फ्रान्सच्या नीस शहरातली सोसिएट जनराल बँक म्हणजे एक असं ठिकाण होतं, जिथली सुरक्षा सर्वात बेस्ट होती. 20 टन स्टीलचा दरवाजा, लोखंडी भिंती आणि आत करोडोंचा खजिना. लोक म्हणायचे, या बँकेची लूट करणं चोरांच्या स्वप्नातही शक्य नाही. पण एका चोराने हे स्वप्न खरं करून दाखवलं. “शस्त्रांशिवाय”, “द्वेषाशिवाय” आणि “हिंसेशिवाय” असं त्याने त्या बँकेच्या लॉकरच्या भिंतीवर लिहिलं होतं. त्याने ही चोरी कशी केली? आणि कोण होता हा माणूस? चोरीची ही थ्रिल्लिंग गोष्ट जाणून घेऊ. (Bank Robbery)
१९ जुलै १९७६, सकाळी 9 वाजले होते. नीस शहरातली सोसिएट जनराल बँक उघडली. मॅनेजर रोजच्यासारखा तिजोरीकडे गेला, ही तिजोरी म्हणजे एक प्रकारची रूम होती. मॅनेजरला तिथून पैसे काढायचे होते. पण त्या दिवशी तिजोरीचा दरवाजा काही उघडेच ना. हा दरवाजा म्हणजे 20 टन स्टीलचा होता, रोज हा दरवाजा उघडणं म्हणजे डोकं फिरायची पाळी. मॅनेजरने बराच जोर लावला, लोकांना बोलावलं, पण काहीच झालं नाही. शेवटी त्याने ही तिजोरी बनवणाऱ्या कंपनीला फोन लावला. ते पण आले, पण त्यांच्या कडून सुद्धा हा दरवाजा उघडला नाही. तिजोरीत करोडोंच्या आसपास रुपये होते आणि जवळपास 4,000 लॉकर बॉक्स होते. दुसऱ्या बँकेत असं झालं असतं, तर मॅनेजरला वाटलं असतं की चोरी झाली का? पण इथे कुणाच्या डोक्यातही असं आलं नाही. कारण ही तिजोरी म्हणजे जगातली सगळ्यात सेफ तिजोरी समजली जायची.
दरवाजा उघडत नाही म्हणून मग ठरलं, भिंतीला भोक पाडायचं. ही भिंत पण काही साधी नव्हती, एकदम जाड आणि आतून लोखंडी होती. ती तोडायला बराच वेळ लागला. शेवटी मॅनेजर आणि बाकीचे आत गेले, तेव्हा त्यांच्यासमोर सगळं चित्र बदललं. तिजोरी लुटली गेली होती! करोडों रुपये आणि जवळपास 4000 लॉकर बॉक्समधलं सगळं सामान गायब होतं. पण मजा बघा, तो 20 टनाचा दरवाजा तसाच बंद होता. चोरांनी आतून त्याला वेल्ड करून चिकटवून टाकलं होतं, म्हणून तो उघडतच नव्हता. (Bank Robbery)
तिजोरीच्या भिंतीवर स्प्रे पेंट ने लिहिलेलं होतं. Without arms, without hate, and without violence. म्हणजे तेच “शस्त्रांशिवाय”, “द्वेषाशिवाय” आणि “हिंसेशिवाय.” ही चोरी एकदम शांतपणे झाली होती आणि तिजोरीच्या फरशीवर एक मोठा खड्डा होता. चोरांनी त्या खड्यातूनच सगळं सामान चोरी केलं होतं. पोलिसांनी तपास सुरू केला, तर कळलं की हा खड्डा बँकेपासून एका नाल्यापर्यंत गेलं होता. त्या नाल्यात गेल्यावर त्यांना काही सामान मिळालं—27 गॅस सिलिंडर, वेंटिलेशनसाठी एक मशीन आणि 1 किलोमीटर लांबीची वीजेची तार. हे सगळं वापरून चोरांनी हा बोगदा खणला होता आणि त्या बोगद्यातून त्यांनी आजच्या हिशोबाने जवळपास 900 कोटी रुपये चोरी करून नेले होते. ही चोरी फ्रान्सच्या इतिहासातली सगळ्यात मोठी चोरी ठरली. सगळ्यांना प्रश्न पडला—हे कोणी केलं? आणि हे सगळं कसं झालं?
