महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हटले जाणारे महाकवी ग. दि. माडगूळकर यांचे एक सुंदर गीत आहे – ‘आसूर्यचंद्र नांदो स्वातंत्र्य भारताचे’. त्यात दोन ओळी आहेत.
येथे नको निराशा थोड्या पराभवाने।
पार्थास बोध केला येथेच माधवाने।।
भारतीय संस्कृतीत थोड्याशा पराभवाने माणसं खचून जात नाहीत. महाभारतात धर्मयुद्धाची रणभूमी असलेल्या कुरुक्षेत्रावर जेव्हा अर्जुन गोंधळला होता, तेव्हा माधवाने म्हणजे श्रीकृष्णाने त्याला हाच उपदेश केला होता. त्यातून प्रेरणा घेऊन त्याने लढाई केली आणि अखेर पांडवांचा जय झाला, असा त्या ओळींचा अर्थ. येथे पार्थ हा शब्द अर्जुनासाठी वापरण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात असेच किंचित महाभारत सुरू आहे. त्यात स्वकीयांच्या विरोधात लढायला अजित पवार उभे टाकले आहेत, पण ऐन निवडणुकीच्या वेळेस त्यांचाच गोंधळ उडालेला आहे. (Ajit Pawar VS Sharad Pawar)
फरक हा आहे, की पार्थ हे स्वतः अजित पवार यांचे नाही तर त्यांच्या चिरंजीवांचे नाव आहे. म्हणजेच पार्थाचे बाबा रणक्षेत्रावर गोंधळलेले आहेत. आणखी एक फरक म्हणजे महाभारतातला अर्जुन लढाईला सुरुवात होण्यापूर्वी गोंधळलेला होता. महाराष्ट्रातला अर्जुन लढाई सुरू करून एका पराभवाला सामोरा गेलेला आहे. त्यामुळेच पुढे लढावे की नाही, हा प्रश्न त्याला पडला आहे.
गेल्या काही दिवसांत अजित पवार यांनी अनेक चमत्कारिक विधाने केली आहेत. त्यातून त्यांना कोण्या दिशेने जायचे आहे, हेच कळत नाहीये. त्यांच्या सहकाऱ्यांनाही आणि कार्यकर्त्यांनाही. अत्यंत आपुलकीने त्यांना आपल्यासोबत घेणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांमध्येही त्यांच्याबाबत साशंकता निर्माण झाल्याचे एकंदर चित्र आहे. त्यामुळे आपल्या काकांच्या विरोधात घेतलेली भूमिका पुढे न्यावी, का शस्त्रे खाली टाकून परत काकांच्या शिबिरात दाखल व्हावे, असी चलबिचल त्यांच्या मनात चालू असल्याचेही दिसत आहे. (Ajit Pawar VS Sharad Pawar)
याला उदाहरण म्हणजे अजित पवार यांचे ताजे वक्तव्य. समाजाला कुटुंबांमध्ये फूट पडलेली आवडत नाही. मी याचा अनुभव घेतला आहे आणि मला माझी चूक मान्य आहे, असे अजित पवार अलीकडेच म्हणाले. शुक्रवारी गडचिरोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या जनसम्मान सभेत बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले. आपल्या पक्षाचे नेते आणि राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री यांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) मध्ये जाण्यापासून परावृत्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.येत्या विधानसभा निवडणुकीत भाग्यश्री आणि तिचे वडील यांच्यात लढत होईल, अशी एक शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी हे वक्तव्य केले. त्यांचा रोख नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांची पत्नी सुनेत्रा आणि चुलत बहीण सुप्रिया सुळे यांच्यातील लढतीकडे होता, हे लहान बालकालाही कळेल. (Ajit Pawar VS Sharad Pawar)
आपण चुकलो, हे जाहीरपणे सांगण्याची अजित पवार यांनी एका महिन्यापेक्षा कमी कालावधीतील ही दुसरी वेळ आहे. आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना आपली बहिण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रिंगणात उतरवून चूक केली होती, असे त्यांनी गेल्याच महिन्यात सांगितले होते. आपल्या काकांच्या विरोधात बंड करून सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत अजित पवार यांना नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक अशा चुकांची कबुली द्यायला सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर कधी कधी उपरतती झाल्यासारखे राजकारणातून संन्यास घेण्याचीही भाषा केली आहे. (Ajit Pawar VS Sharad Pawar)
