येणार येणार म्हणून चर्चेत असलेला अक्षय कुमारचा बहुचर्चीत ‘लक्ष्मी बॉम्ब’ अखेर सप्टेंबरमध्ये येतोय. 9 सप्टेंबर रोजी अक्षयच्या वाढदिवसालाच हा ‘लक्ष्मी बॉम्ब’ येतोय. ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचे प्रदर्शन होत आहे. याआधी या 22 मे आणि 5 जून या तारखांना ‘लक्ष्मी बॉम्ब’ प्रदर्शित होईल हे जाहीर केलं होतं. मात्र यावेळी दस्तुरखुद्द अक्षय कुमारनेच 9 सप्टेंबर ही तारीख ‘लक्ष्मी बॉम्ब’ च्या नवीन फोटोसह जाहीर केली आहे.
कोरोनाचा जबरदस्त फटका बॉलिवूडला बसला आहे. त्यामुळे प्रदर्शनाच्या रांगेत असणा-या अनेक बीग बजेट चित्रपटांना थांबवण्यात आलं होतं. पण जवळपास चार महिने थांबूनही कोरोना आटोक्यात आला नाही. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनासाठी आणखी थांबवण्यापेक्षा ओटीपी प्लॅटफॉर्मवर ते प्रदर्शित करण्यावर निर्मांत्यांचा भर आहे. त्यामुळे पुढच्या दोन महिन्यात 20 हून अधिक चित्रपट ओटीपी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रसिकांना पहाता येणार आहेत. त्यात ‘लक्ष्मी बॉम्ब’ या बहुचर्चीत चित्रपटाचाही समावेश आहे.
2011 मध्ये आलेल्या ‘मुन्ना टू कंचना’ या तामिळ चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. राघव लॉरेंन्स यांनी दिग्दर्शित केलेला ‘कंचना’ हा चित्रपट सुपर डूपर हिट ठरला होता. आता लॉरेंन्स हा चित्रपट हिंदीत घेऊन येत आहेत. हॉरर कॉमेडी स्वरुपाच्या या चित्रपटात अक्षय कुमार राघव नावाच्या कॅमेरामनची भूमिका करीत आहे. त्याच्यासह कियारा आडवाणी, तुषार कपूर, शरद केळकर, मीरा यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन पाहूणे कलाकार म्हणून झळकणार असल्याची चर्चा आहे. एका पाहुण्या भूताच्या भूमिकेत अमिताभ आहेत म्हणे… पण हे गुपित खरं की खोटं हे 9 सप्टेंबरलाच स्पष्ट होणार आहे.
‘लक्ष्मी बॉम्ब’ मध्ये अक्षय कुमार एका तृतीय पंथी व्यक्तीची भूमिका करीत आहे. डोळ्यात काजळ भरतांना एक फोटो नुकताच अक्षयनं सोशल मिडीयावर ट्विट केला. या फोटोला आतापर्यंत लाखो लाईक मिळाले शिवाय रिट्विटच्या बातबतीतही रेकॉर्ड झाला आहे. यातील ‘सब रब दे बंदे’ आणि ‘आला रे आला भूत आला’ या दोन गाण्यांनाही चांगली पसंती मिळतेय.
अक्षय कुमार आपल्या प्रत्येत चित्रपटातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो. आता ‘लक्ष्मी बॉम्ब’ मध्ये अक्षय काय संदेश देतोय हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.
– सई बने