तीन महिने तपास केल्यावर पोलिसांना एक मोठा पुरावा मिळाला. एका मुलीच्या संशयावर पोलिसांनी एकाला पकडलं. हा माणूस त्या चोरांच्या टोळीतलाच एक होता. आणि त्याने सगळ्यांची नावं सांगितली आणि मग समोर आलं या स्टोरी मागच्या मास्टर माइंडचं नाव. एल्बर्ट स्पाजियारी! हा काही साधा माणूस नव्हता. नीस शहरातला प्रसिद्ध फोटोग्राफर होता, जो त्यावेळी मेयरसोबत जपानला गेलेला होता. त्याचं नाव कळताच पोलिसांनी त्याचा भूतकाळ चेक केला. (Bank Robbery)
एल्बर्टची गोष्टच वेगळी होती. 17 व्या वर्षी तो व्हिएतनामच्या लढाईत गेला होता. तो एक चांगला सैनिक होता. पण तिथे त्याला चोरी करण्याची सवय लागली. एकदा एका वेश्यालयात चोरी करताना पकडला गेला आणि त्याला फ्रान्सला परत पाठवण्यात आलं. त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. बाहेर आल्यावर तो एका अतिरेकी संघटनेत सामील झाला आणि पुन्हा तीन वर्षांसाठी त्याला जेल झाली. मग 1968 मध्ये तो बायकोसोबत नीस शहरात राहायला आला. तिथे त्याने फोटोग्राफी शिकून आपला स्टुडिओ टाकला. आता त्याचं आयुष्य सुरळीत चाललं होतं, पण त्याला ते पुरेसं वाटलं नाही.
1972 मध्ये त्याच्या हाती ‘लूपहोल’ नावाचं पुस्तक आलं. त्या पुस्तकात नाल्यातून जमिनी खालून चोरीची एक गोष्ट होती. वाचता वाचता त्याला आयडिया सुचली सोसिएट जनराल बँकेखाली नाला आहे, तिथून तिजोरी गाठता येईल! त्याने स्टुडिओ सोडला आणि तिथे दुसऱ्याला ठेवून कोंबड्या पाळायला लागला. पुढे तपासात पोलिसांना त्या कोंबडीच्या खुराड्यातून बंदुका आणि बारूद मिळाली आणि एक महत्त्वाचं म्हणजे एल्बर्ट आधी एका कंपनीत काम करत होता, जी बँकांच्या तिजोऱ्या बनवायची. त्यामुळे त्याला तिजोरीची सगळी माहिती होती. (Bank Robbery)
एल्बर्टने आधी शहराच्या टाउनहॉलमधून नाल्यांचा नकाशा मिळवला. मग अनेक आठवडे तो शहरांच्या नाल्यात फिरला, जेणेकरून सगळं समजून घेता येईल. त्याने बँकेत एक लॉकर घेतलं आणि त्यात एक अलार्म clock ठेवलं. रात्री 12 वाजता ते वाजायचं. हे घड्याळ तिजोरीत ठेवलं होतं. कित्येक दिवस ते वाजलं, पण बाहेर आवाज आला नाही. म्हणून त्याला कळलं की तिजोरीत आवाज detect करणारं एकही सुरक्षा मशीन नाही.
=============
हे देखील वाचा : Pamban Bridge : अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार ठरणारा पांबन पूल !
==============
मग त्याने पुढचं काम सुरू केलं. त्याने शहरातील गुन्हेगारांना जमवलं आणि २ महीने २० जणांनी मिळून नाल्यापासून तिजोरीपर्यंत बोगदा खणला. हत्यारांमुळे संशय येईल म्हणून त्यांनी हा बोगदा हातांनी खणला होता. हा बोगदा 8 मीटर लांब, 2 फूट रुंद आणि 20 इंच उंच होता. बोगदा कोसळू नये म्हणून त्यात काँक्रीट टाकलं आणि वीजेच्या तारांनी उजेड केला. काही दिवसांनंतर एका रविवारच्या रात्री ही मंडळी बोगद्याच्या वाटेने तिजोरीत घुसले. २७ तास तिथे राहिले. एकदम आरामात चोरी केली आणि बाहेर पडले. फ्रान्सच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी चोरी झाली. मग एल्बर्ट परत आपल्या फोटोग्राफीच्या कामात लागला. त्याला वाटलं, पोलिस माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत. पण तसं झालं नाही. पोलिसांनी त्याला पकडलं.
पोलिसांना एल्बर्टची सगळी स्टोरी माहिती होती. तो जपानमधून परत आला तेव्हा त्याला पकडलं. सुरुवातीला तो काही बोलला नाही. पण पोलिसांनी त्याच्या बायकोला सुद्धा ताब्यात घेतलं आणि तो सगळं सांगायला तयार झाला. तरी त्याने बाकीच्या सहकाऱ्यांची नावं सांगितली नाहीत. पाच महिने जेलमध्ये राहिल्यानंतर, एके दिवशी त्याने त्याचा खटला हाताळत असणाऱ्या न्यायाधीशांना भेटण्याची इच्छा व्यक्तं केली. तो म्हणाला, “मी साथीदारांची नावं आणि पुरावा न्यायाधीश साहेबांना देणार आहे.” (Bank Robbery)
म्हणून त्याला न्यायाधीशांसमोर नेण्यात आलं. तेव्हा त्याने त्यांच्यासमोर एक कागद ठेवला, त्यावर काही चिन्हं होती. जजने विचारलं, “हे काय आहे?” तो म्हणाला, “हे कोड सोडवा, मग पुरावे मिळतील.” न्यायाधीश कागद बघत असताना, एल्बर्टने सर्वांना चुकांडा देऊन खिडकीतून उडी मारली. खाली गाडीवर पडला, आणि उतरून एक बाइकवर बसला आणि कायमचा फरार झाला! न्यायाधीशांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली, पण तो पोलिसांच्या हाती कधीच लागलाच नाही.