Home » माझं लग्न मोडण्यास ‘करण’ जबाबदार; कॉफी विथ करणमध्ये समांथाने केला खुलासा

माझं लग्न मोडण्यास ‘करण’ जबाबदार; कॉफी विथ करणमध्ये समांथाने केला खुलासा

by Team Gajawaja
0 comment
Samantha on Koffee With Karan
Share

कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये अक्षय कुमारसारख्या सुपरस्टारवर भारी पडली, ती समांथा रूथ प्रभू. तिचं स्पष्ट तरीही विन्रम बोलणं, जबरदस्त वन लायनर्स आणि प्रसंगी करणचीही खिल्ली उडवणं यामुळे एपिसोड खरा रंगला. (Akshay -Samantha on Koffee With Karan 7)

कॉफी विथ करणच्या सातव्या सीझनचा प्रत्येक एपिसोड वाद आणि चर्चांनी रंगणार यावर नुकत्याच झालेल्या अक्षय कुमार- समांथा रूथ प्रभू यांच्या एपिसोडनं शिक्कामोर्तब केलं. एपिसोडच्या सुरुवातीलाच अक्षयनं समांथाला थेट उचलून काउचपर्यंत आणल्यानंतरच आजच्या एपिसोडमध्ये काय घडणार याची खात्री करणलाही देता येणार नसल्याचं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आलं आणि झालंही तसंच. करणसारखा कसलेला होस्ट आणि अक्षय कुमारसारखा कॉफीचा अनुभव असलेला दिग्गज सुपरस्टार असूनही समांथा रूथ प्रभू त्या दोघांवर भारी पडली!

कार्यक्रम बघताना एका डेटा अनालिटिकल कंपनीच्या विश्लेषणानुसार या भागासाठीचे कलाकार (अक्षय- समांथा) निवडण्यात आले, असं प्रेक्षकांना सुरुवातीपासून वाटत होतं. त्यामुळे हा कार्यक्रम या कंपनीने प्रायोजित केल्याच्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. मात्र, चाहत्यांना विशेष राग आलाय, तो करणनं समांथाला तिच्या घटस्फोटावरून विचारलेल्या प्रश्नांचा. 

अभिनेता नागा चैतन्यबरोबर घटस्फोट घेत असल्याचं समांथानं स्वतः सोशल मीडियावर जाहीर केलं होतं आणि त्यावरून तिला बरंच ट्रोलही करण्यात आलं होतं. करणनं एकाच दमात तिला तिच्या घटस्फोटाबद्दल आणि दुसऱ्याच क्षणी अक्षयला त्याच्या सुखी लग्नाचं रहस्य विचारल्यानं चाहते वैतागले आहेत. करणचं असं वागणं असंवेदनशील असल्याचं टीका त्याच्यावर होत आहे.  (Akshay -Samantha on Koffee With Karan 7)

समांथानं मात्र नागा चैतन्यबरोबरचे संबंध अजून ताणलेलेच असल्याचं मोकळेपणानं सांगितलं. “आम्ही एखाद्या ठिकाणी भेटलो, तर आजूबाजूला धारदार- टोकदार काहीच ठेवलेलं असू नये. कदाचित भविष्यात आमच्यातली परिस्थिती निवळेल, पण सध्या तरी तसं नाहीये”, असं समांथा म्हणाली.

करणनं समांथाला मी तुझ्या खासगी आयुष्याबद्दल विचारून अतिक्रमण करणार नाही अशी एका प्रश्नाची सुरुवात करताच समांथानं…. “पण तू तर आत्ताच ऑफ स्क्रीन मला अतिक्रमण करणारे प्रश्न विचारले होतेस”, असं म्हणताच, करणलाही हसू आवरलं नाही. अक्षयनंही त्यावर, “बरं झालं करण, आता तुझी खिल्ली उडवण्यासाठी मला जोडीदार मिळाली”, असं म्हणत समांथाला दुजोरा दिला. त्यावरून या शोचं नाव ;कॉफी विथ एनक्रोचमेंट करण’ असं ठेवायला हवं यावर दोघांचंही एकमत झालं. (Akshay -Samantha on Koffee With Karan 7)

अक्षयला ट्विंकलवरून चिडवण्याची एकही संधी करणनं सोडली नाही, पण अक्षयनं त्याला जशास तशी उत्तरं दिली. ट्विंकलचं लिखाण खूपच स्फोटक असतं. ती काय लिहेल याची मला सतत काळजी असते. तिचं लिखाण मवाळ करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करत असतो, असं उत्तर अक्षयनं दिल्यापासून ट्विंकलचं खरं लिखाण वाचण्याची उत्सुकता लागल्याचं सोशल मीडियावर चाहते सांगत आहेत. दरम्यान मी ट्विंकलचं सगळं म्हणजे सगळं ऐकत असतो अशी कबुली देत सगळ्या नवऱ्यांनाही तेच करण्याचा सल्ला दिला आहे. 

रॅपिड फायरमध्ये मात्र अक्षयनं आपण अनुभवी असल्याचं दाखवून देत हँपर जिंकलं. बॉलिवूड सेलिब्रेटीजचं सोशल मीडियावर फिल्टर वापरणं आपल्या समजुतीपलीकडचं आहे, असं सांगताना अक्षयनं चुकून ‘फिलर’ हा शब्द वापरल्यानं करण- समांथाचं चांगलंच मनोरंजन झालं.

या एपिसोडमधला सगळ्यात मोठा हायलाइट होता, तो म्हणजे, समांथानं लग्न मोडण्यासाठी करण जबाबदार असल्याचा त्याच्यावर लावलेला आरोप! करण त्याच्या सिनेमात लग्न, प्रेम, रोमान्स यांचं अतर्क्य रूप मांडत असल्यामुळे माझ्यासह आपल्या देशातल्या तरुणाईचा गैरसमज होतोय, कारण प्रत्यक्षात लग्न केथ्रीजी नाही, तर केजीएफ असं समांथाचं म्हणणं चाहत्यांना उचलून धरलंय.

========

हे देखील वाचा – रणवीरच्या ‘न्यूड’ फोटोशूटमागचं कारण काय? नेटिझन्स म्हणतायत ‘ओ रणवीर… 

========

अर्थात, वाद आणि टीका यांशिवाय करणचं कोणतंच काम त्यातही कॉफीचा कोणताच एपिसोड पूर्ण होऊच शकत नाही. या एपिसोडमधेही शेवटच्या राउंडमध्ये करणनं दोघांना दिलेलं डान्सचं आव्हान नेमकं काय होतं आणि बॉलिवूड डान्स करा म्हटल्यावर अक्षयनं समांथाला उचलून गोल फिरवण्याची गरज काय होती, असा प्रश्न विचारत चाहते करण- अक्षयवर सडकून टीका करत आहे. (Akshay -Samantha on Koffee With Karan 7)

थोडक्यात सांगायचं तर, नेहमीप्रमाणे एकमेकांच्या स्तुतीपासून, शेलकी टीका, खासगी प्रश्न, वाद, चर्चा असा सगळा मसाला या एपिसोडमध्ये भरलेला असला, तरी नेहमीच्या बॉलिवूड सेलिब्रेटीजच्या तुलनेत समांथाचा मोकळेपणा वाऱ्याच्या प्रसन्न झुळुकीसारखा होता. 

– कीर्ती परचुरे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.