदेह त्यांच्या मृत्यूनंतर महिन्याभरात सापडले आहेत. भविष्यात या घटनेत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. (Japan Population)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.