आता परवा आपल्या हक्काच्या बारामतीत बोलताना अजित पवार यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले. बारामतीला नवा आमदार मिळाला पाहिजे आणि लोकांनी आपल्या 33 वर्षांच्या कारकिर्दीतील कामगिरीची तुलना अन्य लोकप्रतिनिधीशी करावी, असे आवाहन त्यांनी केले. ”सध्या माझे वय ६५ आहे. मी समाधानी आहे. बारामतीकरांना माझ्याशिवाय इतरांना एकदा तरी नवीन आमदार मिळावा. मग त्यांनी माझ्या 1991 ते 2024 या काळातील माझ्या कारकिर्दीची माझ्या वारसदाराच्या कामगिरीशी तुलना करावी. जिथे पिकते तिथे विकत नाही, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे,” असे पवार यांनी बारामतीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले. (Ajit Pawar VS Sharad Pawar)
आपल्याला बारामतीतून निवडणूक लढविण्याची इच्छा नसल्याचे संकेत देण्याची अजित पवारांची ही दुसरी वेळ आहे. बारामतीची जागा लढवण्याचा आपला इरादा नसल्याचे त्यांनी पहिल्यांदा 15 ऑगस्ट रोजी संकेत दिले होते. ” मी किमान आठ वेळा बारामती जिंकले आहे. पण मी आता या जागेवर निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही,” असे ते म्हणाले होते. आता त्याच गोष्टीची पुनरूक्ती त्यांनी केली आहे. (Ajit Pawar VS Sharad Pawar)
ग. दि. माडगूळकरांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे पत्नीच्या झालेल्या पराभवामुळे अजित पवार खूपच व्यथित झालेले दिसतात. ”मी बारामतीचा सर्वांगीण विकास केला. मी जास्तीत जास्त निधी आणला. मी पण माणूस आहे. बारामतीकरांसाठी इतकं काही करूनही त्यांनी असा निकाल का दिला,” असा प्रश्न त्यांनी विचारला. अजित पवारांचेही बरोबर आहे. त्यांनी दाखला दिल्याप्रमाणे 1991 ते 2024 या 33 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना कधीही पराभवाला सामोरे जावे लागले नाही. संघर्षाचे राजकारण त्यांना कधी करावे लागले. त्यामुळे पहिल्यांदाच अशा नामुष्कीला सामोरे जावे लागलेल्या या नेत्याला वैषम्य वाटणे स्वाभाविक आहे. (Ajit Pawar VS Sharad Pawar)
शिवाय त्यांच्या या विरक्तीला आणखी एक किनार आहे. अजित पवार यांचे काका शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीच्या येत्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे, अशी चर्चा आहे. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे. म्हणजे आपल्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या पुतण्याच्या विरोधात त्याच्या पुतण्याला उभे करण्याची चाल शरद पवार खेळत आहेत. या संबंधात पक्षाने कुठलाही निर्णय घेतला नाही, अशी मखलाशी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. परंतु स्वतः युगेंद्र पवार यांनी पक्षाने होकार दिल्यास निवडणूक लढविण्यास आपण तयार असल्याचे अगोदरच स्पष्ट केलेले आहे. (Ajit Pawar VS Sharad Pawar)
====================
हे देखील वाचा : फडणीसांवर गंभीर आरोप !
याचाच अर्थ ज्याप्रमाणे चुलत बहिणीच्या हातून पत्नीचा पराभव झाला, तसेच आपल्या पुतण्याच्या हातून आपला पराभव होईल, अशी भीती अजित पवार यांना वाटत असावी. किंवा मग कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जसा प्रश्न पडला होता, की आपल्याच लोकांच्या विरोधात कसे लढावे, तसा प्रश्न अजित पवार यांना पडला असावा. थोडक्यात म्हणजे निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर अजित पवार यांच्या रूपाने गोंधळलेला अर्जुन उभा आहे. गंमत म्हणजे आजवर या अर्जुनाला ज्याचे मार्गदर्शन मिळत होते, ते शरद पवारच त्यांच्या विरोधात उभे आहेत. त्यामुळे या लढाईची रंजकता आता आणखी वाढत जाणार आहे. (Ajit Pawar VS Sharad Pawar)